विधानसभा प्रश्नोत्तर: जलसंधारण विभागाकडील बंधाऱ्यांचे डिजिटलायझेशन – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
मुंबई:- जलसंधारण विभागाकडील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे डिजिटलायझेशन करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली.
परभणी जिल्ह्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या बाबतीत सदस्य डॉ. राहुल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले, जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागामार्फत परभणी जिल्ह्यात ६२ कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्यात आले. त्यातील ४५ बंधारे सुस्थितीत असून त्यांना गेट बसवण्यात आले आहेत व त्याद्वारे अपेक्षित सिंचन होत आहे. तसेच १७ नादुरुस्त बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे. जर जलसंधारण विभागाकडील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची चौकशी केली जाईल, असेही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.
जलसंधारण विभागामार्फत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना आणि जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचे मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.