स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक चौथा

परमात्म्याने आपल्या प्रेमसागरात आम्हाला विलीन करून घ्यावे!

चौथ्या वचनात स्वयंभगवान त्रिविक्रम ग्वाही देतात;

“प्रेमळ भक्ताचिया जीवनात।
नाही मी पापे शोधीत बसत॥”

आम्ही प्रेमळ भक्त आहोत का ? नक्कीच! जर परमात्म्याला आम्ही आमचा पिता मानत असलो, त्याच्यावर प्रेम करत असलो; तर आम्ही नक्कीच प्रेमळ भक्त आहोत.

गुरुचरित्रात महाराज स्वतः सांगतात;

जे जे जन भक्ति करिती। त्यांसी आमुची अतिप्रीति।
गुरुचरित्र अ. ५१/ १९

आम्ही त्याच्यावर प्रेम करतो. पण ते प्रेम केवळ बोलण्यात नको तर वागण्यातही हवे. त्याला आवडते तसे वागायचा प्रयत्न करीत राहणे म्हणजे खरे प्रेम. जर तो आमच्यावर दया करतो, प्रेम करतो; तर आम्हीही त्याच्या इतर लेकरांशी वागताना दयेने , प्रेमाने वागायला हवे.

“दया सर्व भूतीं जया मानवाला। सदा प्रेमळू भक्तिभावें निवाला।।’’ मनाचा श्लोक-१०६

सगळे जगच ‘त्याच्या’ इच्छामात्रेने निर्माण झालेले आहे. आल्हाददायक सूर्यकिरणे, हिरवीगार झाडे, किलबिलणारे पक्षी सगळा त्याचाच चिद्विलास.

निवृत्तीनाथ म्हणतात;

ध्यान मन एक करिता सम्यक।
होय एकाएक एक तत्व॥

ध्यान म्हणजे डोळे मिटून एकाच जागी बसावे असे नाही. तर चित्तात सद्गुरूंच्या चरणांचे स्मरण करीत नित्य नैमित्तिक कर्मे करीत राहावे, त्याचाच विचार मनात करीत मनन करावे. अशा प्रेमळ भक्ताला सर्वत्र भरभरून राहिलेला त्रिविक्रम दिसेल. ही अवस्था म्हणजे सुखच सुख, आनंदाची पराकाष्ठा! हा आनंद सदैव टिकणारा! उदय व अस्त न पावणारा म्हणजेच कशानेही कमी न होणारा, कशानेही मलीन न होणारा हा आनंद सोहळा प्रेमळ भक्तच सतत भोगत असतात. म्हणून पुढच्या चरणात निवृत्तीनाथ सांगतात;

उदोअस्तुमेळें ब्रह्म न मैळें|
भोगिती सोहळे प्रेम भक्त||

अशा प्रेमळ भक्ताचे सर्व व्यापार त्या भगवंताच्या इच्छेने चालतात. कर्मस्वातंत्र्य त्याने ‘त्या’ एकमेव अशा भगवंताच्या चरणी अर्पण केलेले असते. त्यामुळेच साईनाथ म्हणतात;

टाकूनियां मजवरी भार । मीनला जो मज साचार । तयाचे सर्व शरीरव्यापार । मी सूत्रधार चालवीं ॥ २८/२००

आम्ही सामान्य जीव आहोत. प्रेम करतो, भक्ती करतो. पण पापही घडतेच ना!

उत्पत्ती ७ मधे बायबल सांगते –
” परंतु तू जर वाईट रीतीने चालशील तर ते पाप तुझ्यात राहील व ते पाप तुझ्यावर सत्ता चालवू पाहील; पण तू त्या पापावर सत्ता चालवली पाहिजेस.”

जर आपण ओळखले की पाप अगदी जवळ आहे ; तर आपण सावध असू. अजाणता पाप घडले तरी बाऊ करायचा नाही. ‘त्या’चे नाव घ्यायचे. आमचे जर याच्यावर प्रेम आहे तर तो आमच्या जीवनातली पापे शोधीत बसत नाही. आम्हीही आमच्या जीवनातली पापे शोधीत बसणे बंद करायला हवे. सारखा पापांचा न्यूनगंड बाळगून कुढणे बंद करायला हवे. भक्ती प्रेम करताना पूजेत, उपासनेत काही चूक ‘चुकून’ झाली तर तीही ‘त्या’च्या चरणी अर्पण करून निर्भय भक्ती करायला हवी.

पापांची शिक्षा देताना प्रेमळ भक्तांच्या बाबतीत हा नक्कीच पक्षपात करतो. शिक्षा सौम्य करतो, शिक्षेची योग्य वेळ ठरवतो, वेळ पडली तर आमचे प्रारब्ध भोग स्वतःही भोगतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्षमा करतो!

याविषयी बायबल सांगते;
यहोवा जेव्हा आपल्या पापांची क्षमा करतो, तेव्हा तो त्या पापांची आठवण ठेवत नाही. म्हणजे तो भविष्यात त्या पापांसाठी आपल्याला शिक्षा देत नाही. (यहेज्केल १८)

आम्हीही इतरांना क्षमा करतो का? करत असलो तर आम्ही त्या क्षमाशील पित्याला शोभणारी बालके आहोत.
पापाचा पुण्याचा विचार त्रिविक्रम अनिरुद्धांवर सोपवून द्यावा. आम्ही प्रेमाने काय मागावे ? चिरकाल टिकणारे आनंद देणारे कुठलेच भौतिक सुख नाही. देवाकडे देवालाच मागावे.

आम्हाला क्षणिक आनंदाचे शिखरही नको आणि हृदय विदीर्ण करणाऱ्या दुःखामुळे होणारा कडेलोट ही नको! आम्हाला वासनांचा पूरही नको आणि रुक्ष प्रेमहीनतेचा दुष्काळही नको! आम्हाला ज्ञान वैराग्याचे तळपते ऊनही नको आणि अज्ञानाचा, अश्रद्धेचा अंधारही नको!

‘त्या’च्या निळ्या सोनेरी प्रकाशाचा एक किरण ‘त्या’नेच बनवावे आणि ‘त्या’च्याच प्रेमसागरात ‘त्या’नेच विलीन करून घ्यावे; एवढीच प्रार्थना! ‘त्या’च्याच चरणी!!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

(क्रमश:)

– डाॅ आनंदसिंह बर्वे

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पहिला

https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-1/

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दुसरा

https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-2/

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक तिसरा

https://starvrutta.com/spiritual-svayam-bhagavan-trivikram-18-vachan-article-3/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *