धारावीतील कोरोना नियंत्रणाची जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल
कोरोना लढाईत धारावीचे रोल मॉडेल संपूर्ण देशाला दिशा दाखविणारे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई:- आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्त आणि सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. एवढेच नाही तर कोरोनाविरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . एवढ्या मोठ्या झोपडपट्टीत आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवर गेले असून आज ॲक्टिव्ह केसेसची संख्या फक्त १६६ आहे.
या स्वयंशिस्तीची आणि एकात्मिक प्रयत्नांची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेयेसुस यांनी ज्या देशांनी कोरोना नियंत्रणात उत्तम कामगिरी केली त्यांची उदहारणे देताना धारावीतील एकात्मिक प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला. जागतिक महामारीच्या परिस्थितीत अशी उदाहरणे आपल्याला साथीच्या प्रादुर्भावातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात अशा शब्दात त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
मुख्यमंत्र्यांकडूनही कौतुक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतुक करतांना कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली आहे. हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश असल्याचे सांगतांना त्यांनी धारावीच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर घेण्यात आलेली नोंद ही कोरोना विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ देणारी असल्याचे म्हटले आहे.
धारावीचा कोरोनामुक्तीकडे प्रवास…
धारावीचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता… स्थानिक धारावीकर, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग या तिघांच्या एकात्मिक प्रयत्नांचे फलित म्हणून धारावीतील कोरोना साथीच्या नियंत्रणाच्या यशाकडे पाहावे लागेल. कोरोना साथीला नियंत्रित करण्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग मिळवणे, चाचण्या करणे, रुग्णांचा शोध घेणे, त्यांचे अलगीकरण करून रुग्णांवर योग्य उपचार करणे, शारीरिक अंतराच्या नियमाचे, स्वच्छतेचे आणि स्वयंशिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याने कोरोनाची साखळी तोडता येते हेच धारावीमध्ये दिसून आले आहे.
उद्योग व्यवसायांचे माहेरघर धारावी
धारावीत चामडे व्यवसाय, कुंभारकाम, कापड व्यवसायाची संख्या फार मोठी आहे. परिसरात जीएसटीचे ५००० नोंदणीकृत व्यावसायिक आहेत. एका खोलीत व्यवसाय करणाऱ्यांची संख्या जवळपास १५ हजार आहे. आंतरराष्ट्रीय निर्यातीचे केंद्र म्हणून धारावीकडे पाहिले जाते.
‘चेस द व्हायरस’चे यश – पालकमंत्री आदित्य ठाकरे
या वस्तीतील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आव्हानात्मक काम होते. हे आव्हान स्थानिक धारावीकर, महापालिका प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी स्वीकारले, राज्य शासनाने या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांना बळ देण्याचे काम केले असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले . इथली ८० टक्के लोकसंख्या ४५० सामूहिक शौचालयांचा वापर करते. बहुतेक लोकसंख्या बाहेरच्या अन्नावर अवलंबून आहे. १० बाय १० च्या घरात इथे आठ ते दहा लोक राहतात. शारीरिक अंतर पाळणे, रुग्णाला होम क्वारंटाईन करणे शक्य नव्हते. अशावेळी ‘चेस द व्हायरस’ उपक्रमातून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटींगची संकल्पना चार पातळीवर वेगाने राबविण्यात आली असे ते म्हणाले.
३.५ लाख लोकांचे स्क्रिनिंग
या मोहिमेत ४७ हजार ५०० घरे डॉक्टर आणि खाजगी दवाखान्यामार्फत तपासण्यात आली. ३.६ लाख लोकांचे स्कॅनिंग करण्यात आले. प्रो ॲक्टिव्ह स्क्रीनिंग, फिवर कॅम्प, अर्ली डिटेक्शन, योग्य वेळेत विलगीकरण, सुसज्ज आरोग्य सुविधा आणि क्वारंटाईन सेंटर्स यामुळे साथ नियंत्रणात ठेवता आली.
१४ हजार ९७० लोकांचे मोबाईल व्हॅन द्वारे स्कॅनिंग करण्यात आले. ८२४६ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून सर्व्हे करण्यात आला. १४ हजार लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करून त्यांचे विलगीकरण करण्यात आले.
खासगी डॉक्टरांचा अमूल्य सहभाग
खासगी सार्वजनिक भागीदारीतून उच्च जोखमीचे झोन निश्चित करून खाजगी प्रॅक्टिशनर्सच्या सहकार्याने मिशन मोडन स्वरूपात काम करण्यात आले. पालिकेच्या वैद्यकीय उपचार केंद्राशिवाय २४ खासगी डॉक्टर यासाठी पुढे आले. त्यांना महापालिकेने सर्व वैयक्तिक सुरक्षा साधनांचा पुरवठा केला. टेस्ट किट्स, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सीमीटर, मुखवटे, हातमोजे (हॅण्ड ग्लोव्हज) उपलब्ध करून देऊन घरोघर जाऊन तपासणी सुरु केली. सर्व चिकित्सकांनी आपले दवाखाने सुरु ठेवले. संशयितांना बीएमसी रुग्णालयाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. महापालिकेने सर्व खासगी दवाखान्यांची स्वच्छता करून सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. साई हॉस्पिटल, प्रभात नर्सिंग होम, फॅमिली केअर सारखी रुग्णालये ताब्यात घेण्यात आली. या भागात जागेची कमी असल्याने होम क्वारंटाईन चा विचार न करता संस्थात्मक क्वारंटाईन वर भर दिला गेला. यासाठी शाळा, मंगल कार्यालये, स्पोर्टस कॉम्प्लेक्स उपयोगात आणले गेले. नाश्ता, दुपार आणि रात्रीच्या जेवणासाठी कम्युनिटी किचनची संकल्पना राबविली गेली. २४/७ पद्धतीने नर्स, डॉक्टर आणि वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता करून देण्यात आली. मल्टिव्हिटॅमिन्स आणि औषध पुरवठा सुरळित ठेवण्यात आला. १४ दिवसांच्या अल्प काळात २०० खाटांचे ऑक्सीजन पुरवठ्यासह व्यवस्था असलेले सुसज्ज रुग्णालय उभारले गेले. फक्त क्रिटीकल रुग्णांना धारावीबाहेर नेण्यात आले तर ९० टक्के रुग्णांवर धारावीतील वैद्यकीय उपचार केंद्रातच उपचार करण्यात आले. हाय रिस्क झोनची निवड करण्यात आली. कोविड योद्धा म्हणून सामाजिक नेतृत्व या भागात नियुक्त केले गेले.
अन्नधान्य आणि जेवणाची पाकिटे
कंटेनमेंट झोनमधील लोकांनी बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना बीएमसीकडून अन्नधान्याची २५ हजार किराणा किट तर २१ हजार जेवणाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले.याशिवाय आमदार, खासदार आणि नगरसेवकांनीही या भागात मोफत अन्नधान्याचे वितरण केले.