राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातील ४४ स्पर्धक सहभागी
विजेत्या समुहाला रशियामध्ये आयोजित जागतिक स्पर्धेत संधी
नवी दिल्ली:- विविध कौशल्यावर आधारित स्पर्धेचे आयोजन केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्यावतीने एरोसीटी येथे ३ ते ५ आक्टोंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ४४ स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे. या स्पर्धेत विजेत्या आणि उपविजेत्या समुहाला रशिया आयोजित जागतिक स्पर्धेत जाण्याची संधी मिळणार आहे.
राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह २६ राज्ये सहभागी झालेली आहेत. विविध कौशल्यावर आधारित ४५ दालन याठिकाणी आहेत. यामध्ये ४०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे. विशेष म्हणजे दिव्यागांसाठी याठिकाणी १० कौशल्य आधारित दालने आहेत.
राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या स्पर्धकांना जुलै २०१९ मध्ये रशियातील कझान येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील ४४ स्पर्धकांनी विविध २२ कौशल्यावर आधारित दालने येथे उभारली आहेत. यामध्ये इलेक्ट्रीकल इनस्टालेशन, पुष्पगच्छ तयार करणे, वेल्डींग, इंण्डसट्रियल कंट्रोल, मोबाईल रोबोटिक, मेकेट्रॉनिक, कॉबिनेट मेकिंग, वॉल फ्लोवर टायलींग, ऑटोमोबाईल टेक्नोलॉजी, विटा बनविणे, रेफ्रिजरेशन एण्ड एयर कंडीशन, ब्युटी थेरपी, हेयर ड्रेसींग, ज्वेलरी, ३ डी गेम आर्ट, फॅशन टेक्नोलॉजी, प्रिंट मीडिया टेक्नोलॉजी, ग्राफीक डीसाईन टेक्नोलॉजी, इनफरमेशन नेटवर्क केबलींग, आयटी सॉफ्टवेयर सोल्यूशन फॉर बीजनस आदी कौशल्यांचा समावेश आहे.
यशस्वी स्पर्धकांना राज्याकडून बक्षिस मिळणार : कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील
राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेचा शुभारंभ २ ऑक्टोबरला सायंकाळी केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्याहस्ते जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे झाले. यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलेंगकर उपस्थित होते.
श्री पाटील यांनी यावेळी राज्यातील सहभागी स्पर्धकांशी संवाद साधून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी होणाऱ्या स्पर्धकांना राज्याकडून विशेष बक्षिस देण्यात येणार असल्याचे यावेळी श्री. पाटील यांनी जाहीर केले. या स्पर्धेत राज्याकडून कौशल्य विभागाचे संचालक डी.डी. पवार आणि रमन पाटील समन्वय करीत आहेत.