प्लास्टिक उत्पादन कंपन्यांनी विघटनासाठी पुढाकार घ्यावा – उद्योगमंत्री सुभाष देसाई

प्लास्टिक उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निर्यातदारांचा गौरव

मुंबई:- प्लास्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी प्लास्टिक विघटन आणि त्याचा पुनर्वापर व्हावा यासाठीचे नाविन्यपूर्ण संशोधन करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. ‘द प्लास्टिक एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल’ द्वारा आयोजित एक्स्पोर्ट अॅवार्ड फंक्शन या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्लास्टिक उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निर्यातदारांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य विभागाचे सह सचिव श्यामल मिश्रा, प्लेक्स कौन्सिलचे अध्यक्ष अशोक कुमार बासाक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. श्री.देसाई म्हणाले, प्लास्टिक उद्योगासमोर आज अनेक आव्हाने आहेत, मात्र जागतिकस्तरावर प्लास्टिकची वाढती मागणी बघता प्लास्टिक निर्यातीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यात या उद्योगासाठी वेगळे क्लस्टर निर्माण करून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यात लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांसाठी सुविधा केंद्राचा समावेश असेल. राज्यात तसेच देशातील काही भागात ५० मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिकवर बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे विघटन आणि पुनर्वापर याबाबतीत अधिकाधिक संशोधन होण्याची गरज आहे. राज्यात सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर प्लास्टिक अँड इंजिनिअरींग (सिपेट) ही संस्था चांगले काम करीत आहे. या संस्थेच्या अधिक शाखा उघडण्यात येतील. ‘इज ऑफ डुइंग बिजनेस’ मध्ये राज्याचा नंबर पुन्हा एकदा पहिल्या तीन मध्ये आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही उद्योगमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले.

पुरस्कार प्राप्त प्लास्टिक निर्यातदारांचे अभिनंदन करताना श्री.मिश्रा यांनी जागतिकस्तरावर उपलब्ध असलेल्या प्लास्टिक निर्यातीच्या संधींची माहिती दिली. अमेरिका, चीन, लॅटिन अमेरिका, अफ्रिका या देशात भारतातून प्लास्टिक निर्यात होण्याचे प्रमाण उत्तम आहे. इतर देशातील बाजारपेठेत शिरकाव करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रान्स, जपान, चेक रिपब्लिक, नॉर्वे यासारख्या अनेक देशात निर्यातीच्या संधी उपलब्ध आहेत. प्लास्टिक निर्यातीत कच्च्या मालाची जास्त प्रमाणात निर्यात होते. मात्र प्लास्टिकपासून तयार झालेल्या उत्पादित मालाची निर्यात करण्यावर भर द्यावा, जेणेकरून देशातील प्रशिक्षित मनुष्यबळास रोजगाराच्या संधी मिळतील अशी आशा श्री.मिश्रा यांनी व्यक्त केली. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!