`स्वच्छता पंधरवडा` अंतर्गत महाराष्ट्रातील ४ संस्थांना पुरस्कार

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्रातील ४ संस्थांना केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) गिरीराज सिंह यांच्या हस्ते आज पुरस्कार प्रदान करण्यात आले.

येथील प्रवासी भारतीय भवनात केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ६ श्रेणींमध्ये एकूण १८ पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील ४ संस्थांना यावेळी सन्मानित करण्यात आले. मंत्रालयाचे सचिव अरुण पांडा व अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

देशभरात १६ ते ३० जून २०१८ दरम्यान केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. पंधरवड्या दरम्यान उत्कृष्ट ठरलेल्या संस्थांचा या पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

औरंगाबाद येथील आयजीटीआर संस्थेला २ पुरस्कार

औरंगाबाद येथील इंडो जर्मन टूल रूम (आयजीटीआर) संस्थेला या समारंभामध्ये देशातील सर्वात स्वच्छ टूल रूमचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच संस्थेला पेयजल व स्वच्छता मंत्रालय व केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत उत्कृष्ट कार्यासाठी तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक एच. डी. कापसे यांनी पुरस्कार स्वीकारला.

मुंबई स्थित टेस्टिंग सेंटरला सर्वोत्कृष्ट स्वच्छ टेस्टिंग सेंटरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे संचालक ए.आर. गोखले यांनी पुरस्कार स्वीकारला.

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग आयुक्तालयाचाही सन्मान

या समारंभात देशातील दोन खादी ग्रामोद्योग आयुक्तालयांना स्वच्छता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग आयुक्तालयाला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयुक्तालयाचे संचालक डॉ. व्ही.के. नगर यांनी पुरस्कार स्वीकारला.

वर्धा येथील संस्थेला प्रोत्साहनपर पुरस्कार

वर्धा येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्था (एमजीआयआरआय) ला स्वच्छतेच्या कार्यासाठी प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे उपसंचालक रवीकुमार कंदास्वामी यांनी पुरस्कार स्वीकारला.(‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *