मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी
सिडकोच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ
नवी मुंबई:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबई मेट्रो प्रकल्प क्र.१ बेलापूर ते पेंधर मार्गीकेच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तळोजा येथे कारशेडमध्ये कार्यक्रम झाला. याचवेळी अल्प व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी १० हजार सिडकोच्या घरांसाठी अर्ज नोंदणीचा शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमास रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, पनवेल महानगरपालिका महापौर कविता चौतमोल, नवी मुंबई महानगरपालिका महापौर जयवंत सुतार, विभागीय महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे, रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे या योजनेसंबंधी चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. सिडको गृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईतील विविध नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट याकरिता १४ हजार ८३८ घरे बांधण्यात आली आहेत. यापैकी १० घरांचे ई-वाटप मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये ९५ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. यातील ९ हजार २४९ अर्ज नोंदणीचा शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिडको माजी कर्मचारी संघटनेकडून पूरग्रस्तांना मदत निधीचा धनादेश देण्यात आला. तसेच इंडियन मेडिकल असोशिएशन कल्याण यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांना धनादेश देण्यात आला.
बेलापूर ते पेंधर मार्ग क्र.१ नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे. ११ कि.मी. च्या मार्गावर सिडकोतर्फे ११ मेट्रो स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. नवी मुंबई मेट्रो एकूण २६.२६ कि.मी. असून ४ मार्ग आहेत. या प्रकल्पासाठी एकूण खर्च ८ हजार ९०४ कोटी करण्यात आला आहे. नवी मुंबई आणि पनवेलच्या विकासात महत्त्वाची भुमिका बजावणार असलेल्या मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली.