राज्य शासनाची ‘संवाद वारी’ पंढरीच्या दारी- विशेष उपक्रम

मुंबई:- अवघा महाराष्ट्र आता भक्तीमय झाला आहे. ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम’च्या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भक्तगणांमुळे महाराष्ट्र वारीमय झाला आहे. या भक्तमेळ्यात यंदा महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय ‘संवाद वारी’ हा अभिनव उपक्रम घेऊन सहभागी झाले आहे. यातून शासनाच्या अनेकविध योजना, उपक्रम विविध घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

‘संवाद वारी’ द्वारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व श्री संत तुकाराम पालखी सोहळा या दोन्ही मार्गावर पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी प्रदर्शन, पथनाट्य, लोकनाट्य उपक्रम आयोजित केले आहेत. शासनाच्या शांती आणि ग्राम विकासाशी निगडीत विविध योजना, उपक्रमांची माहिती या ‘संवाद वारी’ तून दिली जाणार आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, अखंड वीजपुरवठा,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, बाजार समित्यामध्ये सुधारणा, डिजिटल सात-बारा,उन्नत शेती – समृद्ध शेतकरी, महात्मा फुले जन आरोग्य योजना अशा विविध योजनांच्या माहितीचा यात समावेश असेल.

पंढरपूर येथे आयोजित केल्या जाणाऱ्या पाच दिवसांकरिताच्या भव्य प्रदर्शनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘संवाद वारी’ चे दालन असणार आहे.

श्री संत तुकाराम महाराज पालखी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर या ‘संवाद वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ पुण्यातून शनिवारी दि. ७ जुलैपासून होत आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण व तारीख :

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग –

पुणे येथे दि. ७, ८ व ९ जुलै,
लोणी काळभोर – दि. ९,
यवत – दि. ९, १० व ११,
बारामती- दि. ११, १२, १३ व १४,
निमगाव केतकी – दि. १४ व १५,
बेलवंडी- दि. १५,
इंदापूर- दि. १५, १६, १७,
अकलूज- दि. १७, १८, १९,
वाखरी- दि. १९, २०, २१, २२,
पंढरपूर- दि. २२ ते २५ जुलै.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग –

सासवड- दि. ९ व १० जुलै,
जेजुरी- दि. १०, ११, १२,
लोणंद-दि. १२ व १३,
तरडगाव- दि. १३ व १४,
फलटण- दि. १४, १५, १६,
नातेपुते- दि. १६ व १७,
माळशिरस- दि. १७, १८,
वेळापूर- दि. १८ व १९,
भंडीशेगाव- दि. २०,
बाजीराव विहीर- दि. २० व २१,
पंढरपूर- २१ ते २५ जुलै.

दोन्ही पालखी मार्गावर विशेष चित्ररथ देखील सहभागी होणार आहे. शासनाची महसूल यंत्रणा, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, मंदिर व संस्थान यांच्या सहकार्याने ‘संवाद वारी’ चे आयोजन करण्यात आले आहे. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *