शून्यातून आपलं अस्तित्व निर्माण करणारे उद्योजक श्री. सुरेश डामरे यांचा आदर्श लाखमोलाचाच!

समाज माझा, मी समाजाचा!

क्षा. म. समाजातील आदर्श व्यक्ती-२

हरि ॐ

कष्ट करण्याची तयारी, यशस्वी होण्याची जिद्द, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता हे सर्व गुण एकत्र आल्यावर कुठलीही व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहचते. शिक्षण आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्या यशस्वी व्यक्तीचे अडत नाही. त्यांच्याकडे अनेक वर्षाच्या अनुभवातून शिक्षणातून येणाऱ्या ज्ञानापेक्षा व्यावहारिक जगतातील ज्ञान दृढ होत जाते. यासर्व गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हा आर्थिक ताकदही वाढते!

हा सर्व डोलारा सांभाळण्यासाठी नंतर आवश्यकता असते ती परमात्म्यावरील श्रद्धा आणि सबुरीची! त्यातूनच पुढे समाजसेवेचा डोलारा उभा राहतो. हे सगळं मी लिहितोय आमचे मित्र आणि क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे श्री. सुरेश डामरे यांच्याबद्दल!

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजातील आदर्श व्यक्तीवर लिखाण करण्याचा मानस खूप दिवसापासून आहे. त्यानुसार हा दुसरा लेख लिहिण्यासाठी घेतला तो श्री. सुरेश डामरे यांचा परिचय करून देण्यासाठी!

मु. पो. असलदे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग ह्या गावात जन्माला आलेले श्री. सुरेश डामरे यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण गावातच झाले. माध्यमिक शिक्षण कोळोशी येथे झाल्यानंतर त्यांना वेध लागले ते नोकरीचे. त्यासाठी ते आपल्या नातेवाईकांकडे मुंबईत दाखल झाले. पण सहा महिने झाले तरी नोकरीचा पत्ता नव्हता. पुन्हा गाव गाठला. गावाला राहुन करायचे काय? हा मोठा प्रश्न होता म्हणून त्यांनी पुन्हा मुंबईचा रस्ता धरला! आता मात्र ते परेलला सार्वजनिक खोलीमध्ये राहू लागले. राहण्याचा आसरा होता. आता नोकरी शोधावी लागणार होती. मग सोपा मार्ग म्हणून ज्या कंपनीत त्यांचा मोठा भाऊ जायचा तिथेच ते नोकरीला जावयास लागले. स्वयंरोजगारावरची अनेक भाषांमधील पुस्तकांच्या बांधणीचं काम तेथे व्हायचं. तुटपुंज्या पगारात एक वेळचं जेवण मिळणंही कठीण होतं. एकदा अशी वेळ आली की पंधरा दिवस पाणी पिऊन उपाशीपोटी झोपावं लागलं. पोटामध्ये भुकेची आग पडायची. पण करणार काय? प्रतिकूल परिस्थितीच मानवाला अधिकाअधिक समर्थ बनवित असते. पंधरा दिवसाच्या उपवासाने शेवटी ज्वराला आणले. बघता बघता टाइफाईडचा ताप शरीराची लाही लाही करीत होता. शेवटी कांदिवली येथे राहणारे काका आले आणि आपल्या घरी घेऊन गेले.

पुन्हा एकदा तंदुरुस्त झालेले श्री. सुरेश डामरे मोठ्या उमेदीने दुसऱ्या नोकरीस लागले. मॉनिट्रॉन कंपनीत सिक्युरिटीमध्ये नोकरी असल्याने काही दिवसातच मुंबईवरून उरणला बदली झाली. तिथे सहा महिने काम करता करता आपल्या चुलत बंधूकडे स्क्रीन प्रिंटिंगची कला अवगत केली. त्यादरम्यान सिक्युरिटीमधील नोकरी सोडून परेल येथे दामोदर नाट्यगृहाच्या बाजूला रस्त्यावर टोमॅटो विकण्याचा व्यवसाय सुरू केला. या कालावधीमध्ये दोनाचे चार हात झाले होते. विवाहानंतर आणखी जबाबदारी वाढली होती. म्हणून पत्नी सौ. रंजिता (पूर्वाश्रमीची प्रमिला हडकर) हिच्या सहाय्याने १९९२ मध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय त्यांना कुठे घेऊन जाणार होता? हे त्यांना माहीत नव्हते. फक्त प्रामाणिकपणे पूर्ण कष्ट करायचे एवढंच त्यांचं ध्येय होतं.

राहण्यासाठी स्वतःचे घर असावे, ही इच्छा प्रत्येकाची असते; नव्हे ती निवाऱ्याची गरज लग्नानंतर अत्यावश्यक ठरते म्हणून त्यांनी आर्थिक ओढाताण करून चारही बाजूला पत्रे असणारी दहा बाय दहा फूटाची झोपडी विकत घेतली. निवाऱ्याचा प्रश्न सुटला होता.

पुढील चार वर्षात त्यांच्या व्यवसायातील मेहनतीने त्यांना आणखी धारिष्ट्य करण्याचे बळ दिले. १८ जुलै १९९७ रोजी बँकेचे कर्ज आणि दागिने विकून `युवराज प्लॅस्टिक’ नावाची कंपनी त्यांनी सुरू केली. पण नशिबाने पुन्हा कठोर परीक्षा घेतलीच. मार्च १९९८ पर्यंत ७० हजार रुपयांचा तोटा झाला होता. पण प्रामाणिकपणाने केलेले काम सुरेश डामरे यांना व्यवसायात फायदा करून देणार होते. त्यांच्या युवराज प्लॅस्टिक कंपनीला मुंबई महानगरपालिकेचे रेनकोट तयार करण्याचे कंत्राट मिळाले. आजपर्यंत नशिब प्रतिकूल वागत होतं ते आता अनुकूल झालं होतं.

२००२ मध्ये त्यांनी राहण्यासाठी ब्लॉक विकत घेतला. २००३ मध्ये कारखान्यासाठी स्वतःची जागा त्यांनी विकत घेतली. २००६ मध्ये कारखान्यासाठी दुसरी जागा विकत घेतली. अशारीतीने त्यांच्या प्रगतीचा अश्व उधळू लागला. `युवराज प्लॅस्टिक’ आणि `स्वप्नाली क्रिएशन’ ह्या दोन कंपन्यांच्या माध्यमातून पॅकेजिंग, गिफ्ट आयटम प्रॉडक्शन, प्रिंटिंग असा चौफेर व्यवसाय करतात.

असलदे गावचे प्रथम सरपंच म्हणून श्री. अंकुश डामरे यांच्याकडे मान जातो. श्री. सुरेश हे त्यांचे शेवटचे चिरंजीव! त्यामुळे सामाजिक बांधिलकी देहात-मनात भरलेली. त्यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली. प्रथम असलदे गावातील श्री रामेश्वर मंदिरात लादीकरण केले. पंचक्रोशीतील प्रत्येक गावातील प्रत्येक वाडीमध्ये त्यांनी अनेक सार्वजनिक कामांसाठी आर्थिक मदत केली. डामरेवाडी येथील श्री. साईबाबा मंदिर उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. नांदगाव येथे २६ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या महाआरोग्य शिबिरासाठी त्यांनी केलेले परिश्रम आणि दिलेली प्रचंड आर्थिक मदत लक्षणिय होती. कारण पंचक्रोशीतील हजारो लोकांनी सदर वैद्यकीय शिबिराचा लाभ घेतला होता.

त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना, चांगले-वाईट अनुभव येत असताना सुरेश डामरे यांनी आपले गावावरील प्रेम कधीही कमी होऊ दिले नाही. आर्थिक सुबत्ता येताच त्यांनी सामाजिक कार्यासाठी दिलेला आर्थिक निधी त्यांची दानशूरता दाखवून देते.

असलदे विकास मंडळाचे अध्यक्ष , शुभंकर ट्रस्टचे उपाध्यक्ष, सोमवती देवी मंडळ डामरेवाडी-असलदेचे अध्यक्ष तसेच क्षा. म. समाजाच्या परिवर्तन पॅनेलचे ते आघाडीचे सदस्य आहेत.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजामध्ये अनेक विद्वान सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. त्यामध्ये श्री. सुरेश डामरे यांचे नाव मोठ्या अभिमानाने घेता येईल. कारण त्यांच्या कंपनीचा आजपर्यंतचा सर्व व्यवहार हा चेकने केला जातो. म्हणजेच सगळी उलाढाल जमाखर्च सरकारला दाखवून प्रामाणिकपणे कर भरला जातो. हाच त्यांचा प्रामाणिकपणा मला नेहमीच भावतो. कुठलाही व्यावसायिक आयकर कसा चुकविता येईल? याचीच गोळाबेरीज करण्याच्या मागे असतो म्हणून बरेचसे व्यवहार रोखीने केले जातात. परंतु प्रामाणिकपणा जपून सुरेश डामरे देशाच्या तिजोरीत भर घालीत असतात.

सुरेश डामरे यांना समाजामध्ये स्वार्थ साधणाऱ्या लोकांचा खूप राग येतो. त्यावेळी ते आक्रमक होतात; पण तो आक्रमकपणा समाजाच्या भल्यासाठी असतो. आपले मत स्पष्टपणे मांडून ते आपल्याकडे काही हातचं राखून ठेवत नाहीत. क्षा. म. समाजासाठी विधायक गोष्टी करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याचा रोखठोकपणा त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना समाजामध्ये अल्पावधीत मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

सुरेश डामरे यांचा जीवनपट अगदी सविस्तर लिहिलाय; कारण त्यांनी शून्यातून आपले विश्व निर्माण कसे केले? याची जाणीव समाज बांधवांना व्हावी म्हणून. व्यवसाय करण्यासाठी अंगी धारिष्ट्य असावे लागते, चिकाटी असावी लागते, कष्ट करण्याची जिद्द असावी लागते. त्याचबरोबर प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता असल्यास ती व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात आपले नाव कमविते. हे सर्व गुण आमचे समाज बांधव सुरेश डामरे यांच्याकडे आहेत. याचा निश्चितच अभिमान वाटतो.

सुरेश डामरे यांना नाटकाची आणि भजनाची विशेष आवड आहे. ते प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेताना त्यांनी नाटकांमध्ये काम केले. आजही दशावतारी नाटक ते आवर्जून पाहत असतात आणि जिल्ह्यातील दशावतारी नाटक मंडळांना आर्थिक सहाय्य उदारहस्ते करीत असतात.

‘मला माझ्या साईबाबांनी सर्वकाही दिलंय. तोच माझा तारणारा आहे.’ अशी पूर्ण श्रद्धा व दृढ विश्वास सुरेश डामरे यांच्याकडे आहे. त्याच भावनेतून ते त्यांच्या डामरेवाडील साईबाबांच्या मंदिरासाठी, हडपीडच्या श्री स्वामी समर्थ मठासाठी व तेथील उत्सवासाठी तन-मन-धन अर्पण करून सतत सेवा करतात.

साईबाबांच्या समाधीला शंभर वर्षे पूर्ण होत असून ‘काहीतरी विशेष आध्यात्मिक कार्यक्रम करा’ असे सुचवितात गेल्यावर्षी श्रीरामनवमीला अखंड श्रीसाईसच्चरित ग्रंथाचे पठण आयोजित करण्यासाठी सुरेश डामरे यांनी आपल्या वाडीकडे विनंती केली आणि स्वतः झोकून आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न केला. असा आध्यात्मिक कायर्क्रम यापूर्वी जिल्ह्यात झाला नाही.

चारचाकी गाडीतून फिरताना आजही सुरेश डामरे गरीब मित्रांना विसरले नाहीत. त्यांच्या खांद्यावर हात घालून ते त्यांच्याशी पहिल्यासारखेच मनमोकळेपणाने बोलतात. त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध ठेवतात. श्रीमंतीची कुठलीही बाधा त्यांना झाली नाही. त्यामुळे ते सर्वांशी मिळून मिसळून वागतात आणि ते सुद्धा मनापासून. आजही आपल्या कंपनीमध्ये कोणतेही काम न लाजता करतात. मालक म्हणून हलक्या दर्जाचे काम कसं करू? असा त्यांना प्रश्न पडत नाही. मेहनत आणि कष्ट करण्याची आवड असल्यानंतर काम करायला का लाजायचं? हा त्यांचा प्रति प्रश्न असतो. ज्यांनी प्रतिकूल परिस्थतीत सहकार्य केले ते काका, मावशी, चुलत भाऊ, भावोजी तसेच शेठ गुल लालवाणी यांची आठवण ते नेहमी काढतात. त्यांना ते आजही विसरलेले नाहीत.

स्पष्टपणे बोलणारा मनुष्य समाजातील स्वार्थाने आंधळ्या झालेल्या लोकांना बघवत नाही. ते मागून निंदानालस्ती करणे, नाहक बदनामी करणे; असे प्रकार घडवून आणतात आणि सुरेश डामरे यांच्या वाटेलाही गोष्ट कधी कधी येते. त्याबद्दल ते दुःख व्यक्त करतात. अनेकजण समाजात वावरत असताना कोणीतरी सांगितले म्हणून एखाद्या व्यक्तीबद्दल समज-गैरसमज करून घेत असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीपासून आपण दूर जातो. हे टाळण्यासाठी प्रत्यक्ष बोलून एकत्र यावे; असे सुरेश डामरे यांचे मत असते.

आपल्या वाडीमध्ये, आपल्या गावामध्ये, पंचक्रोशीतील गावांमध्ये, मुंबईत कार्यरत असलेल्या वाडीच्या मंडळांमध्ये, गावाच्या मंडळामध्ये, क्षा. म. समाजात विधायक कार्य सातत्याने व्हावे; अशी त्यांची मनापासून इच्छा असते.

त्यांच्याकडे कुठलीही चांगली योजना न्या. ती समजून घेतील. आपणही मार्गदर्शन करतील आणि १०० टक्के सहयोग देतील. समाज कार्यासाठी वेळ आणि पैसे देताना ते कधी मागेपुढे पाहत नाहीत? अशा व्यक्तीची आज क्षा. म. समाजाला आवश्यकता आहे. कारण क्षा. म. समाज संस्थांपासून प्रामाणिक व्यक्तिमत्वे दूर जातात. हा आजपर्यंतचा अनुभव पाहता अशा आदर्श व्यक्तींचा आम्हाला सन्मान करता आला पाहिजे. अशा अनेक आदर्श व्यक्ती जेव्हा समाजाच्या भल्यासाठी एकवटतील तेव्हा खऱ्या अर्थाने क्षा. म. समाज अधिकाधिक मजबूत होईल. त्यासाठीच `समाज माझा, मी समाजाचा!’ ह्या लेखमालेतून अनेक आदर्श व्यक्तींचा परिचय करून घ्यायचा आहे.

विधायक कार्यात सुरेश डामरे नेहमी क्रियाशील असतात व त्यांना त्यांची पत्नी सौ. रंजिता, मुलगा युवराज व मुलगी स्वप्नाली नेहमीच साथ देत असतात.

त्यांच्या पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्याकडून समाजासाठी अधिकाधिक विधायक कार्य घडो, ही श्रीसाई चरणी प्रार्थना!

-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक-पाक्षिक स्टार वृत्त

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *