शिरगाव येथील पु. अं. कर्ले महाविद्यालयाच्या साक्षी शिद्रुकचे नेत्रदीपक यश

बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशानासाठी निवड

नारळ आणि बांबू उद्योगावर सादरीकरण करत कोकण विभागाचे करणार प्रतिनिधित्व

सिंधुदुर्ग:- देवगड महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत करिअर संसदेतील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धेत देवगड तालुक्यातील शिरगांव येथील पुंडलिक अंबाजी कलें कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या साक्षी शिद्रुक या विद्यार्थिनीने कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात ती कोकण विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेत साक्षी शिद्रुक या विद्यार्थिनीने जिल्ह्यातील साधन संपत्ती, रोजगाराच्या उपलब्ध संधी, युवकांच्या समोरील आव्हाने, भविष्यातील उपलब्ध विकासाच्या संधी या अनुषंगाने नारळ आणि बांबु उद्योग तसेच यापासून तेल, खाद्यपदार्थ, काथ्या उद्योग, कोकोपिट, शोभिवंत वस्तु, फर्निचर बनविणे, थर्माकॉल आणि प्लास्टिकला पर्याय व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळून शाश्वत विकासांच्या संधी यावर ऑनलाईन सादरीकरण केले.

जिल्ह्यातील साधन संपत्तीतून रोजगाराच्या उपलब्ध संधी

युवकांच्या समोरील आव्हाने व भविष्यातील उपलब्ध विकासाच्या संधी या विषयवार करिअर कट्टा उपक्रमांतर्गत पॉवर पॉइंट पेझेंटेशन स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने २७ डिसेंबर रोजी जिल्हा स्तरावर पार पडली. तर २८ डिसेंबर रोजी मुंबई, नवीमुंबई, ठाणे, रायगड, पालघर. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा पार पडली. या दोन्ही स्पर्धेत साक्षी शिद्रुक हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. करिअर संसदेतील पदाधिकाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन १२ व १३ जानेवारी २०२५ रोजी शारदानगर बारामती येथे होणार आहे.

या अधिवेशनात राज्यातील प्रत्येक महाविद्यालयातील करिअर संसदेचे निवडक ७५० विद्यार्थी महाविघालयीन समन्वयक, जिल्हा समन्वयक आणि प्राचार्य प्रवर्तक सहभागी होणार आहेत. या राज्यस्तरीय अधिवेशनात विभागस्तरावर प्रथम आलेल्या ‘पॉवर पॉइंट पेझेंटेशन’चे सादरीकरण होणार आहेत. साक्षी शिद्रुक हीला कोकण विभागाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. साक्षी शिद्रुक हिला करिअर कट्टाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डॉ. अजित दिघे, महाविद्यालयाच्या करिअर कट्टा समन्वयक प्रा. अक्षता मोंडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.