अटल टिंकरींग संशोधन स्पर्धेत महाराष्ट्रातील चार शाळांची निवड

नवी दिल्ली: नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या `अटल टिंकरिंग इनोव्हेशन` स्पर्धेत देशातील सर्वोत्तम ३० विद्यार्थी संशोधनांची निवड करण्यात आली. महाराष्ट्राने यात बाजी मारली असून पुण्यातील दोन व कोल्हापूर व नागपूर येथील प्रत्येकी एक अशा सर्वाधिक ४ शाळा एकट्या महाराष्ट्रातून निवडण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांमधील संशोधकवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्याकडून नवनवीन संशोधन घडवून आणण्यासाठी नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत `अटल टिंकरिंग इनोव्हेशन` स्पर्धेचे ६ महिन्यापूर्वी आयोजन करण्यात आले. लवकरच नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार हे निवड झालेल्या संशोधनांसाठी पुरस्कारांची घोषणा करणार आहेत.

स्पर्धेत निवड झालेल्या सर्वाधिक ४ शाळा महाराष्ट्रातील

या स्पर्धेत सर्वाधिक ४ संशोधन ही महाराष्ट्रातून निवडण्यात आली. राज्यातील चार पैकी दोन संशोधन ही एकट्या पुणे येथील व एकाच शाळेची आहेत. पुणे येथील निगडी भागातील जनप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘जलव्यवस्थापन’ व ‘आरोग्य’ या विषयांवर तयार केलेल्या दोन वेगवेगळ्या संशोधनांची निवड करण्यात आली. या शाळेचे विद्यार्थी मल्हार लिंबेकर, वरूण कोल्हटकर आणि तन्मय वाल्हेकर यांनी ‘जलव्यवस्थापनावरील’ संशोधन केले असून अरूंधती जाधव या शिक्षेकेने त्यांना मार्गदर्शन केले आहे. श्रावणी लिमये, जय अहेरकर आणि श्रेया गायकवाड या विद्यार्थ्यांनी ‘आरोग्य’ विषयावरील संशोधन केले असून योगीनी कुलकर्णी या शिक्षेकेने त्यांना मार्गदर्शन केले आहे.

‘जलव्यवस्थापन’ या विषयावर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगुड येथील ‘शिवराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचीही निवड झाली आहे. या शाळेचे प्रथमेश उदय शेटे, अनुजा आनंद पाटील आणि मुबना सिंकदर शिकलगर यांनी हे संशोधन केले असून उदय शेटे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे.

नागपूर येथील रामदासपेठ भागातील सोमलवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले ‘स्वच्छ ऊर्जा’ विषयावरील संशोधनाची निवड झाली आहे. या शाळेचे निनाद अजने, वल्लभ कावरे आणि अनुराग अपराजित यांनी हे संशोधन केले असून शाळेचे शिक्षक एल.आर.पांडे यांनी मार्गदर्शन केले आहे.

अशी झाली ३० संशोधनांची निवड

`अटल टिंकरिंग इनोव्हेशन` स्पर्धेत स्वच्छ उर्जा, जलसंपदा, कचरा व्यवस्थापन,आरोग्य, कृषी तंत्रज्ञान आणि स्मार्ट मोबीलिटी या ६ विषयांवर शालेय विद्यार्थ्यांकडून संशोधन कार्य मागविण्यात आली होती. देशभरातून या स्पर्धेसाठी ६५० संशोधन पाठविण्यात आले होते, पैकी १०० संशोधनांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या १०० संशोधनासाठी विद्यार्थ्यांना या संशोधनात आवश्यक सुधारणा व प्रभावी कार्य करण्यासाठी वेळ देण्यात आला. पुन्हा या १०० संशोधनांमध्ये स्पर्धा घेण्यात आली व अंतिमत: देशातील उद्योग व शिक्षण क्षेत्रातील नामवंत व तज्ज्ञांनी ३० संशोधनांची निवड केली. स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ६ विषयांपैकी प्रत्येक विषयासाठी देशातील ५ संशोधनांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतील ३ आणि उत्तर प्रदेशातील २ शाळांची निवड या स्पर्धेसाठी झाली आहे. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *