सहकार बळकटीकरणाच्या राज्य बँकेच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ! -मुख्यमंत्री
बँकेच्या मुख्यालयात प्रतिष्ठापित श्री. विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण
मुंबई:- राज्यातील सहकार बळकटीकरणाच्या राज्य सहकारी बँकेच्या प्रयत्नांना शासनाचे पाठबळ राहील. अडचणीतील जिल्हा बँकांच्या मदतीसाठीचा आराखडा प्रभावीपणे राबविण्यात यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे केले. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्यालयात प्रतिष्ठापित श्री. विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. बँकेचा १०७ वा वर्धापनदिन आणि शारदीय नवरात्रौत्सवाच्या प्रारंभाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार भारत भालके, सहकार आयुक्त सतिश सोनी, बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर, संजय भेंडे, व्यवस्थापकीय संचालक आर. एल. बायस, विशेष कार्य अधिकारी अजित देशमुख आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सहकाराच्या मंदिरात विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापना ही महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण वारकरी पंथ हा सहकारावर आधारित आहे. एकमेकांसोबत माऊलीचे नामस्मरण करीत पंढरपूरकडे मार्गक्रमण केले जाते. त्यामध्ये गरीब-श्रीमंत, जाती धर्म किंवा बलशाली दुबळा असा कोणताही भेद नसतो. विठ्ठल नामात एकरूप होऊन, एकमेकाला सहाय्य करून दिंडी चालली जाते. सहकाराचे क्षेत्रही असेच आहे. समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन समाजातल्या लोकांसाठी निर्माण केलेली ही व्यवस्था आहे. या व्यवस्थेतून परिवर्तन-अधिकारिता आणि स्थैर्य देण्याचे काम केले जाते. त्यामुळेच भागवत धर्माला सहकार शिकविणाऱ्या विठ्ठल मूर्तीची या सहकार मंदिरात स्थापना करताना मोठा आनंद होत आहे.
बँकेने १०७ वर्षे पुर्ण करून १०८ व्या वर्षात पदार्पण करणे ही बाब बँकेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये बँकेची प्रगल्भता, उच्चस्थान स्पष्ट होते. असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, बँकेला मोठा इतिहास आहे. या वाटचालीत बँकेने अनेक चढ उतार पाहिले आहेत. त्यातूनही बँक बाहेर पडली आहे, ही मोठी समाधानाची बाब आहे. त्यातही सहकारासाठी अनेक उपयुक्त आणि पारदर्शक निर्णय घेण्यात आले आहेत, ही बाब महत्त्वपूर्ण आहे. आता बँक सदृढ स्थितीत पोहोचली आहे. आता बँक राज्यातील सहकार क्षेत्रात जिथे अडचणी आहेत तिथे पोहोचते आहे. सहकारी साखर कारखान्यांनाही त्यातूनच मदत केली जात आहे. कारखान्यांवर राज्यातील शेतकऱ्यांचे स्थैर्य अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना मदत करावीच लागेल. पण आता सूतगिरण्यांनाही मदत करावी लागेल.
राज्य बँक सहकाराचे क्षेत्र बळकट आणि मजबूत करण्यासाठी प्रयत्न करते आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा बँकांची शिखर बँक म्हणून अडचणीत आलेल्या जिल्हा बँकांनाही मदत करावी लागेल. जिल्हा सहकारी बँकांची अवस्था बिकट झाल्यास शेतकरी अडचणीत येतो. त्याला अन्य पर्याय राहत नाही. त्यामुळे या बँका मजबूत केल्या पाहिजेत. त्या जिवंत रहाव्यात, त्यांच्या विस्तारातून शेतकऱ्याला मदत करण्यात यावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. या बँकांच्या मदतीसाठी शिखर बँक म्हणून तयार केलेला आराखडा राबविण्यासाठी राज्य पाठबळ देईल, असेही त्यांनी सांगितले.
शिखर बँकेने कालानुरूप उपविधीमध्ये बदल स्वीकारल्याचे आणि त्यातून अधिक पारदर्शकतेचा आग्रह धरल्याचे कौतुक करून राज्य सहकारी बँकेला सुदृढ करण्यात प्रयत्न करणाऱ्या प्रशासक मंडळाबरोबरच, बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.
सहकारमंत्री श्री. देशमुख यांनी राज्य बँकेने ग्रामीण भागात पोहोचून, सहकार आणखी समृद्ध करावा असे आवाहन केले. सुरवातीला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते श्री.विठ्ठल मूर्तीचे अनावरण करण्यात आले व विधीवत पूजा करण्यात आली.