चिपी विमानतळाचे ९५ टक्के काम पूर्ण- उर्वरित कामे पूर्ण करण्याचे उद्योगमंत्री यांचे निर्देश
मुंबई:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. धावपट्टी तयार झाली आहे. वीज, पाणी आणि रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ कार्यान्वित करण्याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एअरपोर्ट प्राधिकरणाचे अधिकारी व आयआरबी समुहाचे प्रमुख वीरेंद्र म्हैसकर उपस्थित होते.
चिपी विमानतळावरील वीज, पाणी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येथील विमानसेवा सुरू झाल्यास नागरी विमान उड्डाणासोबत आंतरराष्ट्रीय चार्टर्ड सेवा देणे शक्य होणार आहे. पर्यटकांना कोकण किनारपट्टीवर पर्यटनाला येण्यासाठी महत्त्वाची सुविधा निर्माण होणार आहे. त्यामुळे या विमानतळाची मागणी वाढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या स्थानिक नागरिकांना नोकरीची संधी देण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सूचना केली. (‘महान्यूज’)