लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन
लोकशाहीर अण्णाभाऊंच्या वास्तववादी साहित्यामुळे राज्यातील मानवतावाद,
शोषणमुक्तीच्या लढ्याला बळ! –उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मानवतावादी लेखक होते. समाजातल्या दुर्बल, वंचित, पिडीत, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचं कष्टमय वास्तव त्यांनी साहित्यातून समोर आणलं. त्यातून उपेक्षित समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दात त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली.
अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यातून मानवतावादाचा, शोषणमुक्तीचा लढा जीवनभर लढला. देशाचा स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, गोवामुक्तीचा संग्राम, सामाजिक विषमतेविरुद्धची लढाई अशा प्रत्येक संघर्षात सक्रीय भूमिका बजावली. महाराष्ट्रात वैचारिक, सामाजिक, साहित्यिक क्रांती घडवण्याचं मोठं श्रेय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
लोकशाहीर अण्णाभाऊंच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिभासंपन्न, क्रांतीकारी व्यक्तिमत्वं होते. त्यांच्याकडे सामाजिक जाणीव होती. ज्ञानाची, अनुभवांची, विचारांची समृद्धी होती. मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, नाट्य, लोकनाट्य, लावणी, वग, गण, गवळण, पोवाडे, प्रवासवर्णन असे सर्व साहित्यप्रकार त्यांनी सशक्तपणे हाताळले, मराठी साहित्य, मराठी लोककला, मराठी लोकजीवन त्यांनी समृद्ध केले. तमाशासारख्या कलेला लोकनाट्यकलेची प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात वैचारिक क्रांती घडवून आणणारे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे आणि देशाचेही रत्न आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा गौरव करुन अभिवादन केले.