शारीरिक श्रम करूनच सर्वाथाने उन्नत्ती होते! -परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू
`श्रीं’ बीज आणि माता श्रीलक्ष्मी माहात्म्य!
श्रमांशिवाय श्रीलक्ष्मीचं वरदान मिळत नाही!
जीवन सफल व वैभव संपन्न करायचं असेल तर त्या `श्री’ ची श्रीलक्ष्मीची आवश्यकता आहे!
श्रीलक्ष्मी नुसतं धन देत नाही; तर तृप्ती, शांती, यश, कीर्ती असं सगळं देते!
सद्गुरू भक्तीनेच श्रीलक्ष्मीची सर्व ऐश्वर्य प्राप्त होतात!
शारीरिक श्रम करूनच सर्वाथाने उन्नत्ती होते!
-परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू
( `श्रीं’ बीज मंत्राबाबत पितृवचन करताना परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूनी श्रमाचं महत्व सोप्या भाषेत समजावून सांगितले! प्रत्येक मानवाने स्वतःच्या सर्वांगिण उन्नतीसाठी ह्या पितृवचनातील ठळक मुद्दे समजून घेऊन आचरणात आणले पाहिजेत! म्हणूनच ते पुन्हा प्रसिद्ध करीत आहोत! – संपादक)
- भारतीय माणसांना हे नक्की माहिती असते की, श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे वैभव, श्री म्हणजे सुबत्ता, श्री म्हणजे सत्ता. त्यामुळे त्या ‘श्री’ची अपेक्षा सगळ्यांना असते!
- `श्रीं’ बीज लक्ष्मी बीज आहे.
- जेवढं कमीत कमी त्रासाचं तेच करण्यासाठीच आमचा जास्त कल असतो.
- भारतीय संस्कृती-भारतीय अध्यात्म सांगतं की, तुमचं जीवन तुम्हाला जर सफल करायचं असेल, वैभव संपन्न करायचं असेल, ऐष आरामात जगायचं असेल तर तुम्हाला त्या ‘श्री’ची आवश्यकता आहे. त्या लक्ष्मीची आवश्यकता आहे.
- लक्ष्मी नुसतं धन देत नाही तर तृप्तीही देते, शांतीही देते, यशही देते आणि किर्तीही देते. असं सगळं जी देते ती श्री आहे! ती खरी लक्ष्मी आणि `श्रीं’ हे तिचं बीज आहे.
- `श्रीं’ हे बेसिकली श्रम बीज आहे. श्रमामध्ये `श्र’ आहे, हे आमच्या कधीच लक्षात येत नाही!
- श्रम शब्द कसा बनलाय ? श्रम शब्दातील म शब्दाचा पाय मोडला तर श्रम् आणि त्याला इकार जोडला की, श्रीम् झालं. तसंच हा बीजमंत्र बनलेला आहे!
- `श्रीं’ हा बेसिकली श्रमाचा बीजमंत्र आहे. श्रम हेच बीज आहे!
- हा श्रमाचा बीज मंत्र आहे आणि कोणत्या श्रमाचा? तर सफल श्रमांचा, श्रमाच्या ताकदीचा, श्रमाच्या महत्वाचा!
- श्रमाचं महत्व जो लोकसमुह विसरतो, श्रमाचं महत्व जे कुटुंब विसरते, श्रमाचं महत्व जी व्यक्ती विसरते; तो लोकसमुह, ते कुटुंब आणि ती व्यक्ती कधीच आपली उन्नती करून घेऊ शकत नाही, सर्वार्थाने!
- बौद्धिक काम आम्ही करतो. मग आम्हाला शारीरिक श्रम करायची लाज वाटते. इकडे आम्ही आमचा मोठा घात करून घेत असतो!
- तर काही बिचारी मंडळी नुसते शारीरिक श्रमच करीत राहतात. ते बौद्धिक आणि मानसिक श्रम करीतच नाहीत. परंतु प्रत्येकाला आपल्या जीवनापुरते का होईना मानसिक आणि बौद्धिक श्रम करावेच लागतात!
- जी व्यक्ती बौद्धिक श्रमाचं काम करते, त्या व्यक्तीला मात्र शारिरीक श्रम प्रयत्नपुर्वक करावेच लागतात!
- आजच्या काळात जीवनात रोजचे शारीरिक श्रम उरलेले नाहीत. विहिरीवरून पाणी आणायचं नाही, नदीवरून पाणी आणायचं नाही, डोंगर चढून उतरायचे नाहीत, दररोज शौचाला जाण्यासाठी अर्धा किलोमिटर चालायचं नाही. देवळाभोवती एकशे आठ प्रदक्षिणा घालण्याचा नियम नाही, काडण्यातून पाणी काढायचं नाही, कुठायचं नाही-जात्यावर दळायचं नाही, पत्रावळी बांधायच्या नाहीत, लाकूड तोडायचं नाही, चुली बांधायच्या नाहीत, पडवीची झापं बदलायची नाहीत. आता श्रम उरले नाहीत!
- शारीरिक श्रमांशिवाय मनुष्याची बुद्धी आणि मन कधीही समर्थ होऊ शकत नाही! ही पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि तेच आम्हाला `श्रीं’ बीज शिकवितं!
- एक फाजील समज लोकांमध्ये आढळतो की, आम्ही बुद्धीवादी आहोत, आम्ही बुद्धीचं काम करतो! शारीरिक श्रम करणारे लोक म्हणजे खालच्या दर्जाचे चूक!
