आम्रपाली- सुवर्णमहोत्सवी महिला सक्षमीकरणाचे केंद्र!

भारतात स्वातंत्र्यापासून महिलांना समर्थ करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. शासकीय स्तरावरील उपक्रम कासवगतीने पुढे जात असतात; परंतु सहकारी संस्थांनी- स्वयंसेवी विश्वस्त संस्थांनी महिलांना समर्थ करण्यासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. अशा सहकारी संस्थांमध्ये मुंबईच्या `महाराष्ट्र सहकारी उद्योगिनी मर्यादित’ (MSUL) ह्या संस्थेने गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त काळात केलेले कार्य सुववर्णाक्षरांनी लिहिले गेलंय. शनिवार ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने `महाराष्ट्र सहकारी उद्योगिनी मर्यादित’ संस्थेच्या कार्यास व `आम्रपाली’च्या उतुंग भरारीस हार्दिक शुभेच्छा!

`महाराष्ट्र सहकारी उद्योगिनी मर्यादित’ ह्या संस्थेची महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्धता वाखाण्याजोगी आहे. विशेषतः वंचित महिलांना स्वयंसमर्थ करण्यासाठी पुढाकार घेऊन अनेक उपक्रम यशस्वी केले. १९७१ मध्ये मुंबईत नोकऱ्या नसलेल्या निरक्षर आणि अकुशल वंचित महिलांचे पुनर्वसन करून त्यांना सक्षम करण्यासाठी `महाराष्ट्र सहकारी उद्योगिनी मर्यादित’ संस्थेची (MSUL) स्थापना करण्यात आली.

निरक्षर आणि अकुशल वंचित महिलांची दयनीय अवस्था पाहून त्यांच्या मदतीसाठी महिला काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा श्रीमती सुशीला आडिवरेकर श्रीमती. कांता श्रीमल आणि आशा तोरस्कर यांनी सोसायटी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी दिलेले योगदान फलित झाले आणि गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक काळात महिला सक्षमीकरणाचे खूप मोठे कार्य उभे राहिले. `महाराष्ट्र सहकारी उद्योगिनी मर्यादित’ संस्थेचे (MSUL) मुख्य उद्दिष्टे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करून त्यांना सक्षम बनवणे हे होते. `महाराष्ट्र सहकारी उद्योगिनी मर्यादित’ संस्थेची (MSUL) नोंदणी BOM-BRD-(१)२२२-१९७२ क्रमांकाच्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था नोंदणी कायद्यांतर्गत करण्यात आली.

१९७१ नंतर १५०० अकुशल कापड महिला कामगारांना विविध कापड गिरण्यांमध्ये कंत्राट देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याच्या पहिला प्रयत्न यशस्वी झाला. त्यातून आणखीन कार्य करण्यास बळ मिळाले. त्यातून व्यवस्थापकीय समितीने दूध वितरण केंद्रे, शिवण वर्ग, बेकरी स्थापन करून महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी नवीन उपक्रम सुरू केले. प्रशिक्षण, डायमंड पॉलिशिंग आणि किराणा माल, कांदा, बटाटे स्वस्त दरात विकणे; तसेच कुटुंब नियोजन आणि आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यास सुरुवात केली.

महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी `महाराष्ट्र सहकारी उद्योगिनी मर्यादित’ (MSUL) समितीने महिलांना रोजगार देण्यासाठी तत्कालीन कामगार आणि वस्त्रोद्योग मंत्री श्री. नरेंद्र तिडाके यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या सहा गिरण्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या दिल्या शिवाय त्यांना मिल्स कंपाऊंडमध्ये निवारा दिला. सुमारे १५०० महिलांचे पुनर्वसन करण्यात आले. अशाप्रकारे संस्थेचे सर्वच उपक्रम यशस्वी होत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम झाला. अधिकाधिक काम करण्याची ऊर्जा मिळत गेली. त्यातूनच चेंबूरमधील टिळक नगर येथे “आम्रपाली” हे महिलांचे वसतिगृह उघडण्याचा सर्वात मोठा कार्यक्रम हाती घेतला. त्यालाही यश आले आणि वसतिगृहाचे उद्घाटन सन १९७४ मध्ये करण्यात आले. ह्याचा सुवर्ण महोत्सवी दिवस आज आपण पाहतोय.

त्यानंतर कूपर रुग्णालयाजवळ जुहू जेव्हीपीडी योजनेत “सावळी” या कामगार वर्गातील महिलांचे वसतिगृह प्रकल्प सुरू करण्यात आला. सप्टेंबर २००१ मध्ये संस्थेचे यशस्वी कार्याची दखल घेऊन तत्कालीन महसूल मंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी `महाराष्ट्र सहकारी उद्योगिनी मर्यादित’ संस्थेला (MSUL) “आम्रपाली” वर्किंग वुमेन वसतिगृहाशेजारी एक भूखंड दिला होता आणि `महाराष्ट्र सहकारी उद्योगिनी मर्यादित’ संस्थेने (MSUL) सदर भूखंडाचा वापर करून “आम्रपाली” वसतिगृहाच्या विस्ताराव्यतिरिक्त विविध सामाजिक उपक्रम राबविले.

`महाराष्ट्र सहकारी उद्योगिनी मर्यादित’ संस्थेने (MSUL) महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी केलेले कार्य आदर्शवादी आहे. महिलांसाठी वसतिगृह चालविणे, महिलांना स्वाभिमानाने जगण्यास शिकविणे, त्यांचे व्यक्तिमत्व खुलविण्यासाठी-आत्मविश्वास वाढविण्यासाठी विद्वान व्यक्तींकडून मार्गदर्शन शिबीर घेणे, आरोग्य शिबिर आयोजित करणे, महिलांना पोषण आहार देणे, कायदेशीर सल्ला देणे व कायदेशीर मदत देणे, योगाचे प्रशिक्षण देणे, त्यांचे समुपदेशन करणे, त्यांचा हक्काची जाणीव करून देणारे कार्यक्रम आयोजित करणे; असे अनेकविध कार्यक्रम-उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे महिलांची समर्थता निश्चितच वाढली आहे. हे कार्य सातत्याने करून संस्थेने जो आदर्श निर्माण केला आहे तो सामाजिकदृष्ट्या ऐतिहासिक आहे.

वर्तमानात `महाराष्ट्र सहकारी उद्योगिनी मर्यादित’ संस्थेच्या अध्यक्षा म्हणून जेष्ठ विधिज्ञ श्रीमती निर्मलाताई सामंत-प्रभावळकर कार्य करीत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण समिती समर्पित वृत्तीने कार्य करीत आहे. जेव्हा निःस्वार्थी माता भगिनी संघटितपणे समाजकार्य करतात तेव्हा सामाजिक सेवेचा वटवृक्ष तयार होतो. असाच सामाजिक सेवेचा वटवृक्ष `महाराष्ट्र सहकारी उद्योगिनी मर्यादित’ संस्थेचा उभा असून त्या वटवृक्षाच्या सावलीत लाखो महिला समर्थ झालेल्या आहेत. महिलांचे सक्षम होणे म्हणजेच समाज समर्थ होणे. कारण समाजाच्या सर्वांगिण विकासात महिलांचे योगदान पुरुषांच्या बरोबरीचेच नव्हेतर कित्येक पटीने जास्त आहे. म्हणूनच `महाराष्ट्र सहकारी उद्योगिनी मर्यादित’ संस्थेचे कार्य समाजाच्या हितासाठी अत्यावश्यक ठरते. अशा आदर्श संस्थेस आमचा मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा!

-मोहन सावंत