कोरोना विषाणूने केले आरोग्य यंत्रणेचे वास्तव उघड…
युद्धात प्रत्येक देशाच्या मर्यादा उघड…
कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. कालपर्यंत २५ हजार ३५४ लोकांचे जीव गेले. ५ लाख ५९ हजार १६५ लोकांना लागण झालेली आहे. आपल्या भारतातही बाधितांची संख्या वाढत आहे. इटलीसारख्या आधुनिक वैद्यकीय सुविधा असलेल्या देशात मृत्यूचे तांडव सुरू आहे. विकसित अमेरिका हतबल झाली. सुमारे दोनशे देश कोरोना विषाणूविरुद्ध युद्ध करीत आहेत. विषाणूंच्या युद्धात प्रत्येक देशाच्या मर्यादा उघड झाल्या. बलाढ्य देश असो वा वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणारा देश असो; कोरोना विषाणूने त्यांना भानावर आणले आहे. मग आमच्यासारख्या देशाची अवस्था काय होईल? हा खूप मोठा प्रश्न उभा राहतो. काळजी वाटते, १३७ कोटी भारतीयांची.
आरोग्याच्या मूलभूत सोयी नाहीत…
कारण वैद्यकीय क्षेत्रात ज्या सुखसोयी निर्माण करायला हव्या होत्या, त्या आमच्या देशात झाल्या नाहीत. अगदी मूलभूत गोष्टींची वानवा वैद्यकीय क्षेत्रात आहे. देश म्हणून भारत असो, राज्य म्हणून महाराष्ट्र असो आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहर असो किंवा महाराष्ट्रातील ग्रामीण भाग असो; आम्हाला अद्यापही आरोग्याच्या मूलभूत सोयी निर्माण करता आल्या नाहीत. ( मी येथे `आम्हाला’ म्हणतोय. कुठल्या सरकारला दोष देत नाही. आता दोषारोप करण्याची वेळ नाही. लोकनियुक्त सरकार म्हणजे `आम्ही’ म्हणजेच `लोकशाही’)
उदा. समजा सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील खेड्यात एक मनुष्य आजारी पडला. तर तो दहा-पंधरा किलोमीटर अंतर कापून देवगडला जाईल. तेथील शासकीय रुग्णालयात डॉक्टर असेल-नसेल माहित नाही. असला तरी तो रिक्स घेणार नाही. मग त्या रुग्णाला कणकवलीला पाठविले जाईल. तेथीलही शासकीय डॉक्टर रिक्स घेणार नाहीत. त्याला ओरोसला जिल्हा रुग्णालयात जाण्याची शिफारस करतील. जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर तेथील डॉक्टर सुद्धा रिक्स घेण्यास टाळाटाळ करतील. मग रुग्णाला गोवा किंवा मुंबई हे दोन पर्याय उरतात. असं का?
दयनीय अवस्था जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांची…
कारण ज्या मुलभूत गोष्टी असाव्या लागतात, त्या जिल्ह्यात असलेल्या शासकीय रुग्णालयात नाहीत. मोठी मोठी खाजगी रुग्णालये जिल्ह्यात आहेत. त्यांच्याकडे जाण्याशिवाय रूग्णाला पर्याय नसतो; पण हा पर्याय एवढा खर्चिक असतो की रुग्णाला-त्याच्या नातेवाईकांना जमीन- दागदागिने विकावे लागतात, कर्ज काढावे लागते. अन्यथा मृत्यूला सामोरं जावं लागतं. (अशा परिस्थितीतून अनेकजण गेलेले आहेत आणि जाणार आहेत. अशी दयनीय अवस्था जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांची आहे.) काही शासकीय डॉक्टर खाजगी रूग्णालयांच्या धनवान डॉक्टरांशी संधान बांधून असल्याने छोट्या-छोट्या आजारपणासाठी जिल्ह्यातील रुग्णांना अशाप्रकारे त्रास सहन करावा लागतो.
मुंबईतील शासकीय रुग्णालय प्रचंड ताण येतो. मुंबईत सर्व सोयींनी युक्त शासकीय रुग्णालयांची संख्या वाढविणे, राज्यातील प्रत्येक तालुक्यात किमान पाचशे बेडचे अत्याधुनिक रुग्णालय असणे आणि डॉक्टर व इतर कर्मचारीवर्ग पुरेसा असणे, आवश्यक वैद्यकीय साहित्य-औषधे मुबलक असणे; यावर आमच्याकडून भरीव कार्य आजपर्यंत झाले नाही; हे मान्य करावे लागेल.
एक्स-रे काढणे, सोनोग्राफी करणे, मूलभूत रक्तचाचण्या करणे; अशा सोयीसुद्धा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये निर्माण करता आलेल्या नाहीत. . मुंबईतील महानगरपालिकेची रुग्णालये मोजकी आणि रुग्णांची संख्या प्रचंड असल्याने तिथे नेहमीच गंभीर परिस्थिती असते. रुग्णांना जमिनीवर झोपावे लागते. टेस्टसाठी कित्येक महिने वाट पाहावी लागते. हे आरोग्य यंत्रणेचे भयान वास्तव असताना आम्ही कोरोना विषाणूच्या विरुद्ध लढाई कशी करणार? केंद्रशासन-राज्यशासन पूर्णपणे खबरदारी घेत असल्याचे चित्र दिसते. ९८ टक्के लोक शासनाच्या सूचनांचे पालन करत आहेत; पण आपली अपुरी हतबल आणि कोमात असलेली आरोग्य यंत्रणा समर्थपणे आलेल्या प्रसंगाला तोंड कशी देणार?
संशयित कोरोना विषाणूबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात दर दिवशी कमाल पाचशे-सहाशे संशयित कोरोना विषाणूबाधितांची टेस्ट होऊ शकते. छोट्याछोट्या दहा-पंधरा कोटी लोकसंख्या असणार्या देशात दर दिवशी दहा ते वीस हजार संशयित रुग्णांची टेस्ट होऊ शकते. नव्हे केली जाते. भारतासारख्या प्रचंड मोठ्या लोकसंख्येच्या देशात दर दिवशी किमान दहा हजार संशयित रुग्णांची टेस्ट करता आली पाहिजे आणि तीही मोफत. साडेचार हजार रुपये भरून टेस्ट करण्याची आर्थिक क्षमता भारतातील ७० टक्के जनतेकडे नाही; हे आम्हाला समजणार कधी?
एकमेकांपासून किमान तीन फुटाचे अंतर राखायचे कसे?
शासनाच्या सूचनेप्रमाणे आणि वैद्यकीय तज्ञांच्या मते प्रत्येकाने एकमेकांपासून किमान तीन फुटांपेक्षा अधिक अंतर राखले पाहिजे. कोरोना विषाणूविरुद्ध युद्ध जिंकण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे आणि ती प्रत्येकाने पाळायलाच पाहिजे; परंतु मुंबई शहर-उपनगर, विरार, पनवेल, कर्जत, कसारापर्यंत एकमेकांशी घट्ट जोडलेले आहे. या संपूर्ण भागात अडीच ते तीन कोटी लोकसंख्या दाटीवाटीने उभ्या असलेल्या बैठ्या चाळीत-झोपडपट्टीत राहते. अगदी ८०-१०० चौरस फुटाच्या घरात पाच-सहा किंवा अधिक माणसांचे कुटुंब राहत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीचा उल्लेख होतो. तिथे सुमारे २४० हेक्टर क्षेत्रफळात पंधरा ते सतरा लाख लोक राहतात. वांद्रे बेहरामपाड्यातील चार-पाच मजली झोपडपट्टी आपण पाहतो.
अशा परिस्थितीत एकमेकांपासून किमान तीन फुटाचे अंतर राखायचे कसे? सार्वजनिक शौचालयात प्रत्येकाला जावेच लागणार; तिथे गर्दी होणार. जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना, गर्दी होणार. म्हणजे विषाणूचा फैलाव होण्यास अधिकाधिक वाव मिळणार. ह्याचा शासनाने विचार केला आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत एकदाही स्पष्टीकरण दिलेले नाही.
अद्यापही वेळ गेलेली नाही. कोट्यावधी लोकसंख्या असणाऱ्या श्रमजीवी-कष्टकरी लोकांच्या बैठ्या चाळीत-झोपडपट्टीत कोरोना विषाणूंचा फैलाव झाला तर सर्वांवर नामुष्की ओढावेल. हे भविष्य नाही तर इतर देशांचा अभ्यास करून मांडलेले वास्तव आहे; म्हणूनच आजही संशयित रुग्ण नाहीत त्यांना त्यांच्या गावात जायचे असल्यास शासनाने तातडीने परवानगी द्यावी. अन्यथा लोक अनधिकृतपणे जीव धोक्यात घालून जातच आहेत. परराज्यातील कामगार वर्ग पायी चालत निघाला आहे.
किमान महाराष्ट्रात ज्याची गावे आहेत, त्यांना तपासणी करून पाठवून देण्याची व्यवस्था शासनाने करावी. विशेषत: कोकणातील घरे ही आकाराने मोठी आणि एकमेकांपासून दूर-दूर असतात. अशा ठिकाणी संशयित रुग्णांचे विलगीकरण करणे निश्चितच सोपं होऊ शकतं. रोगप्रतिकार शक्ती कमी आणि इतर आजार असलेल्यांना कोरोना विषाणूची लागण होण्याची आणि त्यात दगावण्याची शक्यता अधिक असते.
देशांमध्ये मुबलक व्हेंटिलेटर नाहीत. हे श्वासोच्छवास घेण्यास मदत करणारे वैद्यकीय साधन आहे. कोरोना विषाणूबाधितांपैकी सुमारे ३० टक्के लोकांना ह्याची निकड असते अन्यथा जीवावर बेतू शकतं. आपल्या देशात-मुंबईत आपण लोकसंख्येच्या एक टक्के तरी व्हेंटिलेटर देऊ शकतो का? नाही. कारण आमच्याकडे त्याची उपलब्धताच नाही. म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी- माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित निर्णय घेऊन आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात आणि साथीचा फैलाव रोखण्यासाठी अतिशय गंभीरपणे त्वरित उपाययोजना कराव्यात!
घरात राहून देशाची सेवा करा…
आज प्रत्येकाने स्वतःला आणि कुटुंबियांना कोरोना विषाणूपासून दूर ठेवणे महत्वाचे ठरते म्हणूनच प्रत्येकाने घरातच राहायचे आहे. अत्यावश्य्क कामासाठीच घराबाहेर जायचे आहे. अन्यथा आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना कोरोना विषाणूची बाधा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासनाच्या प्रत्येक सूचनांचे पालन करून देशाचे जबाबदार नागरिक म्हणून देशाची सेवा करू!
-नरेंद्र हडकर