मुंबरकर साहेबांना `विजयी’ शुभेच्छा!

सन्मानिय श्री. विजय मुंबरकर साहेबांचा आज वाढदिवस!
त्यांना आमच्याकडून खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा!

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज ह्या संस्थेतील गैरकारभार थांबवा आणि संस्थेचा पुन्हा उत्कर्ष व्हावा, संस्थेत पुन्हा एकदा सुवर्णकाळ यावा व त्याचा लाभ सर्व समाज बांधव-भगिनींना व्हावा; ह्यासाठी सदैव झटणारे समाजनेते, सामाजिक क्षेत्रातील प्रामाणिक धडाडीचे नेते, रोखठोक व्यक्तिमत्व विजय मुंबरकर साहेबांना खरोखरच मानाचा मुजरा!

का?

सेवानिवृत्तीचे जीवन जगत असताना माणसाने आयुष्याचे शेवटचे दिवस मोजत बसावे, घरात पडून राहावे, सर्वांशी गोड गोड बोलावे, सामाजिक क्षेत्रातून बाजूला व्हावे, कोणाशी वाईटपणा घेऊ नये, आपल्या तब्बेतीची काळजी घ्यावी आणि सुखाने आनंदाने जीवन जगावे; अशी सर्वसाधारण संकल्पना मनात येते; पण सामाजिक क्षेत्रात वावरताना वय वाढले तरी कर्तृत्वाने जी व्यक्ती दृढपणे उभी राहते, आपल्या अनुभवातून समाजसेवा करते, मोलाचे मार्गदर्शन करते, चुकीला चूक व वाईटाला वाईट म्हणते, गैरप्रकाराला सडेतोड विरोध करते ती व्यक्ती मुजरा स्वीकारण्यास पात्र ठरते. म्हणूनच आम्ही आज विजय मुंबरकर साहेबांना मानाचा मुजरा करीत आहोत.

वयोमानानुसार शरीर साथ देत नाही. पण ते मनाने अजिबात थकलेले नाहीत. तीन शैक्षणिक संस्थांवर ते अनेक वर्षे काम करतात. मात्र क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज ह्या संस्थेला पुन्हा एकदा सुवर्णकाळ यावा, अधिक वेळ मिळावा म्हणून त्यांनी तीन शैक्षणिक संस्थांवरील जबाबदारीचे पद सोडून दिले. पण सत्तेत असलेल्या लोकांना ह्याचे कौतुक वाटणार नाही. सत्ताधारी नेहमी त्यांच्याकडे विरोधक म्हणून पाहतात; हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे. तरीही विजय मुंबरकर साहेबांचा उत्साह आमच्यासारख्यांना नेहमीच आदर्श वाटतो.

विजय मुंबरकर साहेबांनी आपल्या सोसायटीत धनाढ्य बिल्डरला कायद्याच्या कसोटीवर पराभूत केले. वकील न घेता स्वतः खटला लढले. हाच तो प्रामाणिकपणाचा आणि अभ्यासूपणाचा विजय! अशा विजयाच्या सानिध्यात जेव्हा आम्ही असतो तेव्हा आम्हाला जे काही मिळतं; ते शब्दात मांडणे कठीण आहे. प्रामाणिकपणा व कार्यक्षमता ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री. विजय मुंबरकर साहेब! त्यांचं एकच स्वप्न आणि ते नेहमी बोलून दाखवितात; क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज ह्या संस्थेला चांगले दिवस यावेत!

आज समाजात अनेकजण विद्याविभूषित आहेत, आर्थिकबाबतीत अतिश्रीमंत आहेत. मात्र ते समाजसंस्थेकडे मुद्दामहून दुर्लक्ष करतात. कशाला नात्यामध्ये दुरावा? कशाला संबंध बिघाडावयाचे? घाण साफ करायला गेलो तर आपल्यालाही घाण लागेल. ही वृत्ती बाळगल्याने सर्व स्तरावर समाजात बेजबाबदार वागणाऱ्यांचे फावते. त्यातून समाज व्यवस्था सडत जाते. त्याला जबाबदार स्वतःला सभ्य, प्रामाणिक, हुशार समजणारी माणसं असतात. समाजाशी काहीच देणंघेणं नसल्यासारखे ते वागतात म्हणूनच विजय मुंबरकरांसारखे व्यक्तिमत्व प्रभावित करतं!

सन्मानिय विजय मुंबरकर यांना पुन्हा मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांचे समाजहिताचे स्वप्न पूर्ण होवो; ही परमात्म्या चरणी प्रार्थना!

-नरेंद्र हडकर