परंपरेचा गवळदेव…

कोकणात शासनाच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरु आहेत. विस्तीर्ण सागरी किनारा, भव्य अशी वनसंपदा, सह्याद्रीचा कडा, उद्योग यासह असंख्य वैशिष्ट्यांसह कोकण विभागात आजही सांस्कृतिक प्रथा-परंपरा कायम ठेवल्या जात आहेत. यात श्रध्दा किती अंधश्रध्दा किती ? हा वेगळा विषय असू शकतो. मात्र कोणत्याही कारणाने का होईना गावातले सर्व जाती धर्माचे लोक काही विशिष्ट दिवशी एकत्र येतात आणि मतभेद विसरुन तो दिवस आनंदात घालवतात. हेही नसे थोडके!

परवा पालघर, डहाणू दौऱ्यावर असतांना वाटेत चहासाठी चारोटी नाक्यावर गाडी थांबविली. सतत वर्दळ असणारे मुंबई – अहमदाबाद हायवेवरचे हे ठिकाण, परंतु तेथे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. गॅरेजपासून हॉटेलपर्यंत सर्व दुकानं बंद होती. शंभरटक्के बंद दिसत होता. वाहनचालकाला वेगळं काही वाटलं नाही. पण मला ते खटकलं. पुढे गेल्यावर एक रिक्षा दिसली. त्याच्याजवळ जाऊन विचारलं, तर तो म्हणाला आज ‘गवळदेवा’ उत्सव आहे. म्हणून बंद केलयं सर्व. गाडी पुढे डहाणूच्या दिशेने सुरु झाली. डोक्यात ‘गवळदेव’ मात्र होता. पुढे काही अंतरावर आशागडला चहाची गाडी दिसली. या गावातले सर्व व्यवहार मात्र सुरळीत होते. चहा घेतला पुढे शासकीय काम सुरु झालं.

कोकणातल्या प्रत्येक गावात लोकोस्तव होतात. यात लोक एकत्र येतात आणि आनंद मानतात. दैनंदिन जीवनातले ताणतणाव काही काळासाठी का होईना ते विसरतात. गांवपळण असो की गांव राखण, किल्ल्यांची दिवाळी, तुळशीचे लग्न, विविध ठिकाणच्या जत्रा, ब्राम्हणदेव, देवराई अशा परंपरा आजही सुरु आहेत.

गवळदेवाचा उत्सव डहाणू भागात साजरा केला जातो. विशेष असे की, ज्या ग्रामपंचायतींना पेसा कायदा लागू झाला आहे, अशा ग्रामपंचायती संस्कृती संवर्धनासाठी किंवा जुन्या प्रथापरंपरासाठी ग्रामपंचायत निधीतूनही खर्चाची तरतूद केली आहे. पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम १९९६ (पेसा) हा कायदा २४ डिसेंबर १९९६ रोजी अस्तित्वात आला. या कायद्यांतर्गत देशातल्या १० राज्यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. पालघर जिल्ह्यातील काही गांवे या कायद्यात अंतर्भूत केली आहेत. हा कायदा अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकांशी संबंधित असून आदिवासींची संस्कृती प्रथा, परंपरा यांचे जतन व संवर्धन करणे आणि ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींचे स्वशासन व्यवस्था बळकट करणे हे या पेसा कायद्याचे प्रमुख सुत्र आहे. यानुसारच आता संपूर्ण गांव चालीरिती जतन करण्यासाठी एक होतात ही खूप मोठी बाब आहे.

पालघर जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायती आहेत. ९६ गांवे असून ३५६५ पाडा, वाडे आहेत. पेसा अंतर्गत ४११ ग्रामपंचायती येतात. ८१७ गांवे संपूर्ण पेसा अंतर्गत आहेत. ३१७५ पाडा, वाडे हे पेसा मध्ये सामाविष्ट आहेत.

गवळदेव ही अशी एक प्रथा परंपरा आहे की, गवळदेवाच्या उत्सवात प्रथम गवळदेवाचे विधिवत पूजन करण्यात येते. या उत्सवात प्रतिकात्मक वाघ पळविण्याचा विधी सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. वाघाचे पिठाचे बाहुले बनविले जाते. वाघ पळवताना त्या व्यक्तीचा पाठलाग करत त्याला गावाच्या सीमेबाहेर पाठविले जाते. तसेच गवळदेवाला सामूहिक गाऱ्हाणे घालून गुराढोरांचे व बालगोपाळांचे रक्षण करण्याची मागणी केली जाते. नंतर सामूहिक प्रसादाचा कार्यक्रम होतो. गवळदेवाच्या उत्सवानिमित्त घालण्यात येणाऱ्या भोजनावळीतून ग्रामस्थांना वनभोजनाचा निर्भेळ आनंदही मिळत आहे. या उत्सवामुळे प्रथा, परंपराचीही जपणूक होत असून गावागावांतील एकात्मतेचे दर्शनही घडत आहे. अर्थात गावातील पुढारी जनसंपर्क ठेवतात.

पूर्वी ग्रामीण भागात गोधन हे सर्वश्रेष्ठ धन मानत. प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यात मोठ्या संख्येने गुरेढोरे असत. गोठ्यातील मुबलक गोधनामुळे शेतकऱ्याच्या घरात भरपूर दुधदुभते असल्याने तेव्हा येथील घराघरात खऱ्या अर्थाने गोकुळ नांदत होते. तेव्हा शेतात शेण खताचाच वापर व्हायचा. त्यामुळे मिळणारे धान्याचे उत्पादनही गुणवत्तापूर्ण असायचे. एकंदीत गोधनामुळे घराघरात सुबत्ता असल्याने या धनालाच सर्वश्रेष्ठ मानून त्याचे जतन करण्यासाठी प्रयत्न होत असे. वनसंपदेमुळे शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा उपद्रवही होता. विशेषत: वाघासारखे हिंस्त्र प्राणी गुरा-वासरांवर हल्ला करून त्यांना भक्ष बनवत. यामुळे गोधनाची अपरिमित हानी होत असे, शिवाय पूर्वी गावोगावी जनावरांचे दवाखाने नव्हते. त्यामुळे विविध रोगानांही जनावरे बळी पडत असत. जंगली श्वापदे आणि रोगराईपासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी सामूहिक पद्धतीने देवाला घातलेले साकडे म्हणून पुढे गवळदेवाचा उत्सव म्हणून प्रथा रुढ झाली असावी.

यावेळी “बा..देवा..गवळदेवा… वाघापासून आणि रोगराईपासून आमच्या गुरांचे रक्षण कर… गोठ्यातील गोधन सदैव वाढू दे… आणि सर्व बाल गोपाळांव कृपादृष्टी ठेवून त्यांना सुखी समाधानी ठेव”… अशी विनवणी गोपाळांकडून गवळदेवाला केली जाते. त्यामुळे गवळदेवाचा हा उत्सव श्रध्देबरोबरच सामाजिक ऐक्याचेही प्रतिक ठरतो.

एकादी लोक परंपरा पुन्हा टिकवून ठेवणे, जतन करणे यासाठी जुन्या रुढी परंपरा नव्याने सुरु होऊन सांस्कृतिक एकात्मता जपण्यास मदत होते आहे. वर्षभरातल्या एक दिवसातले काही तास यासाठी गांवकरी सर्व कामे बाजूला सारुन एकत्र येतात हीच खरी मोठी बाब आहे. चारोटी नाक्यावरील बंदचे कारण समजले होते. मी पुन्हा मार्गस्थ झालो.. नव्या गवळदेवाच्या शोधात.

डॉ.गणेश व.मुळे – उपसंचालक (माहिती), कोकण विभाग, नवी मुंबई (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *