संपादकीय- भारताच्या सर्वांगिण प्रगतीसाठी मतदानाचा हक्क बजावणे महत्वाचे!

नाथसंविध्

।। हरि ॐ ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।।

सर्वांगिण प्रगतीचे द्वार उघडण्यासाठी देशातील प्रत्येक संस्थेला पुढाकार घेऊन उचित नियोजनानुसार कार्य करायला पाहिजे. देशातील व्यक्ती असो वा संस्था प्रत्येकाने सर्वांगिण प्रगतीसाठी आपआपली कर्तव्य निष्ठेने पार पाडली पाहिजेत. मतदारांनी मतदानादिवशी सुट्टी साजरी न करता मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदारांची ही भूमिका अतिशय महत्वाची ठरते. मतदान करण्याची उदासिनता लोकशाही देशाला मारक ठरतेच; शिवाय सर्वांगिण प्रगतीचे घोडे इथे अडते. ग्रामपंचायत ते लोकसभा…. कुठलीही निवडणूक असो; चाळीस पन्नास टक्के मतदान होणं ही काही निवडणुकीची यशस्वी प्रक्रिया म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ समजा पन्नास टक्के मतदान होईल आणि विजयी उमेदवाराला वीस टक्के मतं मिळतील. मात्र तो वीस टक्के मतं घेणारा उमेदवार सर्व शंभर जणांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकशाही व्यवस्थेमध्ये महत्वाचे स्थान पटकावेल. त्याच्याकडून मतदारांसाठी योग्य कार्य होईल; ह्याची शाश्वती नाही. ज्या ठिकाणी मतदार जागृत असतो त्याठिकाणी निवडून येणारा लोकप्रतिनिधी सुद्धा जागृत असण्याची शक्यता अधिक. म्हणून मतदानासाठी सक्ती करणारा कायदा करावा का? ह्याची वेगळी चर्चा होऊ शकते. सर्वांगिण प्रगतीसाठी देशातील प्रत्येक मतदाराने राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदान करायला पाहिजे. मात्र मतदारांना आपण कोणाला मतदान करतोय? हे समजायला हवे. त्यासाठी प्रत्येक मतदार शिक्षित आणि लोकशाही समजणारा असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने आणि प्रत्येक नागरिकाने समानपणे पुढे आले पाहिजे. शासनाने सर्वांना शिक्षण मिळेल याची सोय करायला हवी आणि लोकशाही प्रक्रिया नेमकी कशी असते? हे प्रत्येक नागरिकाने समजून घेतले पाहिजे. इथे नुसती शिक्षणाची पदवी घेऊन लोकशाही व्यवस्था समजेलच; असे सांगता येणार नाही. अशी उदाहरणे आपण नेहमी आजूबाजूला पाहतो. असा एकदा मतदार शहाणा झाला की योग्य उमेदवार किंवा त्यातल्या त्यात चांगले उमेदवार निवडून येतील.

लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदार हा राजा असतो. मात्र तो मतदार शिक्षणाने, अनुभवाने शहाणा असायला पाहिजे. देशातील प्रत्येक मतदाराकडे स्वनिर्णयाने उमेदवार निवडून देण्याची क्षमता असायला हवी. परंतु भारतामध्ये अत्यंत भीषण परिस्थिती आहे. आजही खाऊ देऊन, दारू देऊन, पैसे देऊन, कपडे देऊन मतदारांना भुलविण्यात येते. गावातील एखाद्या देवळात किंवा देवस्थानाच्या ठिकाणी बोलावून शपथ घ्यायला लावायची किंवा त्या देवतेची भीती घालून मतदान करू घ्यायचे. त्याशिवाय जात-धर्म-प्रादेशिकता अशा मुद्द्यांवरून मतदारांच्या भावना भडकवून मतदानासाठी प्रवृत्त करायचं. अशावेळी लोकशाही सदृढ होईल, अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल. प्रजासत्ताक भारतामध्ये प्रत्येक मतदाराकडे शहाणपणा येण्यासाठी प्रथम मुलभूत गरजा पुरविणे गरजेचे होते आणि ते प्रजासत्ताक भारताला शक्य झाले नाही. एकीकडे भारताने वैज्ञानिक प्रगती करून जगातील महत्वाच्या राष्ट्रांमध्ये स्थान प्रस्थापित केलं. जगातील जी-२० राष्ट्र समुहात भारताला महत्वाचे स्थान मिळाले. भारतातील उद्योगपतींनी विदेशात कारखाने विकत घेतले. जगामध्ये सर्वात मोठा लोकशाहीवादी देश म्हणून नावारूपाला आलेला असताना, दुसरीकडे त्याच प्रजासत्ताक देशातील मतदार निवडणुकीच्या आधी कपड्यांसाठी-जेवणासाठी उमेदवारांच्या कारस्थानांना बळी पडतात. कपड्यांसाठी चेंगराचेंगरी होऊन काहीजण मृत्यूमुखी पडतात. आजही बहुसंख्य कष्टकरी शेतकरी-शेतमजूर-भुमीहीन यांच्याकडे अन्न-वस्त्र-निवारा या गोष्टींची अपूर्णता आहे. मग निवडणुकीच्या कालावधीत चलाख उमेदवारांकडून अन्नाचे वस्त्रांचे वाटप करून मतदानासारख्या पवित्र कार्याला काळीमा फासला जातो. म्हणूनच मतदार शिकला पाहिजे, त्याला लोकशाहीची जाण असायला पाहिजे.

त्याचबरोबर जो सुशिक्षित मतदार आहे त्याने प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. जेव्हा हा सुशिक्षित शहाणा मतदार मतदानासाठी जागृत होईल तेव्हा काही कालावधीने का असेना, खेडेगावातील- आदिवासी भागातील कष्टकरी मतदारांना त्यांच्या मुलभूत गरजा पुरविल्या जातील व तेही लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येतील. एका मनुष्याचा मेंदू खूप चांगला क्रियाशिल असेल. पण त्याच्या पायांना सूज आली असेल, उजवा पाय सदृढ असेल व डावा पाय मोडलेला असेल अशा पद्धतीने एक जरी अवयव रोगग्रस्त असला तरी तो मनुष्य पूर्णपणे तंदुरुस्त आहे, असं म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे देशातील करोडो मतदार अन्न वस्त्र निवाऱ्यायापासून वंचित असताना मतदानाची प्रक्रियाच कुठेतरी रोगग्रस्त होताना दिसते आहे. ६२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणाऱ्या भारताला सर्वांगिण प्रगतीसाठी अशा गोष्टी मारक आहेत. त्या सुधारण्यासाठी कोण पुढे येणार? हा प्रश्न प्रत्येकाने विचारत बसण्यापेक्षा प्रथम किमान मतदानाचा हक्क बजावून सर्वांगिण प्रगतीचा एक टप्पा तरी ओलांडूया!

-नरेंद्रसिंह हडकर

(पाक्षिक `स्टार वृत्त’-ऑक्टोबर २०१२  )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *