महाराष्ट्र शासन शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविणार

गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जाणून घेतल्या शिक्षकांच्या अडचणी

अमरावती:- ज्ञानदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम अविरतपणे शिक्षक करीत असतात. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कर्तबगार विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातून घडते, असे महत्वपूर्ण काम करीत असताना त्यांचे कौटुंबिक व वैयक्तीक प्रश्न सोडवून मनोबल वाढविणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्र मानव विकासाचं केंद्र ठरण्यासाठी शिक्षकांचे सर्वच प्रश्न तातडीने सोडविण्यात येतील, असे आश्वासन गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित सहविचार सभेत अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, शिक्षण उपसंचालक श्री. काळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी नीलिमा टाके, व्यवसाय शिक्षणाधिकारी, दिनेश सूर्यवंशी, शिक्षण विभागाचे श्री. बोलके, श्री रोडे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, शिक्षकांच्या गाऱ्हाणी व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांच्या निवेदनांवर कार्यवाही जलद गतीने करावी. तसेच त्यांनी दाखल केलेल्या तक्रारींवर सकारात्मक तोडगा काढून तातडीने निपटारा करावा. शिक्षकांकडून प्राप्त होणाऱ्या निवेदनांवर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत अनुपालन अहवाल सादर करावा. तसेच अनुपालन अहवालाची एक प्रत संबंधीत तक्रार कर्त्याला द्यावी. शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आताच्या शिक्षणप्रणालीमध्ये धोरणात्मक बदल करावयाचा असेल किंवा बदल सूचवायचा असल्यास तसा रितसर प्रस्ताव विभागास सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आयोजित सहविचार सभेला सुमारे ३०० शिक्षक उपस्थित होते. उपस्थित सर्वच पुरुष महिला शिक्षकांच्या निवेदनांवर मंत्री महोदयांनी चर्चा करुन त्यांचे समाधान केले. यावेळी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महानगरपालिका, नगरपालिका अधिनस्त असणाऱ्या शाळांचे शिक्षक, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या निवेदनांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात स्वयंस्फुर्तीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून मदत करणाऱ्या १६० लोकांच्या ग्रुपचे गौरव व सत्कार करण्यात आला. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *