आईने मुलांना जास्तीत-जास्त वेळ देण्याची गरज – २२ देशांच्या सफरीहून परतलेल्या चार मातांचे मत
मातृत्वाचा संदेश देण्यासाठी सफर
नवी दिल्ली:- मुलांना घडविण्यात आईची भूमिका अनन्यसाधारण असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात भारतासह परदेशातही मातांकडून मुलांना पुरेसा वेळ दिला जात नसल्याचे चित्र आहे म्हणून प्रत्येक मातेने आपल्या मुलांना जास्तीत जास्त वेळ देण्याची गरज असल्याच्या भावना मातृत्वाचा संदेश देण्यासाठी २२ देशांच्या सफरीहून परतलेल्या चार भारतीय मातांनी येथे व्यक्त केल्या.
‘फाऊंडेशन फॅार होलिस्टीक डेव्हलपमेंट इन अकादमीक फिल्ड’ या संस्थेच्यावतीने मुलांना घडविण्यात मातेची भूमिका व मातृत्वाचे महत्त्व
हा संदेश देण्यासाठी चार मातांनी ‘मदर्स ऑन व्हिल्स’ हा २२ देशांतील प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. या प्रवासाविषयी माहिती देण्यासाठी खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या वतीने आझादभवन या परिषदेच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी `मदर्स ऑन व्हिल्स’ उपक्रमातील माता माधुरी सहस्त्रबुद्धे, शितल वैद्य-देशपांडे आणि ऊर्मिला जोशी या मातांनी आपल्या ६० दिवसांच्या विविध देशांच्या प्रवासातील अनुभवावर आधारीत अहवालातील काही बिंदू मांडले. यावेळी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या महासंचालक रिवा गांगुली दास आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महिला सर्वत्र समदु:खी
बहुतेक महिलांना घराचा गाडा चालविण्यासाठी नोकरी निमित्त बाहेर जावे लागते त्यामुळे तिच्यावर कामाचा मोठा तान आहे. त्याचा परिणाम मुलांच्या संगोपणावर होतो. या महिला आपल्या पाल्यांना गुणात्मक वेळ देऊ शकत नाहीत त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर व व्यक्तीमत्वावरही होत असल्याचे निदर्शनास आल्याचे माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
भारतीय महिलांप्रमाणे अन्य देशांतील महिलाही कामाचा तान, पुरुष प्रधान संस्कृतीतील घुसमट, एकल मातांचे प्रश्न आदी समस्यांचा सामना करीत असल्याचे चित्र समोर आले. या मिशच्या माध्यमातून आम्ही २२ देशांतील ६१२ कुटुंबांशी संवाद साधला यातून आमच्या समोर या देशांमधील महिलाही भारतातील महिलांप्रमाणेच विविध समस्यांचा सामना करीत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.
सोव्हियत संघातील देशांमध्ये एकल मातांचा प्रश्न प्रकर्षाने दिसून आला. याठिकाणी वरिष्ठ नागरिकांशी झालेल्या चर्चेतून त्यांनी आम्हाला या समस्येवर उपाययोजना सुचविण्याची विनंती केल्याचे ‘मदर्स ऑन व्हिल्स’ मिशनच्या अन्य सदस्य शितल वैद्य-देशपांडे यांनी सांगितले. परदेशांमध्ये कुटुंबसंस्था पूर्णपणे ढासळल्याचे चित्र आहे. सुदैवाने भारतातील कुटुंब व्यवस्था बळकट असून जगाच्या पाठीवर आपल्या देशाचे हे बलस्थान असल्याचेही या मातांनी यावेळी सांगितले. पुरुषप्रधान संस्कृती आणि त्यात महिलांची होणारी घुसमट, परस्पर संबंधातील दुरावे, कौटुंबिक समस्या आदी विषयांवरही या मातांनी जग प्रवासात केलेले अवलोकनही यावेळी मांडले.
असा झाला प्रवास
परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी १० सप्टेंबर २०१८ रोजी कोल्हापूर येथील ‘मदर्स ऑन व्हिल्स’ उपक्रमाला झेंडा दाखवून सुरुवात केली. ९ नोव्हेंबर २०१८ पर्यंत सलग ६० दिवसांमध्ये या मातांनी २२ देशांतील ४७ शहरांमधून प्रवास केला. २३ हजार ६०० किलो मिटरच्या प्रवासात या मातांनी ६१२ कुटुंबांशी संवाद साधला. विविध देशांतील ३६ संस्थांना भेट दिली व या प्रवासात मुलांच्या व्यक्तीमत्व विकासात मातेचे योगदान आणि मातृत्वाचे महत्त्व या विषयांचा प्रचार व प्रसारासाठी एकूण ३४ कार्यक्रमांचे आयोजनही केले.
चार मातांचा विश्वविक्रम
या मोहिमेत पुणे येथील शितल वैद्य-देशपांडे आणि ऊर्मिला जोशी, ग्वाल्हेरच्या माधवी सिंग व मूळच्या सांगलीच्या व सद्य: दिल्लीत स्थित माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी धाडसी सहभाग घेतला. मध्य आशिया आणि युरोप मधून जाणाऱ्या सिल्क रूटहून प्रवास करणाऱ्या आम्ही जगातील पहिल्या चार महिला ठरल्या आहोत, अशी माहिती शितल वैद्य-देशपांडे यांनी दिली. सिल्क रूटहून महिलांच्या समुहाने असा एक संदेश घेऊन स्वत: कार चालवत प्रवास करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग असल्याने हा विश्व विक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले.
चार महिलांनी एकत्र येत मुलांच्या व्यक्तीमत्व विकासात मातेचे योगदान आणि मातृत्वाचे महत्त्व या विषयांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या मदर्स ऑन व्हिल्स
या विशेष उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.