- ‘खालचा दर्जा’ हा शब्दच मुळी चुकीचा आहे. शारीरिक श्रमाची प्रतिष्ठा भारतीय संस्कृतीने नीट ओळखली म्हणून इकडे `श्रीं’ बीजाचा आश्रय घेतला!
- शारीरिक श्रमांशिवाय मनुष्याच्या मनालाही आणि बुद्धीलाही सामर्थ्य प्राप्त होऊ शकत नाही!
- मानवाचे तीन देह आहेत. प्रत्येक मानवाकडे मनोमय देह, प्राणमय देह आणि भौतिक देह आहे. हा भौतिक देह जो आहे म्हणजे शरीर जे आहे त्याच्या अस्तित्याशिवाय प्राणमय देहाला आणि मनोमय देहाला अस्तित्वच मुळी नाही!
- भौतिक देहाशिवाय जो प्राणमय देह आणि जो मनोमय देह जो आहे; त्याला आम्ही काय म्हणतो? एक तर जीवात्मा जीव; जो मनुष्याचं शरीर सोडून जातो आणि तो जर परत आला तर काय होईल? त्याला आम्ही भूत म्हणून घाबरतो. म्हणजेच काय? शारीरिक श्रमाशिवायचे मानसिक आणि बौद्धिक श्रम म्हणजे भूत आहे. भूत किंवा पिश्चाच्च आहे, समंध आहे, हडळ आहे, जाखिण आहे!
- म्हणजे लक्षात घ्या; आम्ही जर शारीरिक श्रम करायला नकार देत असू, शारिरीक श्रम नियमीतपणे करीत नसू तर आम्ही भूत झालेले आहोत! आमचं पिशाच्च झालेलं आहे!
- जीवंत माणसाचं भूत होणं म्हणजे त्याचं मन जे आहे ते रुक्ष होणं, नीरस होणं आणि त्याची बुद्धी जी आहे ती कुंठीत होणं! आणि हे कशाने घडतं? जेव्हा शारीरिक श्रमांचं सहाय्य बौद्धिक श्रमांना- मानसिक श्रमांना मिळत नाही तेव्हाच!
- मन आणि बुद्धी सुद्धा शरीर नावाच्या गोष्टीमध्ये शरीर नावाच्या सांगाड्यामध्ये, जो मेंदू आहे त्याच्यामध्ये ज्या ग्रंथी आहेत त्या शरीराचा पार्ट आहेत; त्या ग्रंथीमधून जे स्राव निघतात म्हणजे हार्मोन्स- जे न्युरोकेमिकल्स निघतात की जे मेंदूमध्ये काम करतात, त्याच्यावरच अवलंबून आहे! मनुष्य कितीही बुद्धीवान असेल, जर त्याला इंजेकशन देऊन झोपवलं तर त्याची बुद्धी कार्य करू शकेल का? नाही करू शकणार! म्हणजेच मनुष्यामाठी त्याच्या प्रत्येक स्टेजमध्ये प्रत्येक कार्यामध्ये स्थूल शरीर जे आहे, स्थूल गोष्टी ज्या आहेत त्याचं महत्व जास्त आहे; म्हणून निगुर्ण निराकाराच्या गोष्टी करीत बसायचं नाही!
- आधी स्थूल जे आहे ते ओळखायला शिका! मग सुक्ष्म रूप शिका. सुक्ष्माला ओळखलं की मगच तरल प्रदेशामध्ये तुम्हाला प्रवेश करता येईल! आम्ही तोंडाने गोष्टी करतो निर्गुण निराकाराच्या आणि वागत असतो फक्त स्थूलामध्येच! स्थूलालाही आम्ही नीट ओळखत नसतो. मग त्या तरल गोष्टींना आम्ही ओळखणार कसं? ही फुकटची बडबड आहे!
- बौद्धिक श्रम करताना आमच्या लक्षात आलं पाहिजे, जर माझ्या शरीरातल्या ग्रंथीनी हार्मोन्स नीट तयार केले नाहीत, तर माझं मन सुद्धा विचित्र पद्धतीने वागायला लागतं आणि बुद्धी विचार करायला लागते!
- काही औषधं अशी आहेत की, एका विशिष्ट वेगळ्या काळासाठी डॉक्टर देतात, पेशंट स्वतःपण घेतो. पण त्या औषधाने माणसाचं मन कसं होतं? बुद्धी कशी होते? तो एकच विचार वारंवार करायला लागतो. इफेक्ट असा होतो की, तो एकच विचार वारंवार करायला लागतो. सारखा तोच तोच विचार. काही कारण नसताना. साधीसुधी गोष्ट, महत्वाचा विचारही नसतो. म्हणजे आमच्या लक्षात येईल की, द्रव्यावर म्हणजे केमिकल्सवर किती आमचे प्राण आणि मन अवलंबून आहेत आणि या प्राणांचं कार्य निर्विघ्न चालण्यासाठी ह्या हार्मोन्सची गरज असते.
- Thyroid हार्मोन्स जर अधिक प्रमाणात वाढला तर मनुष्याच्या अंगावर जरादेखील मांस वाढू शकत नाही. चरबी जमा होऊच शकत नाही. ती व्यक्ती अतिशय अशक्त होत जाते. त्याचे दोन्ही डोळे बाहेर येतात. त्यानंतर त्याचं अंग सतत गरम राहतं. त्याला जरामुद्धा उष्मा सहन होत नाही पल्स रेट जो ७२ असतो तो १३० १४०,१६०, २००, २५० पण होतो. त्याचं हृदय दमतं आणि एका मिनिटात जे ७२ वेळा काम करायचं ते दिडशेवेळा काम करायला लागतं! तेच जर थॉयरा हार्मोन्स कमी झाला; पण साधारण हार्मोन्स वाढलेला असेल तर माणसाची झोप देखील निघून जाते. थॉयरा हॉर्मोन्स कमी झाला खूपच तर काय होतं? मनुष्य जाड होतो नुसता. मग जाडी माणसं म्हणतात, आम्हाला काहीतरी हॉर्मोन्स प्रॉब्लेम असला पाहिजे. काहीच नसतो. thyroid असेल तर ब्लड टेस्टमध्ये कळते. ब्लड टेस्टमध्ये thyroid नॉर्मल आहे तर तुमचा जाडेपणा हा खाण्यामुळेच आहे फक्त! आणि श्रम न करण्यामुळे! त्याला हार्मोन्सचं नाव देऊ नका!
- Thyroidचा दोष आहे तर डॉक्टरांना नीट कळू शकेल. ते सहजतेने कळतं. एक ब्लड टेस्ट केली की, प्रुफ मिळाला. मग ते वजन वाढतं, जड होतं. हालचाल मंदावते आणि मनुष्य सतत झोपत राहतो, मनुष्य खाली बसला की झोपला. त्याप्रमाणे प्रत्येक पटकन झोपणाऱ्या माणसाला हायपो thyroidism आहे असा त्याचा अर्थ नव्हे. ते आळशी आहेत, एवढं समजायचं! आणि ह्याला थंडी अतिशय वाजते, ह्यांना जरासुद्धा गारवा सहन होत नाही. हायपो thyroidism चाही मनुष्य जास्त झोपतो. पण महत्वाची गोष्ट काय होते? ह्याची भूकपण मंदावलेली असते. त्याची झोप वाढलेली आहे आणि भूकही लागतेय त्यांनी समजायचं की आपल्याला thyroidचा काही प्रॉब्लेम नाही. thyroid कमी असणारा मनुष्य जेवतोही कमी पण वजन वाढते आणि झोपतो जास्त! त्याचे पल्सरेट कमी कमी होत जातात. म्हणजे आमच्या लक्षात येईल, त्याच्याबरोबर त्याची मानसिक अंग पण बदलतात. thyroid हार्मोन्स वाढलेला असतो तेव्हा मनुष्य रागीट बनतो. तर ज्याचं thyroid कमी आहेत, असा मनुष्य कोणीही काहीही बोला, शिव्या घातल्या आईबापाला, तरी ठिक आहे. ऐकून घेणार आणि पुढे जाणार. गप्प बसणार. तर रिस्पॉन्स देण्याची क्षमताच बदलते. तर Adrenal नावाच्या ग्रंथी आहेत किडनीच्या वरती. renal म्हणजे किडणी. अॅड म्हणजे जवळ. किडनीच्या जवळ असलेल्या ग्रंथी म्हणजे Adrenal glands. ह्या glands मध्ये सुद्धा हार्मोन्स कमी झाले तर मनुष्य कुठलीच स्ट्रेस सहन करू शकत नाही. लहानशी स्ट्रेस जरी आली, लहानसा तणाव आला तरी खूप गंभीर वाटतो. खूप घाबरून जातो. छाती धडधड वाढते. पोटात खड्डा पडतो. म्हणजे साधी गोष्ट की हातातून पेन पडलं की जे होणं अपेक्षित होतं, ती व्यक्ती आकाश कोसळल्यासारखी घाबरून जाते. झोपेतून दबकून उठायला लागते. लक्षात येईल किती मानसिक परिणाम ह्या गोष्टींमुळे होतो. मेंदूमधल्या न्यूरोट्रान्समिटर्समध्ये बदल झाला, मेंदूमधील केमिकल्समध्ये बदल झाला; तर ह्याच्यामुळे मनुष्याला नैराश्य येऊ शकतं. चांगलं स्फुर्तीदायक मनुष्य नैराश्यवादी बनू शकतो. मनुष्य विकृत विचारपण करू शकतो. लक्षात घेईल की शरीराचा किती मोठा प्रभाव – प्राणांवरती आणि मनावरती आहे!
- शारीरिक ग्रंथीचं महत्वाचं सूत्र काय? जर शारीरिक श्रम माणसाने नीट केले नाहीत, तर ह्या ग्रंथीचं कार्य नीट चालत नाही. पुरुषाच्या काय किंवा स्त्रीच्या काय; दोघांच्यापण शरीरामधील ग्रंथी तेव्हाच नीट कार्य करतात, त्या सगळ्या ग्रंथी एकमेकांशी जोडलेल्या असतात.
- Diabetes का होतो? संबंधित ग्रंथी नीट कार्य करीत नाहीत म्हणून. तिकडे डॉक्टर काय सांगतात? वजन कमी करा म्हणजे चालायला जा. म्हणजे लक्षात येईल, सगळ्या ग्रंथी एकमेकांशी जोडलेल्या आहेत ह्या त्या नात्याने; आणि ह्यांच्या कार्याची सुत्रता कशाने होते? तर शारीरिक श्रमाने!
- शारीरिक श्रम नसतील तर ह्या ग्रंथी नीट कार्य करीत नाहीत. त्यांच्यातून निर्माण होणारे हार्मोन्स कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात निर्माण होतात आणि शरीराचं संतुलन म्हणजे समतोल बिघडतो. हे वैज्ञानिक सत्य आहे आणि म्हणून आम्ही कितीही मोठे – श्रीमंत उद्योगपती असू किंवा लेखक असू किंवा प्रतिभावंत असू, गायक असू किंवा नर्तक असू तरी आम्हाला शारिरीक श्रम करणं आवश्यक आहे!
- शारीरिक श्रम नसतील तर मनुष्याच्या ग्रंथी शरीरात नीट काम करीत नाहीत. त्यांनी नीट कार्य केलं नाही की, मेंदू नीट कार्य करत नाही आणि मेंदूचे कार्य नीट नाही म्हणजे मनाचं कार्य नीट नाही, हृदयाचं कार्य नीट नाही म्हणजे प्राणांचं कार्य नीट नाही. म्हणून शारीरिक श्रमांची अतिशय आवश्यकता आहे!
- आम्हाला विज्ञानाच्या सहायानेही नीट समजू शकतं की, शारीरिक श्रम जर नीट पुरेसे- पाहिजे त्या प्रमाणामध्ये नसतील, तर शरीरातील आंतरस्त्राव ग्रंथी, त्या ग्रंथी आपले स्त्राव म्हणजे हार्मोन्स नीट प्रमाणात तयार करत नाही. आणि त्याच्यावरच आपल्या शरीराच्या चलनवलन क्रिया अवलंबून आहे!
- शारीरिक श्रमांची अतिशय आवश्यकता आहे, बौद्धिक विकासासाठी सुद्धा आणि मानसिक विकासासाठी सुद्धा!
- जी मंडळी शारीरिक श्रम कमी करतात, त्यांच्यामध्ये मानसिक सामर्थ्यपण कमी राहतं आणि बौद्धिक सामर्थ्यपण कमी राहतं. आपोआपच! म्हणून शारीरिक श्रम प्रत्येकाने करायलाच पाहिजेत!
- प्रत्येकाने श्रम करायलाच पाहिजेत. परमात्याला तुमच्याकडून शारीरिक श्रम हवे असतात!
- श्रमाचं महत्व प्रत्येकाला पटलंच पाहिजे!
- चरख्याचं चाक फिरविण्यामध्ये मानसिक श्रम आहेत, बौद्धिक श्रम आहेत आणि शारीरिक श्रमही आहेत!
- परमात्म्याला मानवामध्ये श्रमाचा वृक्ष वाढताना बघायचा असतो! परमात्मा एकच वृक्ष रोपण करतो, ते आहे श्रमाचं!
- परमात्म्याला श्रम अतिशय आवडतात. त्याला श्रम न करणारी माणसं अजिबात आवडत नाहीत!
- श्रम न करण्यासाठी अनेक कारणं देता येतात. सबबी काढायच्या म्हटल्या की शंभर निघतात. श्रम प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहेत. आणि’ `श्रीं’ बीज हे श्रम बीज आहे आणि ह्या बीजाचा संबंध’ `श्री’शी आहे, लक्ष्मीशी आहे!
- `श्रीं’ बीजाची गोष्ट अतिशय विलक्षण व्यक्तीमत्वाशी जोडली गेलेली आहे. भारतीय संस्कृतीतील त्या व्यक्तीबद्दल अतिशय आकर्षण आहे. किंबहुना भारतीय मन ज्या अनेक विशिष्ट विभूतींभोवती गोल गोल फिरत राहतं, आकर्षणाने ओढलं जातं असं हे व्यक्तीमत्व आहे. हे व्यक्तीमत्व म्हटलं तर पुराणांमध्ये आहे, म्हटलं तर वेदांमध्येही आहे, म्हटलं तर दोघांमध्येही नाही. हे व्यक्तीमत्व म्हटलं तर साकार रूप धारण करून आहे, म्हटलं तर ह्याचं रूप कोणालाच माहिती नाही, म्हटलं तर हा व्यक्तिमत्वाच्या कथा अनेक आहेत, म्हटलं तर ह्या व्यक्तिमत्वाच्या एकही कथा नाही! म्हटलं तर हा व्यक्तिमत्वाचं नामस्मरण आम्ही दररोज प्रत्येकजण करीत असतो. इच्छा नसताना सुद्धा आणि म्हटलं तर ह्याचं नामस्मरण कोणीही करीत नाही. म्हटलं तर प्रत्येक मंत्र ह्या व्यक्तिमत्वाशी जोडलेला आहे आणि म्हटलं तर ह्या व्यक्तिमत्वाचा स्वतःचा असा एकही मंत्र नाही. म्हटलं तर हे व्यक्तिमत्व चिरंजिव आहे म्हणजे उत्पन होऊन अंतापर्यंत राहणारं आहे, म्हटलं तर हे व्यक्तीमत्व उत्पन्नच झालेले नाही. म्हटलं तर ह्या व्यक्तिमत्वाने प्रपंचही केलेला आहे; महटलं तर हे व्यक्तिमत्व पूर्णपणे वैराग्यशील आहे. म्हटलं तर हे व्यक्तिमत्व पूर्णपणे ज्ञानमार्गावर चालणारं आहे. दुसऱ्या बाजूला बघितलं तर पूर्णपणे भक्ती मार्गावरून प्रवास करणारं आहे. एका बाजूला बघितलं तर हे व्यक्तिमत्व अतिशय शांत आहे. दुसऱ्या बाजूला तेवढंच कोपाधिष्ट आहे. एका बाजूला अगदी लोण्यासारखं मऊ आहे. लोणीहुनी मऊ आहे. दुसऱ्या बाजूला वज्रासारखं कठोर आहे. हे व्यक्तिमत्व अनेक शस्त्र धारण करतं, अनेक शस्त्र फेकतं. दुसऱ्या बाजूला बघितलं तर त्या व्यक्तिमत्वाने कधीच कुठलंही शस्त्र वापरलेलं नाही. असं ह्या भारतीय संस्कृतीमधील व्यक्तीमत्व कुठलं? मग ह्या व्यक्तिमत्वाचं नाव सांगणं खूप सोपं आहे. कुठलं हे व्यक्तिमत्व आहे; हे सगळे गुण असणारं? म्हटलं तर ऐतिहासिक आहे, म्हटलं तर वास्तवामधील आहे, म्हटलं तर कल्पना विश्वातील आहे! कुठलं असेल व्यक्तिमत्व!
- कारण हे बीज प्राचीन बीज आहे, सुंदर बीज आहे. त्यामुळे ते जुन्या व्यक्तिमत्वांमधीलच व्यक्तिमत्व असलं पाहीजे! हे व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मी!
- सगळी शस्त्र फेकते; पण तिच्या हातात एकही शस्त्र नाही. लक्ष्मीच्या चित्रामध्ये -प्रतिमेमध्ये तुम्ही कुठलं कधी शस्त्र बघितलं हातामध्ये? कधीच नाही.
- हिचा जन्म झालाय का? नाही. मानवासाठी ही कशी प्रकटली? तर समुद्र मंथनातून प्रकटली, समुद्राच्या कुशीतून. अख्खीच्या अख्खी सोळा वर्षाची बाहेर आली म्हणजे जन्म झालेला नाही. अवतार कार्य आहेच. म्हटलं तर लिमिटीशन कुठेच नाहीत!
- लक्ष्मीचं चरित्र बघायचं झालं तर? पार्वती रूपाला चरित्र आहे, सरस्वती रूपाला चरित्र आहे. लक्ष्मी रूपाला कुठलं चरित्र नाही! बघा.
- सरस्वतीचा मंत्र आहे, पार्वतीचा मंत्र आहे. लक्ष्मीचा ॐ लक्ष्मी नमः ह्या नावाशिवाय कुठलाही मंत्र नाही.
- जे श्रीसुक्त आहे ते मंत्र म्हणून असलं तरी बेसिकली महालक्ष्मीच आहे. म्हणजे लक्ष्मीच्या मातेचा आहे.
- ती स्वतः वैभव देणारी आहे; पण ती स्वतः वैराग्यशील आहे. पण हीचं सगळं वैभव जे आहे ते काय आहे? तर प्रभूचे चरण-महाविष्णूंचे चरण! हे तिचं एकमेव वैभव आहे.ती स्वतः अलंकार कधीच धारण करीत नाही. आम्ही तिला अलंकार चढवितो.
- ती कशी आहे? ती कमला आहे, ती पद्मजा आहे. तिच्या गळ्यात माळाही कसल्या आहेत? कमळांच्या आहेत. तिच्या कंबरेला मेखला कसली आहे? कमळांची आहे. तिच्या हातात कंगण कसलं आहे? कमळानाथच आहे. ही पूर्णपणे वैराग्यशील आहे. ही स्वतः वैभव देणारी असून सुद्धा ती कशी आहे? एका बाजूला ती कधीच चिडत नाही. दुसऱ्या बाजूला शांतपणे तिच्या हातात अस्त्र आहे. म्हणून ती न रागावता नुसतं डोळे बंद करून घेतले, तरी माणसाची परिस्थिती दिनवानी होते.
- तिने नुसते डोळेबंद करून घेतले; तुमच्या घराकडे, तुमच्याकडे बघण्याचं थांबविलं तरी दारिद्रय आलंच! म्हणजे तिच्या कोपाचा परिणाम बघा; ती रागावणं दूरच राहिलं, नुसते डोळे बंद केले तरी दारिद्रय आलं!
- ही वेदांमध्ये आहे. वेदांमध्ये श्रीसुक्त आहे. वेदांमध्ये श्रीसुक्त कोणी लिहिलेलं आहे? लोपामुद्रेने लिहिलेलं आहे. कोणासाठी लिहिलेलं आहे. महालक्ष्मीसाठी लिहिलेलं आहे. वेदांमध्ये विष्णूचे स्थान वेगळं आहे. लक्ष्मीचा कुठे उल्लेख नाही. पुराणामध्ये तिचं स्थान आहे. पण कसं स्थान आहे? स्वतःचं स्थान एकही नाही. पार्वती स्वतंत्र कार्य करते, सरस्वती स्वतंत्र कार्य करते. लक्ष्मी फक्त अस्तित्वाने सगळं देत राहते. काही विशेष कृती करताना दिसत नाही. विष्णूबरोबर सगळीकडे जायचं, हाताला धरून बसायचं. बस्स! तरीही तिचा प्रभाव मात्र वेदांवर, पुराणांवर प्रत्येक ठिकाणी जाणवत राहतो.
- आम्ही तिचा उच्चार दररोज करतो. श्रीयुत अमुक अमूक, श्रीमती अमुक अमुक. हा शब्द आपण नेहमी वापरतोच ना. कितीवेळा वापरतो? त्यामधील ‘श्री’ ही श्री आहे.
- कुठलाही मंत्र म्हणताना ‘श्री’ येतोच. ह्याचं अस्तित्व नसेल तर त्या मंत्रांचा होणारा उपयोगही कमी असतो.
- ॐ कृपासिंधू साईनाथाय नमः आणि ॐ कृपासिंधू श्री साईनाथाय नमः ह्यात खूप फरक आहे!
- ॐ अभयदाता स्वामीसमर्थाय नमः आणि ॐ अभयदाता श्री स्वामीसमर्थाय नमः ह्यामध्ये खूप मोठा फरक आहे!
- तो ‘श्री’ जर काढलात तर तुम्हाला त्या मंत्रापासून होणारा फायदा शंभर ऐवजी फक्त पाच टक्के असतो. पण ‘श्री’ जोडला त्याला तर त्याचा फायदा वीस पट वाढतो.
- प्रत्येक मंत्र तिच्यामध्ये आहे, म्हटलं तर तिचा असा कुठलाच मंत्र नाही. असं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे लक्ष्मी आणि ह्याच बीजाची कथा, ‘श्रीं’ बीजाची कथा अर्थात ह्या लक्ष्मीशीच जोडलेली आहे.
- ह्या लक्ष्मीला एकच अतिशय आवड म्हणजे आपल्या पतीची सेवा, पतीला सुख देणं, पतीला आनंद देणं!
- ह्या सगळ्या जगाची स्थिती आणि गती बघून बघून महाविष्णू थकतो. महाविष्णू कशासाठी आहे? ह्या सर्व विश्वासाठी. जो अहोरात्र थकतो, तो एकच आहे हा महाविष्णू. आणि त्याला सुख देणं, त्याला आराम देणं, त्याला गंमत देणं, त्याच्या श्रमांचा परिहार करणं हीच तिने आपली इतिकर्तव्यता मानलेली आहे. आणि म्हणून त्याच्या पलिकडे ती कार्य करताना दिसत नाही आणि त्याची ती अखंड सेवा करते. त्यामुळेच ती आपोआपच भक्तांना, महाविष्णूच्या भक्तांना म्हणजे परमात्म्याच्या प्रत्येक भक्ताला सामर्थ्य देते!
- जानकी माता वर काय देते ?
अष्ट सिद्धी नौ निधि के दाता। अस बर दिन जानकी माता।।
अजर अमर गुननिधि सुत होहू। - नुसता अमर होण्याचा वर कोणीही देऊ शकतो. पण विचार करा, मनुष्य अमर आहे आणि म्हातारा म्हातारा होत आला तर काय होईल परिस्थिती माणसाची? त्यावेळी नको; मरण पत्करलं. बरोबर की नाही? डोकं जमिनीवर टेकलेलं आहे आणि एक फुटही चालता येत नाही; अशा परिस्थितीचा काय उपयोग? अजर म्हणजे वृद्धत्व नाही की, रोग नाही अशी स्थिती म्हणजे अजर. हा वर कोण देऊ शकली? फक्त जानकी. तो सुद्धा कोणाला? हनुमंताला.
- जानकी मातेचं लक्ष्मी मुळ रूप आहे. ती सामान्य भक्ताला कुठला वर देऊ शकणार नाही. ती सगळं देऊ शकते, ती सगळं करत राहते. अशी ही लक्ष्मी आहे.
- त्या लक्ष्मीने आपली इतिकर्तव्यता जाणली, आपल्या कार्यातील जीवनातील श्रम कशाने करायचे हे जाणलं?
- महाविष्णूने त्याच्या पहिल्या अवतारानंतर जेव्हा नरसिंह अवतार धारण करून जाण्याचं ठरविलं प्रल्हादाला वाचविण्यासाठी; तेव्हा ह्या लक्ष्मीने आपल्या बाळासाठी प्रल्हादासाठी खूप श्रम घेतले.
- आपल्या मुलावरचं आपल्या बाळावरचं आईचं प्रेम बघून आणि त्यासाठी तिने केलेले श्रम बघून प्रल्हादाला त्याने `श्री’ विद्येचा एक भाग मंत्र म्हणून दिला. त्या मंत्राने स्तवन करण्यास सुरूवात केली आणि तिकडे प्रकट झालेल्या आदिमातेने लक्ष्मीला वरदान दिलं.
- आदिमाता म्हणते की, अमुक करीन-तमुक करीन असा विचार न करता श्रम करीत राहिलीस. तुला काय अशक्य होतं? योग विद्येच्या सहाय्याने तू काहीही करू शकत होतीस. तू पटकन सहस्त्ररूप धारण केले असतेस. योग विद्या बनून योग विद्येचा वापर करून काही करू शकली असतीस. पण तू ते केलं नाहीस. जे तुझं मुळ रूप ह्याक्षणी प्रकट झालेलं आहे, त्याच्याच गुणधर्माच्या सहाय्याने तू पुढे गेलीस. कुठे चमत्कार न करता तू श्रम केलेस आणि तू एका मानवी बाळाला वाचविलंस. (ह्या मानवासारखे परमात्म्याच्या शक्तीने आल्हादिनीने केलेले श्रम बघा.) आणि हे श्रमच ज्या मानवाच्या जीवनात उतरतील त्याच्या जीवनामध्येच तू सर्व प्रकारची तुझी ऐश्वर्य प्रदान करू शकशील!
- हा आशीर्वाद लक्ष्मीला मातेने दिला. आणि त्याचक्षणाला ह्या आदिमातेने सांगितलं की, हे लक्ष्मी हा स्तंभ जेव्हा गरगरा गरगरा फिरत होता तिच्या भोवती तू वंगण घातलेली होतीस. म्हणजे चारही बाजूंनी मिळून त्याला मिठी मारलेली होतीस तुझ्या शरिराने – तुझ्या देहाने, त्या सगळ्याच्या घुमण्याचा, चक्राकार फिरण्याच्या, चक्राकार फिरल्यामुळे जो ध्वनी उत्पन्न झाला तो ध्वनी हा तुझा बीजमंत्र असेल.
- कुठला जर गुऱ्हाळ बघितलं, रस्त्यावर ड्रिल मशीन बघितली; त्याला कर्कश आवाज नसतो. एक स्तंभ दुसऱ्या जागेवर घासला जातो गोलगोल गोलगोल गोलगोल गोलगोल आणि येणारा आवाज ‘श्रीं’ हाच आहे. अगदी सहजतेने तुम्ही ऐकू शकता कोणीही घरामध्ये. हा ‘श्रीं’ ध्वनी कुठून उत्पन्न झालेला आहे? जेव्हा एका स्तंभाभोवती त्या लक्ष्मी मातेने स्वतःचा देह गुंडाळला तेव्हाच. आणि आतमध्ये कोण होता? महाविष्णू!
- जीवनामध्ये हा जो ‘श्रीं’ आहे मंत्र, हा अतिशय महत्वाचा आहे. कारण हे श्रमबीज आहे. हे लक्ष्मीबीज आहे आणि मुख्य म्हणजे हे बीज, ह्या बीजाला मान्यता कोणी दिलीय? साक्षात आदिमातेने दिलीय. आदिमातेच्या गायत्री रूपाने दिलीय, महिषासुरमर्दिनी रूपाने दिलीय, अनसूया रूपाने दिलीय. कोणासाठी दिलीय ? एका सामान्य मानवासाठी दिलीय. नव्हे तर दानवाच्या पुत्राकरिता दिली!
- सामान्य माणसासाठीपण नाही. तो तर दानव आहे. दानवाची व्याख्या आपणास माहित आहे. तर दानवाच्या मुलासाठी दिलीय; जो चांगला बनू इच्छितो. आणि म्हणून हे `श्रीं’ बीज जे आहे हे मानवासाठी सर्वात जवळचं बीज मानलं गेलेलं आहे.
- म्हणून मानवाच्या प्रत्येक मंत्रामध्ये ऋषींनी ह्या `श्रीं’ बीजाला अंतर्भूत करण्याचं धोरण स्वीकारलं!
- हे `श्रीं’ लक्ष्मी बीज आहे. ते वैभव देतं, संपत्ती देतं, सत्ता देतं, यश देतं, किर्ती देतं, शांती देतं आणि तृप्तीही देतं. मनुष्याला जे जे म्हणून हवंय ते सगळं देण्याची ताकद ह्या बीजामध्ये आहे. ह्या लक्ष्मीमध्ये आहे.
- धनत्रयोदशीला आम्ही काय करतो? आम्ही धनलक्ष्मी पूजनही करतो आणि दत्तात्रेयांचा मंत्र म्हणून हवनही करतो. जो गुरुमार्गी आहे, जो श्रद्धावान आहे त्याच्याचसाठी ही ‘श्री’ फलदायी आहे, लक्षात ठेवा.
- आपण मातृवात्सल्यविन्दानम् वाचलेलं असेल तर आपल्याला कळेल की त्या लक्ष्मीला आणि त्या महालक्ष्मीला म्हणजे आदिमातेला आणि ह्या भक्तमातेला ह्या दोघींची एकरूप प्रार्थना, जे श्रीसुक्त आहे ते सिद्ध कोणी करून घेतलं? दत्तात्रेयांनी. श्रीयंत्र कोणी सिद्ध करून घेतलं? दत्तात्रेयांनी. त्या तिघांचा एकत्रित मंत्र तो `श्री’ मंत्र आहे. तो कोणी सिद्ध करून घेतला? दत्तात्रेयतांनी.
- गुरुच्या स्मरणाशिवाय आणि गुरुबीजाशिवाय ह्या `श्रीं’ बीजाला कार्य प्रभाव नाही.
- आम्ही गुरुभक्ती करीत नसलो तर आम्हाला लक्ष्मीची सर्व ऐश्वर्य मिळणं शक्य नाही. आमच्या काम्य उपासनेनुसार एक एक गोष्ट आम्हाला मिळत राहिल, पण आम्हाला सगळं हवं असतं. जर सर्व हवं असेल आम्हाला तर मला लक्षात घेतलं पाहिजे की, ह्या लक्ष्मीचा सगळ्यात मोठा प्रवास जो आहे तो कोणी घडून आणलेला आहे? दत्तात्रेयांनीच घडवून आणलेला आहे. श्रीसुक्त श्रीपीठ श्रीपुरम्य पुरम्भवेत, हे सांगतात स्पष्टपणे. श्रीचक्र, श्रीपूर, श्रीमंत ह्या सगळ्या गोष्टी कोणी दिल्यात तिला? दत्तात्रेयांनी प्राप्त करून दिलेल्या आहेत. आणि म्हणून गुरुभक्ती आणि मग ‘श्रीं’ बीजाचा वापर. गुरुमंत्रामध्ये गुरुचा मंत्र ह्या अर्थाने गुरुमंत्र.
- मंत्रामध्ये `श्री’ शब्द येतो आणि तो `श्री’ शब्द त्या गुरुच्या नामामुळे खरोखरच अधिक हजारोपटीने तुमच्यासाठी सोईचा झालेला असतो, सोपा झालेला असतो, अधिक सुफल फलदाई झालेला असतो, उचित फलदाई झालेला असतो.
- हे ‘श्रीं’ बीज लक्ष्मीमातेचे श्रम आहेत. लक्ष्मी मातेने फिरताना त्या स्तंभाला घेऊन त्या घर्षणामुळे जो ध्वनी उत्पन्न झाला तो ध्वनी म्हणजे ‘श्रीं’ आहे. म्हणून ते श्रम बीज आहे. त्यामध्ये त्या भक्तमातेचे लक्ष्मीचे श्रम आहेत.
- श्रमांशिवाय लक्ष्मी नाही, हे पहिलं लक्षात घ्या.
- श्रमांशिवाय लक्ष्मी नाही.
- श्रम कसे? चोरी करणारा चोर श्रमच करतो. पण कसे श्रम? तर उचित श्रम. मर्यादेमध्ये राहणारे श्रम. निती मर्यादांनुसार होणारे श्रम.
- चोरी करण्यासाठी कोणाचा खून केला तर श्रमच करावे लागतात. त्या श्रमाला श्रम म्हणत नाहीत. त्याला प्रयास म्हणत नाहीत. त्याला पुरुषार्थ म्हणत नाहीत. श्रम म्हणजे पुरुषार्थ म्हणून ‘श्रीं’ हे पुरुषार्थाचं बीज आहे.
- श्रम कुठले? तर पुरुषार्थी श्रम. उचित फलप्राप्ती घडून आणणारे श्रम. त्याचं बीज ‘श्रीं’ आहे.
- आपल्याला नेहमी सांगितलं जातं मंगलकार्यात नेहमी ‘श्री’ काढा. का? प्रत्येक नावाच्या आधी ‘श्री’ लावा. का? केवळ ह्याच गोष्टीसाठी!
- ह्या परमेश्वराने, ह्या परमात्म्याने सगळं श्रम करूनच तयार केलेलं आहे. ह्या भक्त मातेने एका बालकासाठी किती श्रम घेतलेले आहेत. त्या श्रमातून ह्या मंत्राची उत्पत्ती आहे, ह्या बीज मंत्राची उत्पत्ती आहे, त्या आदिमातेचा वरदानाची उत्पत्ती आहे प्रत्येक मानवासाठी!
- आम्हाला श्रमांशिवाय लक्ष्मीचं वरदान मिळू शकत नाही. म्हणून ‘श्रीं’ बीज आम्ही प्रत्येक ठिकाणी गातो.
- हे ‘श्रीं’ बीज जो विसरतो, तो परिक्षेत कधीच यशस्वी होवू शकत नाही. त्याला गुरुतत्व कधीच जवळ करू शकणार नाही.
- नुसते तोंड पाटीलक्या करणारे आणि श्रम न करणारे लोकं यांना खरा सद्गुरु कधीही जवळ करीत नसतो. ते त्याच्या जवळ उभे राहू शकतात. आम्ही जवळ असल्याचे दाखवू शकतात. तो त्यांना जवळचा मानत नसतो.
- जे श्रम करतात त्यांच्यावरच त्याचं प्रेम असतं; हे कधीही विसरू नका! आणि तोही भुलतो कशाला? हे परमात्मा तत्व जे आहे ते प्रेमालाही भुलतं आणि प्रेमपुर्वक केलेल्या श्रमालाही पण.
- त्याचंच अग्रज असणारे रूप जे आहे, दत्तात्रेय जो आहे त्याचा अग्रज मोठा भाऊ. तो मात्र कसा आहे? तो प्रेम असल्याशिवाय विचारच करत नाही कसला. परमात्मा कसा? प्रेम नसलं तरी विचार करतो. प्रेम कमी असलं तरी विचार करतो. दत्तात्रेय विचार कधी सुरु करतो? प्रेम आहे म्हटल्यावर विचार सुरू करतो. आणि प्रेम असेल, श्रम असेल तरच तो विचारात घेतो. नाहीतर नाही.
- तुम्ही जे काही कराल, तुम्ही बौद्धिक काम करीत असाल, मानसिक काम करीत असाल तरी शारीरिक श्रमांची लाज धरू नका आणि शारीरिक श्रम म्हणजे दररोजचा एक तासाचा जीम मधला व्यायाम नव्हे. ती गोष्ट वेगळी आहे. ज्याला निर्मिती मुल्य आहे त्यालाच श्रम आणि पुरुषार्थ म्हटलं जातं. आम्ही व्यायाम करतो तो स्वतःसाठी, शरीर दाखविण्यासाठी. श्रम म्हणजे त्याला निर्मिती मुल्य असणं. तोच पुरुषार्थ. असे श्रम करा!
- चांगले निर्मिती मुल्य असणारे श्रम हे जीवनामध्ये खऱ्या लक्ष्मीचे आशीर्वाद आणि वरदान देवू शकतात!











