अवधूत चिंतन

परमात्मा आपल्या भक्तांसाठी सगुण साकार रूपात अवतरतो आणि सुनियंत्रित, सुनियोजित योजनांद्वारे आपल्या सर्वसामान्य भक्तांचा प्रवास उचित दिशेला करवून घेतो. आमच्यासाठी कोणती गोष्ट उचित आणि कोणती गोष्ट अनुचित हे फक्त तो परमात्मा जाणू शकतो. कारण तोच आमच्यावर खरेखुरे निर्मळ प्रेम करतो आणि तो काळाच्या पलिकडे असल्याने सर्व काही म्हणजे वर्तमान, भूत, भविष्य तो जाणतोच. म्हणून तोच आमच्यासाठी उचित गोष्टी देऊ शकतो. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक गोष्ट उचित क्रमाने घडणे-करणे आवश्यक असते. हा क्रम चुकल्यास अपयश पदरी पडते. आमच्या आयुष्यात हे क्रमच चुकल्याने सगळा गोंधळ उडतो. मात्र हे क्रम उचितपणे घडवून आणण्यासाठी आम्हाला संपूर्ण शरण जायला हवे ते त्या सुनियंत्रित, सुनियोजित योजना आखून प्रत्यक्ष कृतीत उतरविणाऱ्या परमात्म्याला.

एक एक टप्पा पार करत परमेश्वरी संकेतानुसार – संकल्पानुसार श्रद्धावानांनी श्री अवधूत चिंतन अनुभवला. श्री अवधूत चिंतनातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्रिया, प्रत्येक विधी, मंत्र फक्त परमात्म्याच्या सुनियोजित योजनेचा एक-एक भाग होता आणि त्यामध्ये आम्ही सहभाग घेतला. किती सुंदर गोष्ट. उभ्या आयुष्यात अशा संधी प्राप्त होतील असे कधीच वाटत नव्हते. पण परमपूज्य सद्गुरू अनिरुद्ध बापूंमुळे अशी एकमेव संधी नाही तर क्षणाक्षणाला संधी प्राप्त होत आहे. नुसतीच संधी नाही तर ही प्रत्येक सुवर्णसंधी असते. त्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आम्हाला फक्त त्याच्यावर सबुरीसह श्रद्धा ठेवायला हवी. तोच माझा बाप, तीच माझी आई, तोच माझा पालनकर्ता, तोच माझा सर्वस्वी. मी लौकीक नाती सुद्धा सांभाळीन, पण माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ तोच एकमेव. तोच माझा खरा सोबती, तोच माझा सखा, तोच माझा खराखुरा मित्र; ही भूमिका दृढपणे स्वीकारता आली पाहीजे. मग `तो’ माझ्या जीवनाला उचित दिशा, उचित क्रम देऊ शकतो. तोच मला विजयी करू शकतो कारण तोच

रामो राजमणि: सदा विजयते।
सदैव विजयी असतो. त्याचा पराभव कोणीही कधीही करु शकत नाही. आम्हालाही सदैव विजयाचीच अपेक्षा असते, मग आम्हाला काय करायला पाहिजे? तर त्या सदैव विजयी होणाऱ्या श्रीरामाच्या प्रत्यक योजनेमध्ये सहभागी व्हायला हवे अगदी मनापासून. रामकार्यामध्ये खारूताई सुद्धा आपल्या क्षमतेनुसार शंभर टक्के सामिल झाली. तिला मिळालेले फळ आपण बघितले. अशा भक्तीतील आदर्श असणाऱ्या प्राणीयोनीतील खारूताईचे पूजनही आम्ही करतो. म्हणूनच सदैव विजयी होणाऱ्या परमात्म्याच्या अवधूत चिंतनामध्ये जेव्हा आम्ही सामिल झालो तेव्हा संपूर्ण आयुष्यालाच नव्हे तर येणाऱ्या पुढील सर्व जन्मांमध्ये पुरेल एवढी त्याची शक्ती सहजरितीने प्राप्त झाली. परमात्म्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला सहभाग घेता आला. दत्तयागसारख्या पवित्र विधीने आमचे परमात्म्याची कृपा प्राप्त करून देणारे सर्व मार्ग मोकळे झाले. नियतीचक्रपरिवर्तन प्रदक्षिणा घालताना निर्वृत्तशूर्पद्वार, ईषद्पृथक्कारिका आणि दत्तात्रेयांचे चोवीस गुरू या सर्व पवित्र गोष्टींचा लाभ आम्हाला घेता आला. आम्ही आमच्या जीवनातील-जन्मोजन्मीच्या अखंड प्रवासातील आमच्यासाठी अनुचित असणारे खडे, दगड, काट्या बाजूला सारले. बाहेर टाकले. चाळणी चांगल्या गोष्टींना खाली टाकते आणि वाईट गोष्टींना स्वत:कडे ठेवते. म्हणून मला चाळणी सारखे न वागता सुपासारखे वागले पाहिजे. सुपाचा गुणधर्म अंगिकारल्याने जीवनातील अनुचित गोष्टींचा त्याग आणि उचित गोष्टी स्वीकारणे ह्या दोन्ही आवश्यक क्रिया एकाच वेळी झाल्या. मात्र आमच्याकरिता ही इश्वरी मांडणी परमपूज्य सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी केली. दत्तात्रेय अवधूतांचे २४ गुरुंची नुसती ओळखच करुन न देता बापूंनी आम्हाला प्रत्येक गुरुंचे स्वभाव गुणधर्म स्पष्टपणे, अतिशय सोप्या भाषेत सांगून त्या चोवीस गुरुंचे ग्राह्य गुण आणि त्याज्य गुण सांगितले. भक्ती कशी करावी? परमात्म्यावर श्रद्धा कशी ठेवावी? जीवनातील कार्य कशारितीने पूर्णत्वास न्यायचे? सेवाभाव कसा जोपासायचा? जीवन प्रवासाची उचित दिशा कोणती? निष्काम कर्म कसं करायचं? छोट्या छोट्या गोष्टीत अडकून का पडू नये? सदैव बुद्धी स्थिर कशी व का राखावी? खरीखुरी श्रद्धा कशी असते? कुठलीही गोष्ट उचित ठिकाणी उचित प्रमाणात असल्यास हितकारक कशी ठरते? वास्तवाचे भान प्रगतीसाठी का आवश्यक आहे? सर्व बदलांना सामोरे कसे जायचे? दुसऱ्याकडून कोणतीही गोष्ट फुकट का घेऊ नये व घेतल्यास काय करावे? कर्तव्य पालनात दक्षता कशी घ्यावी? खऱ्या प्रेमाची ताकद का जाणून घ्यायची? एकच गुरू, एकच आराध्य दैवत व एकच आधार ग्रंथ आवश्यक का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्हाला सहजपणे मिळाली. त्यामुळे आत्मविश्वासाला सामर्थ्य प्राप्त झाले. व्यक्तीमत्व विकास आपोआप साधला गेला. इतरांना दु:ख न देता आपले कार्य कसे संपादन करावे? कोणताही भेदभाव न करता इतरांकडून चांगल्या गोष्टी कशा घ्यायच्या? व्यभिचार का करु नये? अन्न कसे घ्यावे? हे सर्व इथे शिकायला मिळाले. सर्व ग्राह्य गुण आणि त्याज्य गुण समजल्याने ग्राह्य गुणांना आपलेसे करणे व त्याज्य गुणांना दूर करणे किती अत्यावश्यक आहे? याची जाणीव झाली. भगवंताच्या सावलीतच आम्ही सुखात असतो, त्याचा विरह सहन होता कामा नये, भगवंत स्वयंपूर्ण आहे याची जाणीव ठेवावी आणि माझ्याकडील उचित गोष्टी ह्या फक्त त्याच्यामुळेच मला प्राप्त झाल्या. हा विवेक सदैव जागृत ठेवला पाहिजे. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्राह्य गुण घ्यायचे व त्याज्य गुण त्यागायचे. हे विवेकानेच करता येईल. हा विवेक जागृत, समर्थ, क्रियाशील करण्याचे काम अवधूत चिंतनातून सहजपणे झाले. आम्हाला हे सर्व मिळाले ते अनिरुद्ध कृपेने. आम्हा प्रत्येकाच्या जीवनात खऱ्या अर्थाने अवधूतांचे चिंतन सुरू झाले. धन्य धन्य प्रदक्षिणा घालताना मनामध्ये त्या परमात्म्याबद्दल प्रेम, प्रेम, प्रेम आणि प्रेमच निर्माण होत होते. माझ्यासारख्या पापी माणसाला काही वेळात सर्वकाही देण्याचीच नव्हे तर मागील व्यर्थ गेलेले जन्म व पुढे येणारे सर्व जन्मांना उचित गती देण्याचं कार्य माझ्या परमात्म्या अनिरूद्धरामाने केले. त्याने आजपर्यंत मला सर्व काही दिलं. माझ्यासाठी उचित गोष्टी देऊन तो माझ्यावर नेहमी कृपा करीतच असतो. मात्र ती कृपा स्वीकारण्याची माझ्याकडे तेवढी क्षमता नसते. ती क्षमता प्राप्त करण्यासाठी परमात्म्याने श्री अवधूत चिंतन घडवून आणले. एवढेच नव्हे तर भूतकाळाचे-भूतांचे भय कमी करण्यासाठी अत्यंत पवित्र श्री सर्वतोभद्र कुंभयात्रा करता आली. `पार्वती पते हर हर महादेव’ चा गजर करीत काशीच्या गंगेचं पाणी कावडीत घेऊन रामेश्वरमला जायचं व रामेश्वराच्या लिंगावर अभिषेक करायचा आणि रामेश्वरमच्या समुद्राचं पाणी घेऊन काशीविश्वेश्वराला अभिषेक करायचा. आम्हाला अशी खरीखुरी श्री सर्वतोभद्र कुंभयात्रा करता आली ती परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्धांच्या अकारण कारूण्यामुळे. श्रीद्वादशज्योतिर्लिंग कैसालभद्रमहापूजा आमच्याकडून करुन घेतली; त्या परमात्म्याने. बारा ज्योतिर्लिंगाच्या पूजनाने माझ्यातील वाईट गोष्टींचा विनाश झाला आहे, तर शुभ-हितकारक गोष्टीचा उदय झाला आहे. परमात्मा आमच्यासाठी अशा अनेक सुंदर सुंदर पवित्र निर्मळ योजना राबवत आहे. कारण त्याचं त्यामागे एकच ध्येय आहे, ते म्हणजे माझ्या भक्तांचा, माझ्या मित्रांचा उद्धार. माझी खरीखुरी काळजी त्यालाच आहे आणि मुख्य म्हणजे माझ्यासाठी उचित काय? हेही फक्त तोच जाणतो. म्हणूनच पुढचा टप्पा माझ्यासाठी तो घेऊन येतोय श्रावण महिन्यात. ‘उदे ग अंबे उदे’ म्हणत! आम्हाला आमच्या आईचा गजर करायचा आहे. मला जन्म देणारी मानवी आई माझी एवढी काळजी करते; मग अखिल विश्वाची आई महिषासुरमर्दिनी आम्हा लेकरांसाठी काय काय करत असावी? याची आम्हाला कल्पनाच करता येणार नाही. आम्ही आमच्या मानवी आईचं प्रेम थोडं का असेना जाणतो. तसेच त्या आदिमाता असणाऱ्या गायत्रीचं, अनसूयेचं, महिषासूरमर्दिनीचं आमच्यावर असणारं प्रेम जाणून घ्यायला पाहिजे. आपल्या पुत्रासाठी ती गुरुक्षेत्रमला अवतीर्ण होत आहे. आमच्या सद्गुरुंची ती आई. म्हणूनच ती आमचीही आई. गायत्री माता-अनसूया माता म्हणून आम्हाला तीची ओळख बापूंनी करुन दिली. आता त्याच मातेचं महिषासूरमर्दिनी स्वरूप अवतीर्ण होत आहे आणि आम्ही गजर करायचा आहे, “उदे ग अंबे उदे!”
-नरेंद्रसिंह हडकर
(प्रसिद्धी ता. शुक्रवार २६ जून २००९)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *