संपादकीय- महाराष्ट्राला वाचवा, देश वाचेल!

आज महाराष्ट्र आणि कामगार दिन!

सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना मात्र आज महाराष्ट्र आर्थिक बाबतीत अडचणीत सापडला आहे, त्याचे मनाशी दुःख आहे. कोरोना विषाणूची महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यात भारत देशही आहे; पण सर्वाधिक बाधितांची संख्या महाराष्ट्र राज्यात आहे आणि मुंबईत कोरोना विषाणू लागण झालेल्यांची संख्या सर्वोच्च आहे. त्यामुळे मुंबईतील लॉकडाऊनचा कालावधी लवकर संपेल अशी शक्यता नाही.

भारतामध्ये कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३५ हजार ४३ झाली, त्यातून १ हजार १४७ लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर ८ हजार ८८९ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू बाधितांची संख्या १० हजार ४९८ झाली त्यातून ४९८ लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर १ हजार ७७३ लोक रुग्ण झाले आहेत. मुंबईत रुग्णांचा एकूण आकडा ६ हजार ८७४ वर गेला आहे. मृतांची संख्या २९० वर गेली, तर १४७२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे, तर मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे १.८ कोटी आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, विरार, नवीमुंबई, पनवेल, ठाणे शहर, ठाणे आणि पालघर जिल्हा मिळून सुमारे साडेतीन कोटी लोकसंख्या आहे. ह्यातील ७० टक्के जनता दाटीवाटीने वसलेल्या बैठ्या चाळीत-झोपडपट्टीत राहतात. त्याठिकाणी अनंत अडचणी असतात. जीवन जगण्यासाठी इथे राहणारी जनता नेहमीच संकटांशी सामना करीत असते.

मागील साडेतीन वर्षात महाराष्ट्रातून प्रत्यक्ष कर आणि जीएसटीच्या माध्यमातून केंद्राकडे १३ लाख ७५ हजार कोटी रुपये जमा झाले. तर त्याच कालावधीत महाराष्ट्राला केंद्रीय करातील वाटा आणि मिळालेली मदत १ लाख ४६ कोटी रुपयांची आहे. देशात सर्वाधिक महसूल देणारे राज्य महाराष्ट्रात आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असून आजपर्यंत संपूर्ण देशाला आर्थिक सामर्थ्य देण्याचे काम मुंबईने केले आहे.

ही सगळी आकडेवारी पाहता आज देशासाठी आर्थिक दृष्टिकोनातून महाराष्ट्र खूपच महत्वाचा आहे. म्हणूनच केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्राध्यान्य देऊन वैद्यकीय सेवा देण्यासाठी आणि आर्थिक मजबुती देण्यासाठी आवश्यक असणारा निधी तात्काळ दिलाच पाहिजे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसाला किमान पाच लाख लोकांची टेस्ट व्हायला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने कोरोना विषाणू महामारीविरुद्ध समर्थपणे लढाई केली, असं म्हणता येईल. त्यासाठी केंद्र सरकारने राज्यसरकारला सर्वोतोपरी मदत केली करायला पाहिजे आणि पुढाकारही घ्यायला पाहिजे! आजच्या महाराष्ट्रदिनी आमची एवढी अपेक्षा!

-नरेंद्र हडकर

One thought on “संपादकीय- महाराष्ट्राला वाचवा, देश वाचेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *