महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यासाठी जगभरातील उद्योजकांची पसंती – मुख्यमंत्री

उद्योजकांनी गुंतवणूक करण्याचे भागिदारी परिषदेत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई:- महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यासाठी जगभरातील उद्योजकांनी पसंती दिली असून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रात आघाडीवर असून येथे सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. म्हणूनच जगभरातील उद्योजकांनी महाराष्ट्रात आर्थिक गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ते काल येथील जे. डब्ल्यु. मेरियर हॉटेल सहारामध्ये आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय भागिदारी परिषदेत ‘अ डिजिटल वायर फेम ऑल द पार्टनरशिप समिट’ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे उद्योग व्यवसायांसाठी प्रमुख ऊर्जास्त्रोत आहे. गेल्या वर्षी राज्यात 42 टक्के तर चालू वर्षी 49 टक्के परदेशी गुंतवणूक झाली. गेल्या चार वर्षापासून ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’च्या माध्यमातून राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्राचा उद्योग क्षेत्रातील भागिदारीत मोठा वाटा आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि पारदर्शकतेच्या जोरावर महाराष्ट्राने प्रगती साधलेली आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ, चांगले रस्ते, वीज आणि पाण्याची मुबलकता, पर्यावरण अनुकुलता, उद्योग सुलभता आणि डिजिटल व्यवहारामुळे देश – विदेशातील उद्योगपतींनी महाराष्ट्राला पसंती दर्शविली आहे.

महाराष्ट्र राज्य डिजिटल कनेक्टीव्हीटीने जगाशी जोडले गेले आहे. येथे ऑनलाईन सर्व्हिसेस, सायबर सुरक्षा मजबूत आहे. हजारो खेडी इंटरनेटच्या माध्यमातून जोडली आहेत. सर्वसामान्य नागरिकही डिजिटली साक्षर झाला आहे. राज्याचा कारभार फारपूर्वीच ई गर्व्हनरच्या माध्यमातून सुरू असून डिजिटल इकॉनॉमीचा वापर देखील वाढला आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र सुरू आहे. लाखो लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे. तसेच अलीकडेच राज्यात सेवा हमी कायदाही लागू केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वेळेत सेवा मिळत आहे. शेकडो सेवा या कायद्यांतर्गत दिल्या जातात.

डिजिटलायजेशन संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कोट्यवधी शेतकऱ्यांना डिजिटली पेमेंट झाले. शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. आम्ही अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढीसाठी मदत होत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्याने बळीराजाला फायदा होत आहे. रियल इस्टेट क्षेत्राने मोठी आघाडी घेतली असून ‘महारेरा’ अंतर्गत जवळपास १९ हजार वेगवेगळ्या प्रकल्पाची नोंद झाली. या क्षेत्रात मोठी गुंतवणूक झालेली आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ होण्यासाठी अनेक हेल्थ केअर सिस्टीमचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे आरोग्याचे प्रश्न सोडवणे सोपे झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात सायबर सिक्युरिटीचे जाळे पसरलेले असून. प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब कार्यरत आहे. राज्य शासन सायबर सेंटरच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये खर्च करीत आहे.

महाराष्ट्राने कृषी, पर्यटन, उद्योग, सायबर सुरक्षा, आरोग्य अशा विविध क्षेत्रात ऑनलाईन सेवा देण्याबरोबरच महाराष्ट्राला डिजिटली साक्षर करण्यात यशस्वी झालो आहोत. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या परिषदेमुळे जगभरातून मोठी गुंतवणूक राज्यात झाली. आता या भागिदारी परिषदेमुळे राज्यात मोठी गुंतवणूक येईल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त करून सहभागी झालेल्या उद्योगपतींना शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी महाराष्ट्रातील उद्योगाच्या प्रगतीबाबत सांगितले की, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य हे परिपूर्ण आहे. येथे चांगली संधी आहे. उद्योग धोरण अनुकूल आहे. शेवटी उद्योग विभागाचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी आभार मानले.

या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक उद्योगपतींसोबत चर्चा करून महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील प्रगतीबाबत चर्चा केली. उद्योगवाढीसाठी अनुकूल असलेले धोरण, कमीत कमी लागणाऱ्या परवानग्या, दळणवळणाच्या सोयी सुविधा आदीबाबत माहिती देऊन संवाद साधला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, प्रधान सचिव भूषण गगराणी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *