महामारीच्या काळात डॉक्टरांनी केलेल्या सेवेला आणि त्यागाला पंतप्रधानांनी केले वंदन
नवीदिल्ली, १ जून २०२१ :- राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त पंतप्रधानांनी डॉक्टरांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टर समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. बीसी रॉय यांच्या स्मरणार्थ साजरा होत असलेला आजचा दिवस आपल्या वैद्यकीय समुदायाच्या उच्च आदर्शांचे प्रतिक आहे, असे ते म्हणाले. महामारीच्या गेल्या दीड वर्षांच्या कठीण काळात, डॉक्टरांनी देशवासीयांची सेवा केल्याबद्दल 130 कोटी भारतीयांच्या वतीने त्यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले. भारतीय वैद्यकीय संघटनेने आज आयोजित केलेल्या समारंभात ते दूरदृश्य प्रणालीद्वारे भाषण करीत होते.
डॉक्टरांच्या योगदानाची पोचपावती देतानाच महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या साहसी प्रयत्नांचे पंतप्रधानांनी स्मरण केले आणि मानवतेची सेवा करताना ज्या डॉक्टरांनी त्यांचे प्राण गमविले त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान म्हणाले की, कोरोनाने उभ्या केलेल्या सर्व आव्हानांवर आपले शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी उपाय शोधून काढले. आपले डॉक्टर्स त्यांचे अनुभव आणि नैपुण्याच्या बळावर या नव्या आणि वेगाने उत्परिवर्तन करणाऱ्या विषाणूचा सामना करीत आहेत. दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या पायाभूत सुविधांच्या मर्यादा आणि वाढत्या लोकसंख्येचा ताण असतानादेखील, विकसित देशांच्या तुलनेत भारताचा प्रती 1 लाख लोकसंख्येचा संसर्ग दर आणि मृत्युदर अजूनही नियंत्रणात आहे असे त्यांनी सांगितले. लोकांचे जीव जाणे हे दुःखदायकच आहे पण या काळात अनेक लोकांचे जीव वाचविण्यात देखील यश आले. अनेक जीव वाचविण्याचे श्रेय कठोर मेहनत करणाऱ्या डॉक्टरांना, आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना, आघाडीवरील कर्मचाऱ्यांना जाते असे पंतप्रधानांनी सांगितले.
आरोग्य क्षेत्रासाठीची तरतूद दुप्पट करून 2 लाख कोटींहून अधिक
आरोग्यसेवा बळकट करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. हा मुद्दा पंतप्रधानांनी अधोरेखित केला. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात आरोग्यक्षेत्रासाठी 15 हजार कोटी रुपये देण्यात आले होते आणि या वर्षी, आरोग्य क्षेत्रासाठीची अर्थसंकल्पातील तरतूद दुप्पट करण्यात येऊन 2 लाख कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सुविधांच्या बाबतीत दुर्लक्षित भागात आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी कर्ज हमी योजनेकरिता 50 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. नवीन एम्स, वैद्यकीय महाविद्यालये यांची स्थापना होत आहे.2014 साली असलेल्या 6 एम्सच्या तुलनेत, आता 15 नव्या एम्सचे काम सुरु झाले आहे. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दीड पटीने वाढली आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमधील जागा दीड पटीने तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील जागा 80% नी वाढविण्यात आल्या आहेत अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
कोविड योद्ध्यांसाठी मोफत विमा योजना
डॉक्टरांच्या सुरक्षेप्रती असलेल्या सरकारच्या कटिबद्धतेचा मोदींनी पुनरुच्चार केला. डॉक्टरांविरुध्द होणाऱ्या हिंसाचाराला रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत याचा त्यांनी उल्लेख केला. त्याच सोबत, कोविड योद्ध्यांसाठी सरकारने मोफत विमा योजना सुरु केल्याची माहिती त्यांनी दिली.
कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी तसेच कोविड-योग्य वागणुकीचा स्वीकार करण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याचे कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी डॉक्टरांना केले.
योगाबद्दल सामान्य लोकांमध्ये जाणीव निर्माण केल्याबद्दल त्यांनी वैद्यकीय समुदायाचे कौतुक केले. योगाभ्यासाला उत्तेजन देण्यासाठी जे कार्य गेल्या शतकात, स्वातंत्र्य मिळविल्यानंतर केले जाणे अपेक्षित होते ते आता केले जात आहे असे पंतप्रधान म्हणाले.
कोविड-पश्चात आरोग्याबाबतच्या गुंतागुंतीच्या समस्या सोडविण्यासाठी योगाच्या फायद्याबाबत पुराव्यांवर आधारित अभ्यास करण्यासाठी मौल्यवान वेळ खर्च केल्याबद्दल मोदी यांनी डॉक्टरांचे कौतुक केले. भारतीय वैद्यकीय संघटना, मोहीम स्वरुपात योगाच्या फायद्याबाबत पुराव्यांवर आधारित अभ्यास हाती घेऊ शकेल काय असा प्रश्न त्यांनी विचारला. योगाविषयीचा अभ्यास आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिध्द होऊ शकतो अशी सूचना त्यांनी केली.
डॉक्टरांच्या अनुभवांचे दस्तावेजीकरण करण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले. अनुभवांसोबतच, रुग्णाची लक्षणे आणि उपचाराचे नियोजन यांची माहितीदेखील विस्तृतपणे नोंदली गेली पाहिजे.हे काम संशोधनात्मक अभ्यास म्हणून हाती घेता येईल आणि त्यात विविध औषधे आणि उपचार यांचे परिणाम नोंदवून ठेवता येतील. आपल्या डॉक्टरांनी उपचार केलेल्या रुग्णांची संख्या त्यांना जगाच्या खूप पुढे नेऊन जाते. आता जगाने आपली दाखल घेण्याची आणि या शास्त्रीय अभ्यासापासून फायदा घेण्याची वेळ आली आहे. कोविड महामारी हा त्यासाठी एक उत्तम प्रारंभ बिंदू ठरू शकेल. कोरोना प्रतिबंधक लसीचा कसा फायदा होतो आणि लवकर रोगनिदान करण्याचे महत्त्व काय याबद्दल आपण अधिक सखोल अभ्यास करू शकतो का याचा विचार व्हायला हवा असे मत पंतप्रधानांनी मांडले.गेल्या शतकात येऊन गेलेल्या अनेक महामारीच्या घटनांबद्दल कोणतेही दस्तऐवज उपलब्ध नाहीत. पण आता आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि आपण कशा प्रकारे कोविडचा सामना केला याबद्दलचे दस्तऐवज भविष्यात मानवतेसाठी उपकारक ठरू शकतात असे सांगून पंतप्रधानांनी यांचे भाषण संपवले.