१० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमुळे महाराष्ट्राची आरोग्य सेवा बळकट होणार! – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील ७६०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी
नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाच्या कामाचे भूमिपूजन
शिर्डी विमानतळ येथे नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी
मुंबई:- महाराष्ट्रात दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून राज्याची आरोग्यसेवा अधिक बळकट होणार आहे. यामुळे राज्यातील एकूण वैद्यकीय जागांची संख्या ६००० होणार आहे. विकासाचा प्रत्येक प्रकल्प हा सामान्य जनतेसाठी असून, नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरणाने आणि शिर्डी विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे व्यापार वाढणार आहे. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील ७६०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरणाची पायाभरणी आणि शिर्डी विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचा समावेश आहे. प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रातील १० सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित करण्याचा आरंभ केला आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (IIS), मुंबई आणि महाराष्ट्राच्या विद्या समीक्षा केंद्र (VSK) चे उद्घाटन केले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या विकासासाठी सरकारने आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा ‘महायज्ञ’ सुरू केला आहे. लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्यात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत आहेत. यामुळे अंबरनाथ (ठाणे), मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे लाखो लोकांसाठी सेवेची केंद्रे बनतील. महाराष्ट्रात आणखी ९०० वैद्यकीय जागांची भर पडून एकूण वैद्यकीय जागा ६००० होतील.
गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील जास्तीत-जास्त मुले डॉक्टर व्हावीत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत हे सरकारचे प्राधान्य आहे. एकेकाळी अशा प्रकारच्या विशेष अभ्यासासाठी मातृभाषेतील पुस्तके उपलब्ध नसण्याचे मोठे आव्हान होते. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांना मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. मातृभाषेतून शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न तरुण पूर्ण करतील, असेही प्रधानमंत्री यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले या दिग्गजांच्या आशीर्वादामुळेच महाराष्ट्रात प्रगतीची कामे सुरू असल्याचे प्रधानमंत्री यांनी सांगितले.
प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, मेट्रो नेटवर्कचा विस्तार, विमानतळांचे अद्यावतीकरण, विस्तारीकरण, महामार्ग प्रकल्प, पायाभूत सुविधा, सौर ऊर्जा आणि टेक्सटाईल पार्क यासारखे हजारो कोटींचे विकास प्रकल्प साकारले जात आहेत. शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालकांसाठी नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. वाढवन बंदर ह्या भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर बंदराची पायाभरणीही महाराष्ट्रात झाली आहे.
शिर्डी विमानतळावरील नवीन टर्मिनलमुळे भक्तांना मोठा फायदा होईल, देश-विदेशातील अधिकाधिक पर्यटक येऊ शकतील. अद्ययावत सोलापूर विमानतळही उभे राहील. ज्यामुळे भाविक आता शनी – शिंगणापूर, तुळजाभवानी यांसारख्या जवळच्या आध्यात्मिक स्थळांना भेट देऊ शकतील, तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
मराठीला अभिजात भाषा म्हणून नुकत्याच मिळालेल्या मान्यतेची आठवण करून देताना प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, जेव्हा एखाद्या भाषेला योग्य सन्मान मिळतो तेंव्हा केवळ शब्दच नाही तर संपूर्ण पिढीला आवाज मिळतो. यातून करोडो मराठी बांधवांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, जागतिक समुदाय भारताकडे मानवी संसाधनांसाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून पाहतो, ज्यामध्ये जगभरात शिक्षण, आरोग्यसेवा आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या मोठ्या संधी आहेत. या संधींकरिता भारतातील तरुणांना तयार करण्यासाठी, सरकार त्यांच्या कौशल्यांना जागतिक मानकांनुसार अद्ययावत करत आहे. शैक्षणिक आराखडा पुढे नेण्याच्या उद्देशाने विद्या समीक्षा केंद्रासह महाराष्ट्रात विविध प्रकल्पांचा आरंभ आणि मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सच्या उद्घाटनाद्वारे तरुणांच्या कलागुणांना प्रशिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या इंटर्नशिप दरम्यान ५,००० रुपये स्टायपेंड मिळेल. हजारो कंपन्या या उपक्रमाचा एक भाग होण्यासाठी नोंदणी करत आहेत ज्यामुळे तरुणांना मौल्यवान अनुभव मिळण्यास आणि त्यांच्यासाठी नवीन संधी खुल्या करण्यास मदत होत आहे.
विकसित भारतासाठी आमच्या सरकारचे प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक धोरण समर्पित आहे. गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांचे कल्याण हेच सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक विकासप्रकल्प हा गरीब ग्रामस्थ, मजूर आणि शेतकरी यांना समर्पित आहे. शिर्डी विमानतळावर स्वतंत्र कार्गो कॉम्प्लेक्स बांधण्यात आल्याने शेतकऱ्यांना खूप मदत होईल. विविध प्रकारची कृषी उत्पादने देशभरात आणि परदेशात निर्यात केली जाऊ शकतील. शिर्डी, लासलगाव, अहिल्यानगर आणि नाशिक येथील शेतकऱ्यांना कांदे, द्राक्षे, पेरू आणि डाळिंब यांसारखी उत्पादने मोठ्या बाजारपेठेत सहजपणे पोहोचवता आल्याने कार्गो कॉम्प्लेक्सचा फायदा होईल.
बासमती तांदळावरील किमान निर्यात किंमत रद्द करणे, गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी हटवणे, परबोल्ड तांदळावरील निर्यात शुल्क निम्म्याने कमी करणे यासारख्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सातत्याने आवश्यक पावले उचलत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने कांद्यावरील निर्यात करही निम्म्याने कमी केला आहे. भारतातील शेतकऱ्यांना मोहरीसारख्या पिकांना जास्त भाव मिळावा यासाठी सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर २० टक्के कर लावण्याचा आणि रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावरील कस्टम ड्युटीमध्ये लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही श्री. मोदींनी सांगितले. सरकार वस्त्रोद्योगाला मदत करत असून त्याचा महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माणगाव (जिल्हा रायगड) येथून बोलताना म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता-बंधुता आणि एकतेची शिकवण दिली. त्यांच्या नावाने असलेल्या नागपूरच्या विमानतळावर एकीकृत टर्मिनल साकारलं जातंय. त्यासाठी सात हजार कोटींचा खर्च येणार आहे. या नव्या टर्मिनलमुळे एका वेळी शंभर विमानांची व्यवस्था शक्य होणार आहे. यातून दरवर्षी चौदा लाख प्रवाश्यांचा प्रवास सुखकर होईल, तर नऊ लाख मेट्रीक टनाची मालवाहतूक शक्य होणार आहे. यामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळणार आहे. अध्यात्मिक तीर्थस्थळ म्हणून जग शिर्डीकडे पाहते. याठिकाणी साडेसहाशे कोटीं खर्चून एकीकृत टर्मिनल उभारत आहोत. यामुळे शिर्डीतील पर्यटन वाढेल. त्यातून रोजगार आणि सेवा संधीही वाढतील. एकाच दिवशी दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन हा विक्रमच आणि ऐतिहासिक घटना आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण सुविधांना केंद्रातील सरकारने पाठबळ दिले आहे.
महाराष्ट्र सामाजिक, शैक्षणिक, कला-सांस्कृतिक दृष्ट्या तसंच आर्थिक, पायाभूत सुविधा, उद्योग-गुंतवणूक व व्यवसाय अशा सगळ्याचं क्षेत्रात आघाडीवर आहे. आता आरोग्य सुविधा बळकटीकरणावर भर दिला आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन क्षेत्रात महत्वाचे अनेक निर्णय घेतले आहेत.
एकाच शैक्षणिक वर्षात मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ (ठाणे) अशा १० नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या मंजुरीच्या ऐतिहासिक निर्णयांमुळं ग्रामीण व दूरस्थ भागात विशेषोपचार आरोग्यसेवेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील एमबीबीएसच्या प्रवेशाची क्षमता देशातील सर्वाधिक होणार आहे. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये ९०० ने वाढ होणार आहे. एकूण ३५ महाविद्यालयात प्रतिवर्ष ४८५० एमबीबीएस जागा उपलब्ध होणार आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सातत्याने पाठबळ मिळते आहे त्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाचे आभार मानले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथील नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीची अंदाजित किंमत अंदाजे ७००० कोटी रुपये असणार आहे. सर्व आकारांच्या विमानांसाठी योग्य स्वतंत्र संचालनासह दोन समांतर धावपट्टी, विद्यमान धावपट्टीचे विस्तारीकरण आणि नवीन धावपट्टीचे निर्माण, दरवर्षी 14 दशलक्ष प्रवाशांच्या हाताळणीसाठी 3 लाख चौ. मी. च्या नवीन टर्मिनल इमारतीचा विकास, अंदाजे 9 लाख मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन कार्गो कॉम्प्लेक्सचा विकास करण्यात येणार आहे. एका वेळी सुमारे 100 विमाने सामावून घेण्यासाठी पार्किंग बे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.