हरित सेनेतील सदस्य नोंदणी-गती देण्यासाठी विविध समित्या
मुंबई:- राज्यात वनेत्तर क्षेत्रात वृक्षारोपण वाढावे, सध्याचे २० टक्क्यांचे वृक्षाच्छादनाचे प्रमाण वाढून ते राष्ट्रीय वननीतीप्रमाणे ३३ टक्क्यांपर्यंत जावे यासाठी वन विभागाने महत्त्वाकांक्षी पाऊले टाकली असून त्यापैकीच एक हरित सेनेची स्थापना आहे. हरित सेनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आता राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून हरित सेनामध्ये सदस्य नोंदणीच्या कामाला गती देण्यात येईल. वन विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय दि. १ जून २०१८ रोजी निर्गमित केला आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. तर वृत्तस्तरीय समितीचे अध्यक्ष त्या त्या महसुली विभागाचे आयुक्त असतील. जिल्हास्तरावर हरित सेना उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा समितीचे अध्यक्ष असतील. या प्रत्येक स्तरावरील समितीमार्फत हरित सेना उपक्रमाच्या वृद्धीसाठी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार असून सभासदांपर्यंत एकाच वेळी संदेश, ईमेल, फेसबूक, वॉटसॅप, व्टिटर यासारख्या समाजमाध्यमांचा देखील उपयोग केला जाणार आहे.
हरित सेनेत सहभागी होऊन वनसंवर्धन आणि संरक्षणाच्या कामात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांना वन विभागाकडून प्रशिक्षण दिले जाणार असून त्यासंबंधीचे ऑनलाईन ट्रेनिंग मॉड्युल तयार करताना त्यात कोणते विषय घ्यावेत याचे मार्गदर्शन देखील विभागाने केले आहे. महाराष्ट्र हरित सेना सदस्यांचा वृक्षलागवड, संगोपन आणि देखभालीतील सहभाग, रॅली फॉर रिव्हर मधील सहभाग, वन्यजीव व्यवस्थापनातील सहभाग, वन संरक्षण गस्तीमधील सहभाग, मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यामधील सहभाग, वन वणवा कमी करणे, आगीपासून प्रतिबंध करण्याच्या कामातील सहभाग, वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण थोपवणे, निर्मुलन करणे, वन विभागाच्या दिन विशेषानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणे रोपवन निर्मितीमध्ये योगदान देणे अशा विविध पद्धतीने हरित सेनेचे सदस्य वन विभागाच्या कामात सहभागी होऊ शकतात. त्यांना यासंबंधीची माहिती देऊन प्रशिक्षित करण्याचे काम या समित्या करतील. या सर्व समित्यांची दर महिन्याला बैठक होणे आवश्यक आहे असे ही या शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे. हा शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक २०१८०६०११२१२१३२९१९ असा आहे.
पर्यावरण रक्षणासाठी सर्वात मोठी सेना महाराष्ट्रात उभी राहणार – सुधीर मुनगंटीवार
राज्यात वन, वन्यजीव रक्षण आणि संवर्धनाच्या कामात स्वंयसेवकांची एक फौज उभी रहावी, त्यांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे आणि संवर्धनाचे काम व्हावे यासाठी देशातील सर्वात मोठी फौज हरित सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात उभी रहात असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आजघडीला ५३ लाखांहून अधिक लोकांनी, स्वंयसेवी -सामाजिक संस्थांमधील सदस्यांनी हरित सेनेत आपलं नाव नोंदवले आहे. आपल्याला राज्यात १ कोटीची हरित सेना निर्माण करायची असून त्यासाठी विविध स्तरावर स्थापन झालेल्या या समित्या नक्कीच उपयुक्त ठरतील असा विश्वासही वनमंत्र्यांनी व्यक्त केला. (‘महान्यूज’)