व्यसन मुक्तीचा प्रचार समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे- डॉ.विद्याधर तायशेट्ये
गोपुरी आश्रमासममोर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आयोजित `चला व्यसनांना बदनाम करुया’ प्रदर्शनात व्यक्त केले मत
कणकवली:- व्यसनमुक्तीचा विचार ग्रामीण भागात तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आज लहान वयातील मुले सुद्धा व्यसनांच्या आहारी जाताना दिसतात यामुळे त्यांच्या शरीराची आणि कुटूंबाची हानी होते; हे पहाताना खूप दुःख होते. व्यसन मुक्तीचा विचार शाळा महाविद्यालये आणि विशेषतः ग्रामीण भागात पोहोचवणे गरजेचे आह; असे प्रतिपादन कणकवली येथील प्रतिथयश डॉ.विद्याधर तारशेट्ये यांनी व्यसनमुक्ती समन्वय मंच, महाराष्ट्र राज्य, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई व गोपुरी आश्रमाच्या वतीने आयोजित `द- दारूचा नव्हे, द- दुधाचा’,`चला व्यसनांना बदनाम करुया’ या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
यावेळी डॉ. हेमा तायशेट्ये, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबईच्या जिल्हा समन्वयक अर्पिता मुंबरकर, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र मुंबरकर, सचिव मंगेश नेवगे, सामाजिक कार्यकर्त्या शैलजा मुखरे, विशाखा येरम, गोपुरीचे सहव्यवस्थापक बाळकृष्ण सावंत, काजू समुह व्यवस्थापक अंकुश सावंत, गुरुप्रसाद तेडोलकर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शैलजा मुखरे म्हणाल्या की, व्यसनामुळे व्यक्तीबरोबर कुटूंबे ऊध्वस्त होतात. विशेषत: तरूण वर्ग या व्यसनांकडे अधिक आकर्षित होत आहे. सामाजिक पातळीवर याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
अप्पासाहेब पटवर्धन यांनी वागदे गावातील एका व्यसनाधीन व्यक्तीला दारू सोडण्यास भाग पाडण्यासाठी एक दिवस उपोषण करून सदर व्यसनी व्यक्तीचे कसे मतपरिवर्तन केले? त्याचा किस्सा डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी उपस्थितांना सांगितला.
यावेळी डॉ. हेमा तायशेट्ये आणि अर्पिता मुंबरकर यांनीही विचार मांडले. या प्रदर्शनाच्या निमित्ताने द- दारूचा नाही द- दुधाचा या संकल्पनेचा विचार नागरिकांनी करावा म्हणून प्रदर्शन पहाणाऱ्याना `एक कप दुध देऊन दारू ऐवजी दुध घ्या’ असा संदेश देण्यात आला.यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल अशी सूचना करण्यात येत होती. नागरिकांचाही याला सकारात्मक प्रतिसाद मिळत होता.
या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना व्यसन मुक्तीची प्रतिज्ञाही देण्यात आली. तसेच `दारूची बाटली, गुटखा आणि सिगारेटच्या पोस्टरला चला व्यसनांना बदनाम करुया असे म्हणत उपस्थितांनी चप्पल मारून आपला प्रतिकात्मक निषेध नोंदवला. या प्रदर्शनाला समाजातील विविध स्तरातील नागरिकांनी भेट देऊन व्यसन मुक्तीविषयी माहिती घेतली. यावेळी `मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी मे २०२० पर्यंत महाराष्ट्र व्यसन मुक्त करावे’ यासाठीच्या समर्थन निवेदनावर नागरिकाच्या सह्या घेण्यात आल्या. नागरिकांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.