नव्या युगाची नव तंत्रज्ञानाची निवडणूक
यंदाची सार्वत्रिक लोकसभा निवडणूक ही नव्या शतकात जन्मलेल्या नवमतदारांची पहिली निवडणूक आहे तर गतिमान अशा माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एक प्रकारे मोबाईल ॲप आणि क्लाऊडची निवडणूक ठरली आहे.
सन २००० पूर्वी ज्यांचा जन्म झाला अशांची वयाची १८ वर्षे पूर्ण होवून त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला, अशा सर्व नवमतदारांची ही मतदानाची पहिलीच वेळ आहे. या सर्व नवमतदारांमधील उत्साह लोकसभा निवडणूकीच्या ११ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात चांगलाच दिसून आला.
या नवमतदारांमुळे मतदारांची एक नवी पिढी आता लोकशाहीच्या या प्रवाहात सामिल झाली आणि मतदानातून आपली भूमिका बजावताना दिसत आहे. हे सर्व मतदार बहुतेक करुन स्मार्ट फोन आणि ४ जी तंत्रज्ञान जाणणारे मतदार आहेत हे उल्लेखनीय म्हणावे लागेल.
ॲपची निवडणूक
स्मार्ट फोन बाजारात आल्यानंतर विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या ॲप्सचे आगमन झाले. आज १० वर्षांच्या खंडानंतर ॲपची जागतिक बाजारपेठ चांगलीच विस्तारली आहे. १५० बिलीयन्स डॉलरचा हा व्यवसाय आगामी वर्षात १८९ बिलीयन डॉलर्स पर्यंत पोहचेल असा अंदाज आहे. (एक बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे साधारण ६९४ कोटीपेक्षा अधिक).
या ॲप व्यवसायात प्ले-स्टोअर अग्रणी आहे. या ॲपचा वापर जगभरात झपाट्याने वाढत आहे. अशाच ॲपचा वापर भारत निवडणूक आयोग अधिक चांगल्या पध्दतीने निवडणूक प्रक्रीया पार पडावी यासाठी करीत आहे.
सुविधा :- निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना एकाच वेळी निवडणूक आयोग आणि उमेदवार यांच्याशी संपर्क ठेवणे आणि माहिती देणे-घेणे शक्य व्हावे यासाठी सुविधा हे ॲप या निवडणुकीत वापरण्यात येत आहे.
सी-व्हीजील:- लोकशाहीच्या या महत्वपूर्ण प्रक्रियेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्यक्ष मतदारांना सहभागी होण्याची संधी देणारे हे ॲप यंदा प्रथमच वापरले जात आहे. नागरिक फोटो अथवा व्हिडीओ काढून या ॲपद्वारे तक्रार करु शकतात. त्यांच्या तक्रारीबाबत झालेली कारवाई १०० मिनिटात त्यांच्यापर्यंत कळविण्याची व्यवस्था या अंतर्गत आहे.
सुगम :- निवडणूक कर्मचारी तसेच मतदान यंत्रे यांची वाहतूक यात सुसुत्रता व समन्वय राखण्यासाठी या ॲपचा वापर करण्यात येत आहे.
समाजमाध्यमे :- मतदार जागृतीच्या कामासाठी जिल्हा आणि मतदार संघ यांच्या स्तरावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी हे फेसबुक, ट्विटर यासारख्या समाजमाध्यमांचा वापर देशभरात करीत आहेत. तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत समन्वयासाठी व्हॉटसअप ग्रुपचा देखील मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
एकूणच काय तर ही नव्या युगाची नव्या तंत्रज्ञानाची निवडणूक आहे असेच म्हणता येईल.
– प्रशांत दैठणकर,
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी