गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

।। हरि ॐ ।। ।।श्रीराम।। ।।अंबज्ञ।।

देवशयनी एकादशी आणि गुरुपौर्णिमा.
परमात्म्यावर श्रद्धा, निष्ठा, प्रेम असणाऱ्या भक्तांसाठी मोठा आनंदाचा दिवस. या दिवशी सद्गुरु चरणांचे दर्शन भक्तांसाठी पर्वणीच. कारण साक्षात परमशिवाने आदिमाता पार्वतीला सांगितलेल्या गुरुगीतेमध्ये म्हटलेलं आहे,

शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसाम्।
गुरुपादोदकं सम्यक संसारार्णवतारकम्।।

सद्गुरुचरणांचे जल हे पापरूपी चिखल सुकविणारे आहे, ज्ञानाचे तेज वाढविणारे आहे व संसाररूपी सागरातून नीट पलीकडे नेणारे आहे.

अज्ञानमूलहरणं जन्मकर्मनिवारणम्।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं गुरुपादोदकं पिबेत्।।

अज्ञानाचे मूळच नष्ट करणारे, जन्म व कर्म दूर करणारे असे सद्गुरु चरणांचे जल ज्ञान व वैराग्य अंगी बाणण्यासाठी प्राशन करावे.

गुरुगीतेमध्ये आलेले श्लोक मानवाला सद्गुरुंचे माहात्म्य सांगतात. आणि आम्हा सर्वसामान्य मानवाला सद्गुरुंची ओळख होते.

न गुरोरधिवंâत्त्वं न गुरोरधिकं तप:।
तत्त्व ज्ञानात्परं नास्ति तस्मै श्री गुरुवे नम:।।

सद्गुरूपेक्षा श्रेष्ठ तत्त्व नाही, सद्गुरुसेवेपेक्षा श्रेष्ठ तप नाही, सद्गुरुप्रद आत्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ असे तत्त्व (सार) दुसरे नाही, असा ज्यांचा महिमा आहे त्या श्रीसद्गुरूंना वंदन असो.

मन्नाथ: श्रीजगन्नाथो मद्गुरुस्त्रिजगद्गुरु:।
ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नम:।।

माझे गुरुनाथ हेच जगाचे नाथ (श्रीविष्णू) आहेत, माझे सद्गुरु हेच तिन्ही जगांचे गुरु आहेत, त्यांच्या कृपेनेच मला अशी अनुभूती आली आहे की, माझे आत्मस्वरूप सर्व भूतमात्रांच्या आत्मस्वरूपांशी एकरूप आहे, अशा श्रीसद्गुरूंना वंदन असो.

सद्गुरुविषयीचा दृढभावच मानवाला तारतो. सद्गुरु चरणांवरील निष्ठेमुळेच मानवाच्या जीवनातील उचित-अनुचित घटना सुद्धा फायद्याच्याच ठरू शकतात. येणाNया अडचणी-संकटं सुद्धा उपयुक्त असतात. म्हणूनच श्रीमद्भागवतात श्रेष्ठ भक्त प्रल्हादाने म्हटले आहे,

श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्।।

भगवान विष्णूचे नाव, गुण आणि प्रभाव वगैरेंचे श्रवण कीर्तन आणि स्मरण व भगवंताची चरण सेवा, पुजन आणि वंदन तसेच भगवंताच्या ठिकाणी दास्यभाव, सखाभाव आणि आत्मसमर्पण अशी नऊ प्रकारची भक्ती आहे.

आम्हाला परमात्म्याची, सद्गुरुंची नवविधा भक्ती करता आली पाहिजे. ही भक्ती त्या परमात्म्याकडे आहे आणि मला ती मिळवायची असेल तर ज्याच्याकडे ही भक्ती आहे त्यालाच शरण गेले पाहिजे. त्या परमात्म्याला-सद्गुरुला शरण गेल्यामुळेच जीवन सर्वांगिण सुंदर होऊ शकते.

मानवी जीवन परिपूर्ण होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी विंâवा शाश्वत आनंदी होण्यासाठी श्रीसद्गुरु चरणांना शरण गेल्याशिवाय कोणताही मार्ग मानवाकडे नाही. या मार्गावरूनच गेल्यानंतर शुद्ध भक्ती आपल्याकडून करून घेण्याची किमया आमचा सद्गुरु करतो. तोच एकमेव परमात्मा सद्गुरु माझे अखंड कल्याण करू शकतो. तोच आमचा सर्वस्वी आहे. त्याच्यावरील आमची श्रद्धाच आमचे अनेक जन्म सुवर्णमय करू शकतील. त्याची कृपा आमच्या जीवनात आल्याशिवाय आम्हाला जीवन आनंदी करता येणार नाही आणि त्याची कृपा मिळविण्यासाठी आम्हाला त्याचं होऊन राहिलं पाहिजे. आमचा सद्गुरु आम्हाला सर्वकाही उचित तेच उचितवेळी देणार. आमच्यासाठी जे उचित नाही ते तो आम्हाला देणार नाही. हीच श्रद्धा आणि सबुरी त्याची कृपा आमच्या जीवनात प्रवाहीत करू शकते.

हा सद्गुरु राम रूपात आला, कृष्ण रूपात आला, साई रूपात आला; तो कोणत्याही रूपात येवो, तो येतो फक्त आमचा उद्धार करण्यासाठी. मानवाला उचित मार्ग दाखविण्यासाठी. हा सद्गुरु अनिरुद्ध प्रत्येक क्षण आमच्या सर्वांगिण विकासाठी कार्यरत राहतो. तो आपल्या भक्तांसाठी काहीही करण्यास तयार असतो; नव्हे प्रत्येक क्षणी तो आपल्या भक्तांची काळजी घेतो. भक्ताला प्रारब्धाशी लढण्याची शक्ती आणि युक्तीही तोच देतो. त्याच्या कृपेमुळे आज आमच्या जीवनाचे सोने झाले. आमच्याकडून कळत न कळत छोट्या मोठ्या चूका होतात; मात्र तो आम्हाला समजावून सांगतो, आमची चूक दाखवून देतो.

आमची, आमच्या कुटुंबाची चोवीस तास काळजी घेणारा, संकटाक्षणी ठामपणे आमच्या सोबत राहणारा आमचा सद्गुरु अनिरुद्ध आपल्या सद्गुरुंचे सदैव `दत्तगुरु दत्तगुरु’ असे स्मरण करतो. त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा अनिरुद्ध नामाचा जप करून रामरक्षा, हनुमान चलीसा, दत्तबावनी, साईसच्चरित, श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज, श्रीमातृवात्सल्यविन्दानम्, श्रीमातृवात्सल्यउपनिषद, श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र, सद्गुरु अनिरुद्धाने सांगितलेल्या उपासना करता आल्या पाहिजेत आणि रामनाम वही लिहिता आली पाहिजे. भक्तीसह सेवेमध्ये सहभागी होता आलं पाहिजे. त्याचा प्रत्येक शब्द हाच माझ्यासाठी अतिंम असावा म्हणून दररोज `प्रत्यक्ष’ वाचलाच पाहिजे. परमात्मा अनिरुद्धाने आपल्याला आजपर्यंत जे काही दिले ते अमुल्य आहे. यापुढेही तो देतच राहिल. मात्र आमच्याकडून भक्ती आणि सेवेचा वटवृक्ष उभा राहावा याकरिताच तो सर्व काही करताना आम्हाला दिसतो. कारण भक्ती आणि सेवेच्या मार्गानेच आम्ही आमचे जीवन सुंदर बनवू शकतो.

माझ्यासाठी माझा सद्गुरुच सर्वोच्च स्थानी असला पाहिजे. माझ्यासाठी तोच गजानन, तोच श्रीराम, तोच कृष्ण, तोच साई, तोच अनिरुद्ध. माझा सद्गुरु परमात्मा अनिरुद्ध राम हाच माझा तारणहार. ह्याच अनिरुद्ध रामाने आजपर्यंत आम्हाला प्रत्येक कार्यात सामावून घेतले. रसयात्रा ते श्रीश्वासमचा प्रवास आम्ही अनुभवला. आता आदिमाता जगदंबा महिषासूरमर्दिनीचा प्रगट सोहळा, श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र आणि त्यानंतर पुन्हा श्रीविष्णूसहस्त्रनामावरील प्रवचनं असा होणारा प्रवास आम्ही अनुभवला, तेही फक्त अनिरुद्ध कृपेने.

अकारण कारुण्याचा महासागर असल्यामुळेच तो आमच्यासारख्यांना जवळ घेतोय, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. तो सर्व काही करतोय; पण कोणासाठी? फक्त आमच्यासाठी. त्याच्यावर श्रद्धा असणाNयांसाठी. एवढेच नव्हेतर तो वेळोवेळी वचन देऊन वचनबद्ध होतो तोही आमच्यासाठी. आमच्यावर फक्त आणि फक्त निर्मळ प्रेम करणारा हा परमात्मा राम अनिरुद्ध म्हणून अवतरलाय तोही आमचा जन्मोजन्मीचा अखंड प्रवास उचित मार्गाने अनिरुद्ध गतीने व्हावा याचसाठी.

पण… हा पणच खूप मोठा आहे. पण आम्हाला सदैव त्याचे होऊन राहिले पाहिजे. तो माझा आहेच. पण ज्याक्षणी मी प्रेमाने त्याचा होईन त्याचक्षणी तो माझ्यासाठी सर्व काही करण्यासाठी सज्ज होतो. म्हणूनच तो वचन देतो,

मज सवे जो प्रेमे येईल।
तयाचे अशक्य शक्य करीन।।
तू वानर मी मित्र तुझा खचित।
रावण मरणार निश्चित।।

।। हरि ॐ ।। ।।नाथसंविध।।

You cannot copy content of this page