पोषण माह अभियान- महाराष्ट्राला १४ पुरस्कार कोल्हापूरला सर्वाधिक ५ पुरस्कार
नवी दिल्ली:- केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने देशभर राबविण्यात आलेल्या ‘पोषण माह’ कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला एकूण १४ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात सर्वाधिक ५ पुरस्कार एकट्या कोल्हापूर जिल्ह्याने पटकाविले आहेत. दिल्लीत १० ऑक्टोबर रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या पोषण अभियान विभागाच्यावतीने देशभरातील ३६ जिल्हे व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘सप्टेंबर २०१८’ हा पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला. यात अगदी गाव पातळीपासून पोषण अभियानाबाबत जागरूकता कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमांची नोंद पोषण अभियानाच्या संकेतस्थळावर करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्यासाठी क्षेत्रिय स्तरावर वैयक्तिक आणि जिल्हा स्तरावर सांघिक असे पुरस्कार जाहीर झाले असून महाराष्ट्राला एकूण १४ पुरस्कार जाहीर झाले आहेत. विशेष म्हणजे यात एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील ५ महिलांना वैयक्तिक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील पाच महिला कर्मचाऱ्यांना वैयक्तिक पुरस्कार
राष्ट्रीय पोषण माह अभियानात उत्कृष्ट कार्यासाठी सर्वाधिक पाच वैयक्तिक पुरस्कार एकट्या कोल्हापूर जिल्ह्याला जाहीर झाले आहेत. पन्हाळा तालुक्यातील माले येथील अंगणवाडी सेविका राजश्री साळसकर, कागल तालुक्यातील चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका संध्या चांदणे, पन्हाळा तालुक्यातील केखले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पर्यवेक्षिका स्मिता चोपडे, तसेच परिचर वेशाली शितोळे, आशा वर्कर शोभा लोहार यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
यासह भंडारा जिल्ह्यातील एएनएम कार्यकर्त्या चंदा झालके, चंद्रपूर जिल्ह्यातील स्वस्थ भारत प्रेरक पुजा वेरुळकर, अहमदनगर जिल्ह्यातील पर्यवेक्षिका कल्पना अंदुरे आणि संगिता पवार, नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मंदा शिंदे, आशा कार्यकर्त्या पुष्पा शिंदे आणि एएनएम कार्यकर्त्या लक्ष्मी गायकवाड यांचा समावेश आहे.
जिल्हास्तरीय पुरस्कार चंद्रपूरचे बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सुर्यवंशी आणि नाशिकचे बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनिल दुसाणे यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे.
१० ऑक्टोबरला पुरस्कार वितरण
केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने १० ऑक्टोबरला येथील हॉटेल अशोकमध्ये आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.