आला रे हरि आला रे, संतसंगे ब्रम्हानंदु झाला रे।…काय गोड गुरुची शाळा…
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ
नाथसंविध्
आला रे हरि आला रे,
संतसंगे ब्रम्हानंदु झाला रे।
हरि येथे रे, हरि तेथे रे, हरि वाचूनी रिते नाही रे।
हरि पाही रे, हरि ध्यायी रे,
हरिवाचूनी नाही दुजे रे।
हरि नाचे रे, हरि वाचे रे,
हरि पाहता आनंदु साचे रे
हरि आदि रे, हरि अंती रे,
हरि व्यापक सर्वांभूती रे।
हरि जाणा रे, हरि वाणा रे,
बाप रखुमादेविवरु राणा रे।।
या ज्ञानदेव रचित अभंगाच्या ध्रुवपदावर आपली दमदार पावले टाकत बापू श्रीहरिगुरुग्राम येथे दर गुरुवारी आगमन करायचे ते या अभंगाची सार्थता आपल्या शब्दांमधून आणि कृतीतून सिद्ध करण्यासाठीच!
स्वतः श्रीहरि अनिरुध्द गीता स्त्रवण्यासाठी,
आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना स्वार्थ परमार्थाचा उचित मार्ग दाखवण्यासाठी,
ह्या श्रीहरिगुरुग्रामाचे निवासी कसं व्हायचं याचं प्रशिक्षण देण्यासाठी या भूमीवर दर गुरुवारी अवतरतो सद्गुरू अनिरुध्द रुपात!
ह्या रूपामागील प्रेमाची ताकद जाणवून देण्यासाठी,
ह्या रूपामागील महायोद्ध्याची भूमिका पटवून देण्यासाठी आणि
ह्या कलियुगाच्या अतिभीषण काळातही सुस्थिर आणि सुखी जीवनाचा मंत्र सांगण्यासाठी!
इथे फक्त सांगणे नाही, पहाणे नाही, ऐकणे नाही तर ते अंतरी उमटवण्यासाठी आणि प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी! दर शनिवारी हाच श्रीहरि सांघिक उपासनेने समर्थ करण्यासाठी उपासना केंद्रांत भक्तांच्या ओढीने धाव घेतो, सेवा भक्ती यांच्या वाटेने जीवनमार्ग सुकर करण्यासाठी!
दररोज दैनिक `प्रत्यक्ष’मधून हाच श्रीहरि वर्तमानकाळाच दर्शन घडवतानाच भूतकाळातील गुप्त ठेवल्या गेलेल्या गोष्टींना उघड करून कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही याची दीक्षा देतो. तसेच उज्वल भविष्यकाळाचा वेध घेण्याचा पुरुषार्थ करण्यासाठी प्रेरित करतो. खरंतर हाच माझं प्रत्येक युद्ध स्वतः माझ्यासाठी खेळतो कर्ता बनून तरी अकर्ता राहून. अगदी प्रत्येकाच्या जीवनात हा हरिहर अनिरुध्द आपल्या त्रिविक्रम स्वरूपात उचित क्रमाने उचित तेच घडवून आणत तीन पावलांचा विक्रमी विजय मिळवून देतो.
हेच सद्गुरू स्वरूपाचं वैशिष्ठ्य, सारं सहज सोपं करण्याचं, अशक्य ते शक्य करण्याचं आणि प्रत्येक गोष्टीतील साैंदर्य न्याहाळण्याच भाग्य प्रदान करण्याच!
माझा सद्गुरू अनिरुध्द ही असाच फक्त प्रेम करणारा! कारण याची उत्पत्तीच मुळी प्रेम! याचं स्वरूपच मुळी प्रेम आणि याचं कार्यच मुळी प्रेम वाटण्याचं! श्रीसाईचरित्रातील ३२ व्या अध्यायातील वणजारी भर दुपारच्या रणरणत्या उन्हात भटकणाऱ्या जीवांना हे सद्गुरूच लाभेविण प्रेम लेवूनच तर आपल्याकडील चतकोर भाकरी आणि पाणी पुढे करत चुकलेल्या मार्गावरून उचित दिशेस नेण्याची कळकळ व्यक्त करतो. पुन्हा पुन्हा भटकून दिशाभूल झालेल्यांना आपल्या अकारण कारुण्याने मार्गदर्शकाच महत्त्व सांगतो! हेच ते निरपेक्ष प्रेम, निर्हेतुक प्रेम, अकारण प्रेम!
प्रत्येकावर बरसणारं त्याचं प्रेम जो ओळखतो आणि त्याची भाकरी खातो तोच आपला जीवनप्रवास सफल करू शकतो. कारण याला प्रत्येकाचं कर्मस्वातंत्र्य पूर्णपणे मान्य असल्याने जो त्याचा होतो तोच तरतो. जसा या कथेतील भक्तीमार्गी तरतो तसा,आणि बाकीचे स्वतःच्या कर्तृत्वाचा अहंकार असणारे मात्र अरण्यात दिशाहीन बनून भरकटतच रहातात. या भक्तिमार्गीयालाच वंजाऱ्याची भाकरी खाताच सद्गुरू दर्शन घडतं. आपल्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी गुरूच्या बरोबरच जाण्याची इच्छा होते आणि गुरूकडून विहिरीत उलटे टांगून घेण्याचे धैर्य प्राप्त होतं. परिणाम एकच… तब्बल दहा बारा घटका विहिरीत उलटे टांगून सुद्धा अपार सुख उपभोगण्याचा अनुभव!
हाच सद्गुरू महिमा; हवे ते अनुभवास आणून देण्याचा. त्याचा उलटा किंवा सुलटा मार्ग फक्त त्रिनाथाना माहित. पण तोच उचित हा विश्वास मात्र फक्त भक्ताचाच! कारण आपल्या समग्र अस्तित्वाने आणि सहज गुणांनी सद्गुरू स्वतःच हा विश्वास भक्ताच्या मनात पेरत त्याचं जीवन रोप विकसित करत असतो. ह्या कथेतही जरी पाय बांधून झाडाला दुसऱ्या टोकाची गाठ गुरुरायाने बांधली आणि पाण्यापर्यंत हात पोचणार नाहीत याची काळजी घेत विहिरीत उलटे टांगले तरी भक्तास अपार सुख कसे मिळाले? फक्त सद्गुरू आज्ञापालनाने, सद्गुरू विश्वासाने आणि सद्गुरू सामर्थ्याने!
कारण जरी उलटी खूण दिसली तरी सद्गुरूच सर्व गोष्टींची काळजी घेत उचीतपणे भोग वा उपभोग देतो; हे त्याच्याकडूनच प्रेमाचे धडे घेणाऱ्या भक्ताला पूर्णपणे मान्य असतं. ह्या कथेत त्या भक्तास त्या छोट्या विहिरीत वृक्षाच प्रतिबिंबित उलट दृश्य दिसत आणि हा संसार वृक्षही खाली विस्तार आणि वर मुळे असाच उर्ध्व मूळ आहे; याची जाणीव होते. पाण्यास हात पोचणार नाहीत अशा स्थितीत असल्याने एकदा का गुरूची कास धरली की या संसारात तो आपल्याला इषणा आणि तृष्णारुपी पाण्याची लालसा होण्यापासून थांबवतो; हे स्पष्ट समजतं. उलट बांधल्यामुळे तो स्वतःचे रूप पूर्णतः पाहू शकतो, त्याचे ध्यान होवू लागतं आणि ध्यानी येतं ते गुरुरायाचे आपल्या अंतरी भरून राहिलेल ब्रम्ह स्वरूप. त्याचं निर्लेप प्रेम जे साऱ्या बाह्य सृष्टीत भरून आहे, ते ह्या छोट्या विहिरीत तसेच भरून आहे आणि हा अनुभव प्राप्त व्हावा यासाठीच गुरूरायाने आपल्याला या अवस्थेत टांगलं ह्याची अनुभूती मिळते. हा भक्त आता फक्त त्या विहिरीत टांगलेला उरतच नाही, तो मुक्तपणे गुरूच्या सबाह्य अभ्यंतरी स्वरूपात विहरू लागतो. त्याच्या मनाची विहीर जी आजवर फक्त विकार, कुतर्क रुपी अशुद्ध पाण्याने भरलेली होती त्या बारवी पलिकडे आता त्याला अरुंद पायवाट दिसू लागते, ज्या पायवाटेवर सांन्नीध्य असतं फक्त गुरूरायाच; अनुसंधानाच अपार सुख देणार आणि ही पायवाट सुलभतेने चालवून घेणारं.
हे अनुसंधान झाल्यानंतर गुरूच्या गोड शाळेत तर फक्त आनंदच. सारे दृश्य माया ममता यांचे बंध तोडत फक्त गुरूरायाचे अनन्य अवधान! सद्गुरू प्रेमाचा साक्षात्कार आणि अनुभवजन्य ज्ञान फक्त सदगुरूच्या कृपेनेच प्राप्त होते; हे स्पष्टपणे सांगणारी ही कथा सदगुरू स्वरूपाचं दर्शन घडवणारी आणि सद्गुरू का हवा याची दिशा देणारी, जीवनपथाचा आनंद लुटण्यासाठी सद्गुरू शारण्य का महत्वाच हे समजावणारी.
अनिरुध्द भक्तिभाव चैतन्य सोहोळ्यात सद्गुरू बापूंनी छोट्या छोट्या गोष्टींत लपलेला आनंदच शोधायला सांगितला.
“आनंद माझा आहे कारण सच्चिदानंद माझा आहे” हा विश्वास दिला. आनंद हा एक प्रवास आहे, फक्त गंतव्य स्थान नाही! ह्याचा बोध करताना हा आनंद जीवनात करताना तुमचा सच्चिदानंद तुमच्याबरोबर आहेच ही ग्वाही दिली आणि हा प्रेमस्वरूप सद्गुरू सदैव माझ्याबरोबर असतोच हेच सत्य!
असा हा दुर्लभ सदगुरू त्याच्याच अकारण कारुण्याने सहज प्राप्त झाला; ही ह्या जीवनातील सर्वोच्च आनंदाची घटना आणि सुंदर नाथसंविध!
आज हा माझा बापू फक्त सद्गुरू स्वरूपात नाही तर बापाच्या भूमिकेत सर्वांना विशाल बाहू असणाऱ्या आपल्या कवेत घेतोय, मायेची ऊब देत हृदयाशी धरतोय आणि त्याच्या समर्थ खांद्यांनी संरक्षण आणि आधार देतोय. म्हणूनच ह्याच्या आगमन प्रसंगी दर गुरुवारी सर्वजण मनाच्या प्रेम उमाळ्याने हेच गात असतात;
I love you my Dad,I love you my Dad,I love you forever forever my Dad!
आजच्या या गुरुपौर्णिमेनिमित्त बापूंना सद्गुरू आणि पितृ स्वरूपात मानणाऱ्या सर्व श्रद्धावान भक्तांना अनिरुध्द आणि अंबज्ञ शुभेच्छा आणि माझ्या बापूचे शब्दसुमनांनी अंबज्ञ अर्चन! आजच्या दिवशी एक मागणं; भक्ती म्हणजे काय ते शिकवलंस आता तुझ्या कृपेने या भक्ती लेंड्या पदरात नीट बांधलेल्या रहातील याची काळजी घे, कारण ही क्षमता माझी नाही यासाठी सद्गुरू कृपाच हवी!
तिन्ही लोक आनंदाने भरुनी राहू दे
या तुझ्या ध्यासावर _
तुझे गीत गाण्यासाठी सुर लावू दे
हा माझा अंबज्ञ प्रयास! अभ्यास करून घेणारा तूच कारण तुझ्या या गोड शाळेत तुझ्याकडून अभ्यास फक्त आनंद अनुभवाचा म्हणूनच हवाहवासा; निरंतर सौख्याचा!
अंबज्ञ नाथसंविध्
-बकुळवीरा मर्चंट