चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज

संकटाला धैर्याने सामोरे जाऊ आणि सहीसलामत बाहेर येण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

 

मुंबई:- महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ आले असून ते उद्या दुपारी अलिबागला धडकण्याचा आताचा अंदाज आहे. इतर चक्रीवादळापेक्षा याचा जोर अधिक राहणार आहे. या वादळामुळे नासधूस होऊ नये, मनुष्यहानी होऊ नये यासाठी नेव्ही, आर्मीसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे, सर्व टीम्स अत्यावश्यक आयुधांसह सज्ज आहेत. सर्व मच्छिमार बांधवांशी संपर्क झाला असून सर्वांना सुखरूप समुद्रातून बाहेर काढून घरी आणण्यात आले आहे. नागरिकांनीदेखील घरातच राहणे हिताचे असून वेळप्रसंगी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची गरज पडली तर प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला थेट संबोधित केले.

केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या आपत्तीच्याप्रसंगी केंद्र सरकार राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. हे चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. या वादळात ताशी १०० ते १२५ कि.मी. वेगाने वारे वाहतील. या वादळाने नुकसान होऊ नये म्हणून एनडीआरएफच्या १५ व एसडीआरएफच्या ४ अशा १९ टीम तैनात करण्यात आल्या आहेत, ५ टीम राखीव ठेवण्यात आल्या असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

घरातच सुरक्षित राहा
कोरोनाच्या संकटाला ज्याप्रमाणे आपण संयम, जिद्द आणि धैर्याने सामोरे गेलो त्याप्रमाणे याही संकटाला आपण धैर्याने सामोरे जाऊ आणि सहीसलामत बाहेर येऊ असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण राज्यात ३ तारखेपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करणार होतो. परंतू आता उद्या आणि परवाचा दिवस चक्रीवादळाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा, सावध राहण्याचा असल्याने नागरिकांनी दोन्ही दिवस घरीच सुरक्षित रहावे, दुकाने, उद्योग, आस्थापना पूर्णत: बंद ठेवाव्यात. कुणीही घराबाहेर जाऊ नये, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सर्व मच्छिमार बांधवांशी संपर्क
या चक्रीवादळाने नुकसान होऊ नये, मनुष्यहानी होऊ नये यासाठी सर्व प्रकारची सज्जता ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सर्व मच्छिमार बांधवांशी संपर्क झाला असून त्यांना घरी सुखरुप परत आणण्यात आले आहे. पालघरच्या मच्छिमार बांधवांशीही संपर्क झाला आहे. ते ही परत येत आहेत. पुढील दोन दिवस किंवा पुढची सुचना येईपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असेही ते म्हणाले. सिंधुदूर्गपासून पालघरपर्यंतच्या जिल्ह्यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

चक्रीवादळात ही घ्या काळजी!
मुख्यमंत्र्यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कशाप्रकारे काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, ग्रामीण शहरी भागात ज्या वस्तू आपल्या आजूबाजूला अशाच मोकळ्या किंवा सैल स्वरूपात ठेवण्यात आल्या असतील त्या घरात आणा किंवा बांधून ठेवा. जेणेकरून वादळातील वाऱ्याने त्या उडून जाऊन कुणालाही इजा होणार नाही.

पूरसदृश्यस्थिती होणार नये याची काळजी घेण्यात आली आहेच परंतू दुर्देवाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे अशी परिस्थिती उद्भवलीच तर काही ठिकाणी वीजप्रवाह बंद होईल किंवा खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद करावा लागेल. त्यामुळे अशा परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे, पिण्याचे पाणी भरून ठेवण्याचे आवाहन ही त्यांनी केले.

वादळाच्या काळात वीजेची उपकरणे वापरू नका, ज्या अनावश्यक गोष्टी असतील त्या बांधून ठेवा, अत्यावश्यक गोष्टींची सुसूत्रता ठेऊन त्या जवळपास ठेवा. मोबाईल चार्ज करून ठेवा, फोन, संवादाची उपकरणे सज्ज ठेवा. औषधे जवळपास ठेवा.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी महत्वाचे दस्तऐवज एकत्र ठेवण्याचे, बॅटरी, पॉवरबँक, मोबाईल चार्ज करून ठेवण्याचे आवाहन केले. कोणत्याही अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास ठेऊ नका असे सांगून त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सूचना ऐका, पाळा असेही नागरिकांना सांगितले.

सुरक्षितस्थळी जा, प्रशासनाला सहकार्य करा
राज्यातील सर्व स्थानिक प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली . ते म्हणाले की धोक्याच्या क्षेत्रातील नागरिकांना प्रशासन सुरक्षितस्थळी नेत आहे. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, ते सांगत असलेल्या सुरक्षितस्थळी वेळेत जावे, ग्रामीण आणि शहरी भागात जर घर कच्चे असेल तर सुरक्षित जागा शोधून ठेवावी, तात्पुरत्या बांधलेल्या शेडमध्ये आधाराला अजिबात जाऊ नका, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या

कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना इजा होऊ द्यायची नाही याची काळजी शासनही घेत आहे म्हणूनच बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरु करण्यात आलेल्या फिल्ड रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तशाचप्रकारे सर्वांनी काळजी घ्यायची आहे. शेड, मोडकळीला आलेल्या इमारती याचा अजिबात आश्रय घ्यायचा नाही. कुठे वायुगळती झाली असेल किंवा केमिकल जर कुठे पडले असेल तर तिकडे काय होतेय हे पहायला अजिबात जायचे नाही. असे काही होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतू दुर्देवाने असे काही घडल्यास प्रशासन काळजी घेईल, नागरिकांनी तिकडे जाऊ नये. स्वत: सुरक्षित राहून जिथे मदत करता येणे शक्य आहे तिथे मदत करावी. यातून आपण होणारे नुकसान थोपवता येणे शक्य होईल. आपण कोरोनाशी लढत आहोतच निसर्गही आता आपली परीक्षा पाहात आहे. पण आपण सर्वजण मिळून त्याला पूर्ण ताकदीने सामोरे जाऊ आणि या संकटातून सहीसलामत बाहेर येऊ, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *