माझा सिंधुदुर्ग- महामारीसमोर हतबलतेने नाही तर समर्थपणे लढले पाहिजे!

आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्या मुळगावी येण्याची ओढ प्रत्येकालाच असणार आहे. त्यांना रोखण्यापेक्षा कोणत्या उपाययोजना करता येतील; त्याची चिकित्सा करता आली पाहिजे. सिंधुदुर्गात बाहेरील जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने माणसे येताच जिल्हा प्रशासनाने हतबलता व्यक्त केली. प्रशासन आपल्यापरिने काम करीत आहे. लॉकडाऊनच्या मोठ्या कालावधीत ज्यापद्धतीने प्रशासनाकडून यंत्रणा सक्षम व्हायला हवी होती ती झाली नाही; म्हणूनच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही महामारी एक-दोन महिन्यात संपणारी नाही म्हणूनच पुढील काळासाठी अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. मत मांडण्यापेक्षा काय करायला पाहिजे? हे सांगितले पाहिजे. सिंधुदुर्गात बुद्धिवान डॉक्टर आहेत, हुशार राजकारणी आहेत, विद्वान प्रशासन आहे, सेवाभावी संस्था आहेत, कायद्याचा सन्मान करणारे नागरिक आहेत. मग प्रशासनाने हतबलता का दाखवावी? हा सवाल आहे. म्हणूनच आम्ही काही मुद्दे सुचवत आहोत. तुम्हीही प्रत्येकजण आपले मुद्दे मांडू शकता. अनेकांच्या संघटीत ताकदीने सिंधुदुर्गात कोरोनाचा पराभव होऊ शकतो.

१) जिल्ह्यातील सर्व खाजगी – शासकीय डॉक्टर यांची तालुकानिहाय बैठक घ्यावी. त्यातून प्रत्येक तालुक्यासाठी डॉक्टरांची टीम बनवावी. तालुक्यातील डॉक्टरांच्या टीमने तालुक्यातील प्रमुख पंधरा ते वीस गावांचा गट स्थापन करून त्या गावातील स्थानिक डॉक्टरांची टीम तयार करावी. ह्याची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतीत द्यावी. गावात कोणी आजारी झाल्यास स्थानिक डॉक्टरांच्या टीम सदस्य डॉक्टरांकडे न्यावे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या रुग्णाविषयी नातेवाईकांनी निर्णय घ्यावा. ही सेवा चोवीस तास देण्यात यावी.

२) रुग्णांना नेण्यासाठी खाजगी रुग्णवाहिका, शासनाच्या रुग्णवाहिका त्यांच्यासह गावपातळीवर असलेल्या रिक्षा, चारचाकी वाहन चोवीस तास उपलब्ध व्हावीत म्हणून सेवाभावी वाहनधारकांची यादी तयार करून ती प्रत्येक ग्रामपंचायतीत द्यावी.

३) जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील किमान ५० टक्के बेड शासनाने ताब्यात घ्यावात आणि कोविड १९ बाधित किंवा कोविड १९ संशयित रुग्ण वगळता इतर रुग्णांचे उपचार करावेत.

४) प्रत्येक तालुक्यात किमान २५० बेडचे `कोविड १९’ चे विशेष रुग्णालय सुरु करण्यासाठी शासनाची इमारत उपलब्ध नसल्यास खाजगी हॉल, हॉटेल, मोठी इमारत ताब्यात घ्यावी. सुरुवातीला प्रत्येक तालुक्यात ५० बेडचे `कोविड १९’ चे विशेष रुग्णालय त्वरित सुरु करावे.

५) `कोविड १९’ महामारीच्या विरोधात लढण्यासाठी अनेक सेवाभावी व्यक्तींची आवश्यकता असणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन करावे आणि त्यांच्या उपलब्धतेनुसार आणि त्यांच्या कुवतीनुसार कार्य द्यावे. ( साफसफाई करणे, वाहनधारक, वाहनचालक, जेवण तयार करणे, हॉटेल चालक-मालक, नियोजन करणे, काम करून घेणे, रूग्णांना पोषक आहार देणे, विलगीकरण करणे… अश्या) अनेक कामांसाठी स्वयंसेवकांची टीम लगेच उभी करावी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विषेश पुढाकार जिल्हाधिकाऱ्यांनी, पालकमंत्र्यांनी घ्यावा.

६) प्रत्येक गावातील आजी माजी सरपंच, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी तंटामुक्ती कमिटी सदस्य, निवृत्त व्यक्ती यांच्याबरोबर गावात राहणारे प्रतिष्टीत, सुशिक्षित व्यक्ती, गावातील मंडळे, स्वयंसेवी संस्था यांना एकत्र आणून प्रत्येक गावात स्थानिक ग्रामस्थांची समर्थ टीम बनवावी आणि त्यांना गावातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, आरोग्य सेविका, शिक्षक, पोस्टमास्तर, ग्रामपंचायतमधील कर्मचारी यांनी सर्व सहकार्य करावे.

७) गावातील राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील / प्रत्येक घरातील किती माणसे जिल्ह्याबाहेर राहतात. त्या व्यक्ती कधी येणार आहेत? ह्याची यादी बनवून गाव कमिटीने अलगीकरणाची पूर्ण तयारी करून ठेवावी. संस्थात्मक अलगीकरण करण्यासाठी शक्यतो त्या त्या गावाने पुढाकार घ्यावा आणि नास्ता, जेवण तयार करण्यासाठी बचत गटांचे सहकार्य घ्यावे.

८) गावातील ५० वर्षावरील आणि आजारी व्यक्तींची माहिती (नाव, वय, आजाराचे स्वरूप, कुठल्या डॉक्टरकडे उपचार चालू आहेत) गावपातळीवर तयार करून ती ग्रामपंचायतीत २४ तास उपलब्ध होईल; अशारितीने ठेवणे.

९) पावसाळ्यात अन्य साथीचे आजार येणार आहेत; त्यासाठीही आरोग्य विभागाने पूर्ण तयारी करावी.

१०) शासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्यानी आणि कर्मचाऱ्यांनी पूर्ण कार्यक्षमतेने आपली जबाबदारी पूर्णत्वास न्यावी.

११) जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांनी जिल्ह्यात कोरोना चाचणी केंद्र त्वरित स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावेत; ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा.

अशाप्रकारे अनेक उपाययोजना तज्ञाकडून आखून घेऊन त्यानुसार कार्यवाही केल्यास कोरोना महामारी विरोधात समर्थपणे तोंड देता येईल. जिल्ह्यात अनेक विद्वान सर्व क्षेत्रात आहेत. त्यांचे सहकार्य घेऊन अनेक उपाययोजना करता येतील. त्यासाठी प्रशासनाची इच्छाशक्ती आणि राज्यकर्त्यांची पालकत्वाची भावना अत्यंत महत्वाची आहे.

-नरेंद्र हडकर