विजयी योद्ध्याला सलामी! (लेखांक-१)

सन्माननिय स्वर्गीय विजय मुंबरकर साहेब आज आपल्यामध्ये देहरूपाने नाहीत. मात्र त्यांनी निर्माण केलेला आदर्श, त्यांनी केलेली लढाई, त्यांनी केलेले कार्य कधीच विस्मरणात जाणार नाही. जरी ते देहरुपाने आमच्यामध्ये नसतील तरी त्यांनी दिलेला विचार चिरकाल टिकणारा आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने विजयी होते आणि सदैव विजयी असतील! आम्हाला नेहमीच साथ देणाऱ्या, आमच्यावर सदैव प्रेम करणाऱ्या विजय मुंबरकर साहेबांवर मृत्यु पश्चात लेख लिहावा लागेल; असा कधीच मनात विचार आला नाही! शेवटी मृत्यू हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे; हे प्रत्येकाला मान्य करावेच लागते आणि हे सूत्र मान्य केल्यावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला देहाचा त्याग करावाच लागतो! त्यानुसार गेल्या दहा दिवसात चिंतन- मनन केल्यावर एक गोष्ट मात्र विजय मुंबरकर यांच्याबाबतीत लक्षणीय ठरते; ती म्हणजे ते भ्रष्ट कारभार, भ्रष्ट व्यवहार, भ्रष्ट नीती, भ्रष्ट आचार ह्या मानवी जीवनाला घातक असणाऱ्या गोष्टींविरोधात योद्ध्यासारखे लढले व त्यामागील त्यांचा विचार, त्यांचे ध्येय हे मात्र अजरामर आहेत! अशा विजयी योद्ध्याला श्रद्धांजली नाही तर आम्ही सलामी देतोय! तीही विजयी सलामी! विजयी योद्ध्याला अर्थात विजय मुंबरकर साहेबांना सलामी!

विजय मुंबरकर साहेबांना जाऊन आज दहा दिवस झाले! त्यांचा देह अनंतात विलीन झाला! त्यांचा आत्मा त्या परमात्म्यामध्ये एकरूप झाला! त्यांच्या जाण्याने आम्ही दु:खीत झालो! आमच्यासाठी हे वेदनादायी होते! कारण ते आमचे आदर्श होते! वडीलकीच्या नात्याने ते आमच्यावर रागवत आणि प्रेमही करीत! मात्र या दोन्ही भावना व्यक्त करताना त्यांच्या मनात नेहमी आपुलकी असायची, प्रेमळपणा असायचा! त्यामुळे त्यांच्याशी संवाद करताना नेहमी कायदे, नियम, प्रशासकीय कामकाज, समाजवाद, इतिहास, राजकारण अशा अनेक विषयांची परिपूर्ण माहिती मिळायची! असे अनेक सद्गुण आम्ही विजय मुंबरकर यांच्याकडे पाहिले आणि अनुभवले सुद्धा!

विजय मुंबरकर यांच्या अचानक जाण्याने त्यांची पत्नी श्रीमती शैलजा, पुत्र श्री. आशय तसेच मेहुणी श्रीमती सुषमा शेटये आणि इतर सर्व कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यावर दुःखाचा पर्वत कोसळला. विजय मुंबरकर हे क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज परिवर्तन पॅनेलचे अध्यक्ष होते! ते परिवर्तन समितीचे प्रमुख या नात्याने परिवर्तन समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांच्यावरही दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागले! या दुःखातून बाहेर पडण्याची ताकद सर्वांना मिळो, ही परमात्म्याच्या चरणी प्रार्थना! ही प्रार्थना करताना विजय मुंबरकर साहेबांनी योद्ध्यासारखं लढून नेमका कशावर विजय मिळविला होता? ते आपण पुढील लेखात पाहणार आहोत!

आजच त्यांनी आपला देह सोडून दहा दिवस झाले! त्यानिमित्ताने त्यांना सलामी देणारा हा संपादकीय लेख त्यांना समर्पित करीत आहोत!

-नरेंद्र हडकर

error: Content is protected !!