‘सौभाग्य’ योजना- १६ खेड्यातील ५ लाख घरांना वीज जोडणी!

महाराष्ट्रातील १९२ खेड्यांमध्ये ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी

नवी दिल्ली:- देशातील गोरगरीब जनतेच्या घरात वीज पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य’ योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील १६ हजार ८५० खेड्यांना मोफत वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील १९२ खेड्यांचा यात समावेश असून ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या ग्राम स्वराज विभागाच्यावतीने व केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या मदतीने देशातील वीज जोडणीपासून वंचित असलेल्या जनतेला वीज जोडणी देण्यासाठी ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य’ योजना सप्टेंबर २०१७ मध्ये सुरु करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. या योजनेनुसार देशातील प्रत्येक खेड्याला मार्च २०१९ पर्यंत वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून गेल्या ७ महिन्यांपासून आजपर्यंत देशभरातील २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील १६ हजार ८५० खेड्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे. ज्याद्वारे ५ लाख १९ हजार ३५८ घरांना जोडणीचा लाभ मिळाला आहे.

विदर्भातील ५ हजार २३७ घरांना वीज जोडणी

सौभाग्य योजना सुरु झाल्यापासून राज्यातील एकूण २३ जिल्ह्यांतील १९२ खेड्यांना या योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात आली आहे. यानुसार विदर्भातील सर्वच ११ जिल्ह्यांतील १४० खेड्यांतील ५ हजार २३७ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील ४२ खेड्यांतील २ हजार ९३८ घरांना, पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील ९ खेड्यांतील ५४२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आणि खान्देशातील १०३ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

सौभाग्य योजनेंतर्गत विदर्भात सर्वात जास्त गडचिरोली जिल्ह्यात वीज जोडणी देण्यात आल्या. गडचिरोली जिल्ह्यातील ८ खेड्यांतील ११५९ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. यासोबत अकोला जिल्ह्यातील ३४ खेड्यांमधील ४१० घरांना, अमरावती जिल्ह्यातील २५ खेड्यांमधील ७३५ घरांना, भंडारा जिल्ह्यातील ७ खेड्यांतील २४४ घरांना, बुलडाणा जिल्ह्यातील २२ खेड्यांतील ५६५ घरांना, चंद्रपूर जिल्ह्यातील ७ खेड्यांतील ७४४ घरांना, नागपूर जिल्ह्यातील ४ खेड्यांतील १०२ घरांना, गोंदिया जिल्ह्यातील ३ खेड्यांतील ५९ घरांना, वाशिम जिल्ह्यातील १५ खेड्यांतील ४२६ घरांना, यवतमाळ जिल्ह्यातील १३ खेड्यांतील ७८८ घरांना, वर्धा जिल्ह्यातील २ खेड्यांतील ५ घरांना सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात आली आहे.

मराठवाड्यातील २ हजार ९३८ घरांना वीज जोडणी

या योजनेंतर्गत मराठवाडा विभागात नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त १२१७ घरात वीज जोडणी देण्यात आली. या जिल्ह्यातील २० खेड्यांमध्ये ही जोडणी देण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील ३ खेड्यांमधील ४०४ घरांना, औरंगाबाद जिल्ह्यातील एका खेड्यातील ७२ घरांना, बीड जिल्ह्यातील ३ खेड्यांतील १५७ घरांना, हिंगोली जिल्ह्यातील ५ खेड्यांतील ४८० घरांना, लातूर जिल्ह्यातील ७ खेड्यांतील ३४९ घरांना, उस्मानाबाद जिल्ह्यातील २ खेड्यांतील ७८ घरांना आणि जालना जिल्ह्यातील एका खेड्यातील १८१ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील ५४२ घरांना वीज जोडणी

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात या योजनेंतर्गत सर्वात जास्त ४५५ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे, या जिल्ह्यात एकूण ७ खेड्यात वीज जोडणी देण्यात आली. तसेच सातारा जिल्ह्यातील एका खेड्यात ६५ व कोल्हापूर जिल्ह्यातील एका खेड्यातील २२ घरांना या सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात आली आहे.

खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील एका खेड्यामध्ये या योजनेंतर्गत १०३ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *