‘महाराष्ट्र माझा २०१८’ छायाचित्र स्पर्धा छायाचित्र पाठवा

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम; छायाचित्रांचे भरणार राज्यभर प्रदर्शन

मुंबई:- महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा 2018’ छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही स्पर्धा आज जाहीर केली आहे.

या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी दर्जेदार छायाचित्र पाठविण्याचे आवाहन महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे २५ हजार रूपये, २० हजार रूपये, १५ हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत.

‘महाराष्ट्र माझा’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा, मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र, माझी कन्या भाग्यश्री, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील.

स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी maharashtramaza2018@gmail.com या ईमेल वर दि.३१ जुलै २०१८ पर्यंत छायाचित्र पाठवावीत. ही छायाचित्रे पाठविताना छायाचित्रकाराने आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच ही छायाचित्र १८X३० इंच एचडी (हाय रिझॉल्युशन) असावीत. या स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून सादर होणाऱ्या छायाचित्रांवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे हक्क राहतील.

राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.(‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *