महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई:- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या १५ नोव्हेंबर २०१८ पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि. १ ते ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.

५८ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. १५ नोव्हेंबर २०१८ पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत आणि संस्कृत नाट्य स्पर्धाची अंतिम फेरी जानेवारी २०१९ पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.

नाट्य स्पर्धेसाठी रु.३ हजार इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणाऱ्या नाट्य संस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळ्याखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 31 ऑगस्ट २०१८ पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात.

मुंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-३२ (०२२-२२०४३५५०) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

पुणे महसूल विभागातील संस्थांनी, सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक-४, विमानतळ रोड, पुणे (०२०-२०२७१३०१) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर-०२, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्ड टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औंरगाबाद-४३१००५ (०२४०-२३३९०५५) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन, नागपूर-४४०००१ (०७१२-२५५४२११) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी.

स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेसाठी संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संजीव पलांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *