कोरोना विषाणू संसर्ग हा तिसऱ्या महायुद्धाचा एक छोटासा भाग…

कोरोना विषाणू संसर्ग `एक मोठं षडयंत्र आहे’…
गाफीलपणा नडला, लाखो मृत्यूला आमंत्रण दिले!

जग तिसऱ्या महायुद्धाकडे वेगाने जात असून त्याची पूर्वतयारी म्हणून अनेक बलाढ्य देश भविष्यात आपल्या देशाला सामर्थ्य मिळवून देण्यासाठी वर्तमानात डाव-प्रतिडाव मांडत आहेत. त्यामुळे जग अधिकाअधिक महायुद्धाच्या दरीत कोसळत आहे. महायुद्धाचा उद्रेक होण्यापूर्वीची पूर्वतयारी म्हणून मागील काही वर्षात ज्या घटना घडल्या, त्या अतिशय गंभीर भयंकर आणि गुंतागुंतीच्या होत्या. डिसेंबर २०१९ पासून जरी आपण काही ठळक घटना पाहिल्या तरी आपणास अनेक ठोकताळे बांधता येतील.

नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळता येत नाही; परंतु हवामान बदलाचे (weather modification) तंत्रज्ञान प्रगत झाल्याने काही प्रमुख देशांनी आपल्या सोयीनुसार महापूर, वादळ, सुनामी निर्माण करण्याची ताकद आपल्या हाती (haarp technology) ठेवली आहे. त्याचबरोबर युद्धामध्ये शस्त्रे म्हणून अनेक गोष्टींचा समावेश झालेला आहे. अणुबॉम्ब, क्षेपणास्त्र, लढाऊ विमाने, लढाऊ नौका, उपग्रह अशी अनेक साधने निर्माण झाली.

व्हायरसचा आपला जुना परिचय असला तरी आता त्याचा अत्याधुनिक प्रकारही आपण पाहत आहोत. प्रत्येक संगणकांमध्ये- मोबाईलमध्ये अँटीव्हायरस एप्लीकेशन आपण ठेवतो. मात्र आता मुद्दाम विषाणू पसरून विरोधी राष्ट्रातील माणसांचा मृत्यू घडविण्याचं तंत्रज्ञानही प्रगत राष्ट्रांनी विकसित केले आहे. रोगजंतूंचा शस्त्र म्हणून वापर करून जास्तीत जास्त जीवितहानी घडवून आणायची, ह्याला जैविक युद्ध म्हटले जाते.

१९७२ सालच्या जैविक शस्त्रांच्या करारानुसार कुठल्याही जैविक साधनांची व विषाणू निर्माण होणाऱ्या विषारी पदार्थांची वाढ, उत्पत्ती व साठा करण्यास बंदी आहे. हा करार ६७ राष्ट्रांनी स्वीकारला होता. तरीही काही राष्ट्रांनी विषाणूंची निर्मिती सुरू ठेवली आहे. हा मानव जातीला कलंक आहे. अशाप्रकारे कोरोना व्हायरस विषाणूची मुद्दामहून निर्मिती केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जर मागील दहा- पंधरा वर्षातील जागतिक घटना पाहिल्या तरी प्रगत व बलाढ्य राष्ट्रांची नीती – कूटनीती लक्षात येते. त्यातून भविष्यात महायुद्ध कुठल्या माध्यमातून लढले जाणार, तेही स्पष्ट होतं.

डिसेंबर २०१९ मध्ये कोरोना व्हायरसचा रुग्ण चीनमध्ये सापडला. चीनच्या वुहान शहरात सुरू झालेली ही लागण आजमितीस जगभरात २०८ देशात पसरली. त्यात ७२ हजार ६१६ लोक मृत्युमुखी पडले, तर १२ लाख ७९ हजार ७२३ लोकांना ह्या विषाणूची बाधा झाली आहे. ही वैश्विक महामारी आहे, असं एका बाजूने म्हटलं तरी हा तिसऱ्या महायुद्धाचाच भाग आहे, हे लक्षात येईल. त्यासाठी जास्त भूतकाळात न जाता डिसेंबर २०१९ पासूनचा ठराविक मुख्य घटनाक्रम पाहिल्यास अनेक गोष्टी आपल्याला सहजपणे लक्षात येतील.
—————————————

३० नोव्हेंबर २०१९
हाँगकाँगच्या स्थानिक निवडणुकांमध्ये लोकशाहीवादी गटांना अभूतपूर्व यश मिळाले. तत्पूर्वी अमेरिकेने हाँगकाँगच्या मुद्द्यावर कायद्याला दिलेली मंजुरी चीनच्या पचनी पडली नाही. त्यामुळे चीनने अमेरिकेविरुद्ध कारवाईची तयारी सुरू केली.

२ डिसेंबर २०१९
ऑस्ट्रेलियाची राजकीय व्यवस्था पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी चीन सरकारने घातकी कारवाया केल्या; असा आरोप करून ऑस्ट्रेलियाने चीनची हेरगिरी रोखण्यासाठी `हाय लेवल इंटेलिजन्स टाक्स फोर्स’ची स्थापना केली.

४ डिसेंबर २०१९
चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांवर निर्बंध लादण्याची तरतूद असणाऱ्या `उघुर अ‍ॅक्ट २०१९’ विधेयकाला अमेरिकेच्या संसदेने मान्यता दिली.
तत्पूर्वी चीनने ११ लाख उघुरवंशीयांना छळछावण्यांमध्ये डांबून ठेवल्याचा चीनवर आरोप आहे. अमेरिकेची ही कृती चीनला झोंबणारी होती.

३ डिसेंबर २०१९
अमेरिकेच्या हाँगकाँग अ‍ॅक्टला चीनने आक्षेप घेत अमेरिका युद्ध नौकांना हाँगकाँगमध्ये प्रवेश बंदी जाहीर केली.

६ डिसेंबर २०१९
चीनच्या वाढत्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी अमेरिकेने ९ प्रगत पाणबुड्यांची उभारणी करण्याचे जाहीर केले. त्यासाठी २२ अब्ज डॉलर्सहून अधिक तरतूद केली जाणार असून या पाणबुड्या २०२९ मध्ये अमेरिकन नौदलात दाखल होतील. चीनला घेरण्यासाठी जपानकडून `ईस्ट चायना सी’मध्ये बेटाची खरेदी केली गेली.

७ डिसेंबर २०१९
अमेरिकेने जागतिक बँकेला चीनला अर्थसाह्य न करण्याचे फर्मान काढले. जागतिक बँकेने मागील दोन वर्षात ३.७ अब्ज डॉलरचे कर्ज दिले. चीन हा जगातील सर्वाधिक परकीय गंगाजळी असणारा देश आहे. चीनकडे ३.०९६ ट्रिलियम डॉलर्स इतकी प्रचंड परकीय गंगाजळी आहे. याचा वापर करून चीन इतर देशांना कर्जाच्या विळख्यात अडकवित आहे; असा आरोप अमेरिकेने केला.

८ डिसेंबर २०१९
हाँगकाँगमध्ये चीन विरोधी पुन्हा व्यापक निदर्शने सुरुवात झाली. ह्या आंदोलनाला जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया देशांकडून पाठिंबा मिळत आहे.

९ डिसेंबर २०१९
अफगाणिस्तानसह इतर भागातील अमेरिकी लष्कराची तैनाती कमी करून त्याचा वापर इंडो पॅसिफिक क्षेत्रासह चीन व रशियाचा मुकाबला करण्यासाठी केला जाईल; असे वक्तव्य अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी केले.

१२ डिसेंबर २०१९
मानवाला काही तासात पृथ्वीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे नेणे, अंतराळातून वाय-फाय सेवा पुरविणे (मोबाईल टॉवरची आवश्यकता नाही) आणि मोबाईल फोन चार्ज करणे, अतिरिक्त ऊर्जेचा साठा करून ठेवणे; असे अत्याधुनिक तंत्रज्ञान अमेरिकेच्या स्पेस फोर्सने विकसित केले, असा दावा अमेरिकेच्या वायुसेनेचे माजी वरिष्ठ अधिकारी जनरल स्टीवन वॅस्ट यांनी केला. जागतिक समीकरणे बदलतील असे हे तंत्रज्ञान आहे. ह्यावर चीनने जोरदार आक्षेप घेतला.

१५ डिसेंबर २०१९
लष्करी तळाची टेहळणी करणाऱ्या चीनच्या २ राजनैतिक अधिकाऱ्यांची अमेरिकेकडून हकालपट्टी करण्यात आली. उघुरवंशियांवरील अत्याचाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी चीनच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त आले. अमेरिकेच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणीवर रशियाची टीका तर चीनकडून रशियाला समर्थन मिळाले.

१९ डिसेंबर २०१९
चीनच्या कंपन्यांवरील कर्जाचा बोजा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचा दावा जागतिक अर्थ तज्ज्ञांनी केला.

२० डिसेंबर २०१९
अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य देश जगातील १.७ अब्ज इस्लाम धर्मीयांचे भवितव्य निश्चित करू शकत नाहीत, तसेच अमेरिकेचे आर्थिक वर्चस्व जुगारण्यासाठी इस्लामधर्मीय देशांची स्वतंत्र क्रिप्टोकरन्सी हवी; अशी मागणी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी केली.

२१ डिसेंबर २०१९
संरक्षण दलासाठी अत्यावश्यक असणारी खनिज चीनमध्ये न पाठविता त्या खनिजांवर अमेरिकेतच प्रक्रिया व्हावी, असा निर्णय अमेरिकेने घेतला.

२७ डिसेंबर २०१९
युरोपमधील चिनी कंपन्यावर व गुंतवणुकीवर निर्बंध नको, असे आवाहन युरोपिय महासंघातील चीनच्या राजदूतांनी केले.

१ जानेवारी २०२०
नववर्षाचे स्वागत न करता हाँगकाँगच्या समर्थनार्थ चीनमध्ये आंदोलन अधिक तीव्र झाले.

२ जानेवारी २०२०
चीनच्या सरकारने हाँगकाँग आणि उघुरवंशीय आंदोलनकर्त्यांना डांबले, तर तैवानने चीन विरोधात विधेयक मंजूर केले. अमेरिकेने हाँगकाँग आंदोलनाला पाठिंबा दिल्याने ब्रिटनच्या कंपन्यांच्या स्टॉक मार्केटमध्ये व्यवहारांना चीनने स्थगिती दिली.

३ जानेवारी २०२०
अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे मेजर जनरल सुलेमानी ठार झाले. इराणने बदला घेण्याची धमकी दिली. त्याचवेळी अमेरिका व चीनमध्ये आर्थिक युद्ध सुरू झाल्याचे दिसले.

४ जानेवारी २०२०
वातावरणातील बदलांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला २० ट्रिलियन डॉलरचा फटका बसेल; असा तज्ञांनी दावा केला.

१५ जानेवारी २०२०
जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगाला पुन्हा गंभीर इशारा देऊन सावध केले.

२३ जानेवारी २०२०
चीनने वुहान आणि वुहान शेजारी असलेल्या हुआन गॅंग ह्या शहरात लॉकडाऊनची घोषणा केली.

२४ जानेवारी २०२०
१९ जानेवारीपासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर १,७८९ जणांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली. त्याच दिवशी देशात दोन संशयित रुग्ण सापडले, तर चीनने १४ शहरांमध्ये लॉकडाऊन केले.

२७ जानेवारी २०२०
कोरोना विषाणूची लागण जगात एक लाखाहून अधिक लोकांना झाली, असा दावा ब्रिटनच्या संशोधकांनी केला. जागतिक शेअर बाजारात आणि इंधन दरात मोठी घसरण झाली. १२ देशात कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडले.

२८ जानेवारी २०२०
महाराष्ट्रात सहा संशयित रुग्ण तर चीनमध्ये साडेचार हजार रुग्ण सापडले आणि चीनमध्ये १०६ जणांचा बळी गेला.

२९ जानेवारी २०२०
चीनसह १७ देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण सापडले. चीनमधील युरोपीय देशांनी हवाई वाहतूक थांबविली.

३० जानेवारी २०२०
भारतात केरळमध्ये कोरोना विषाणू बाधित पहिला रुग्ण सापडला.

३१ जानेवारी २०२०
जागतिक आरोग्य संघटनेने ग्लोबल इमर्जन्सी जाहीर केली. कोरोना विषाणूची सात १८ देशांमध्ये पसरली.

१ फेब्रुवारी २०२०
चीनमधील ३२४ भारतीयांना भारतात खाजगी विमानाने आणले गेले. चीनच्या १९ राज्यांमध्ये लॉकडाऊन सुरू झाले.

२ फेब्रुवारी २०२०
केरळमध्ये दुसरा रुग्ण सापडला. जगभरात ३०० बळी गेले. पुन्हा ३२३ भारतीयांना चीनमधून भारतात आणले गेले.

३ फेब्रुवारी २०२०
कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना भारताने केली. कोरोना विषाणूसंदर्भात अमेरिका जगाला घाबरवित आहे, असा चीनने आरोप केला.

४ फेब्रुवारी २०२०
कोरोना विषाणू साथीवर नियंत्रण मिळविण्यास अपयश आल्याची चीनने कबुली दिली.

५ फेब्रुवारी २०२०
जगात कोरोना विषाणूची साथीने भयंकर रूप धारण केले.

६ फेब्रुवारी २०२०
कोरोना विषाणूबाबतची चीनने दाखवलेली बेपर्वाईने आंतरराष्ट्रीय समुदाय नाराज झाला. तर चीनमधील बळींची संख्या २५,००० असल्याचा चीनी कंपनीने दावा केला. हा दावा अतिशय भयंकर संकटांची चाहूल देणारा होता.

९ फेब्रुवारी २०२०
कोरोना विषाणू महामारीचा जगभरात प्रसार जोरात सुरू होता. भारतीय औषध उद्योग संकटात आला. २०१८-१९ मध्ये भारताने चीनकडून २४० कोटी ५४ लाख डॉलरची औषधी पदार्थांची आयात केली. भारत आयात करीत असलेल्या औषधी पदार्थांपैकी ६७.५७% आयात चीनमधून होते. चीनला गेलेल्या परदेशी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आली.

१० फेब्रुवारी २०२०
जगभरात ४० हजार ६२७ जणांना कोरोना विषाणूंची लागण झाली आणि ही आकडेवारी हिमनगाचे टोक आहे, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा दिला. चीनच्या वुहान शहरातील प्रगत जैविक प्रयोगशाळेत हा विषाणू तयार झाला असल्याचा आरोप अमेरिकेने करून चीनला जबाबदार धरले. तर इस्रायलच्या माजी गुप्तचर अधिकाऱ्याने चीनच्या जैविक युद्धाचा भाग असल्याचे जाहीर केले.

११ फेब्रुवारी २०२०
हाँगकाँगमधील प्रख्यात वैद्य तज्ञ प्राध्यापक ग्रॉब्रिएल लुंग यांनी दिलेला इशारा थरकाप उडविणारा होता. ते म्हणाले, जगातील ६० टक्के लोकांना या विषाणूची बाधा होईल.

१२ फेब्रुवारी २०२०
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक म्हणाले की, कोरोना विषाणू मानवतेचा क्रमांक एकचा शत्रू आहे.

१४ फेब्रुवारी २०२०
कोविड-१९ ची साथ एक वर्ष कायम राहील; असा इशारा अमेरिकन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला. तर चीनचे लष्कर जैविक शस्त्रे तयार करीत असल्याचा ब्रिटिश दैनिकाचा दावा खळबळजनक होता.

त्यानंतर कोरोना विषाणूचा फैलाव तीव्र गतीने जगभरात होत होता. भारतातही रुग्ण सापडत होते. परदेशातील भारतीयांना विशेष विमानाने आणले जात होते. साथ पसरलेले देशांनी कोरोना विषाणूविरोधात युद्ध करण्यास सरसावले.

३ मार्च २०२०
२६ औषधांच्या निर्यातीवर भारताने बंदी घातली.

४ मार्च २०२०
भारतात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या २८ झाली. “विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार एकत्रितरित्या काम करीत असून भीती बाळगण्याची गरज नाही. आरोग्य विभागाचे पूर्णपणे लक्ष असून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे”; असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

५ मार्च २०२०
अमेरिकेत तीन प्रांतात इमर्जन्सीची घोषणा केली गेली.

६ मार्च २०२०
जगात एक लाख कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडले. दीड कोटी लोकांचा बळी जाऊ शकतो; असा ऑस्ट्रेलियन संशोधकांने दावा केला.

८ मार्च २०२०
इटलीने १६ प्रांतात लॉकडाऊन केले. भारताने तपासणीसाठी देशभरात ५२ प्रयोगशाळा तयार केल्या.

१२ मार्च २०२०
भारतात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ७८ वर गेली. कोरोना व्हायरस जागतिक महामारी असल्याचा जागतिक जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला.

१३ मार्च २०२०
भारतात पहिला बळी गेला आणि उपाययोजनांची घोषणा शासनाकडून झाली. अकरा राज्यांनी सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

१४ मार्च २०२०
भारताने राष्ट्रीय आपत्ती घोषित केली. महाराष्ट्र सरकारने ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तर युरोप कोरोना विषाणूचा केंद्रबिंदू ठरला. अमेरिकेत नॅशनल इमर्जन्सीची घोषणा झाली.

१५ मार्च २०२०
“भारतात कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत असूनही आरोग्य आणीबाणीसारखी परिस्थिती नाही,” असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. तर दुसरीकडे ह्या संकटाशी लढा देण्यासाठी सार्क सदस्य देशांना एक कोटी डॉलरचे आपत्तकालीन अर्थसहाय्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

१६ मार्च २०२०
जगभरात वुहानसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा चीनच्या तज्ञांनी इशारा दिला. युरोपसह अन्य देशातील प्रवाशांना भारतात बंदी घालण्यात आली.

१७ मार्च २०२०
सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहिली. परंतु `नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये व अनावश्यक प्रवास टाळावा,’ असे आवाहन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केले. तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात `आंशिक बंद’चा निर्णय घेतला गेला. काही मेल रद्द केल्या, ५० टक्के दुकाने बंदचा निर्णय, कार्यालयात पन्नास टक्के कर्मचारी उपस्थित राहतील, असा निर्णय झाला.

२० मार्च २०२०
“१३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाला बेसावध राहणे परवडणारे नाही म्हणून भारतीय जनतेने संकल्प करून संयम ठेवावा. २२ मार्चला सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू अमलात आणावा!” असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
महाराष्ट्रात मोठ्या शहरातील खाजगी कंपन्या पुढील आदेशापर्यंत बंद राहतील; असे आदेश महाराष्ट्र शासनाने काढले.

२४ मार्च २०२०
रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली.
—————————————————–

वरील सर्व ठळक घटनांमधून जागतिक अशांतता अधिकाधिक वाढत असून लवकरच त्यातून भीषण रूप जगासमोर येईल; असे प्रत्येक देशाला समजणे गरजेचे होते. काही देशांचा अपवाद वगळता जैविक युद्धाला समर्थपणे सामोरे जाण्याची ताकद अनेक बलाढ्य देशातही नव्हती हे आता सिद्ध होत आहे.

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गुढ संसर्गजन्य आजाराची सुरुवात चीनमधील वुहान शहरापासून झाली. सुरुवातीच्या काळात चीनने अधिकृतरित्या माहिती देण्यास विलंब केला. ३ जानेवारीपर्यंत वुहान शहरात ४४ जणांना गुढ साथीची लागण झाली होती. त्यातील अकराजण गंभीर होते. हाँगकाँगमध्ये ह्या गुढ साथीने शिरकाव केला होता.

चीनने कोरोना विषाणू संसर्ग रोगाबाबत माहिती लपवून ठेवली. २० जानेवारीला चीनने कबुली दिली; परंतु तोपर्यंत अनेक देशातील लोकांना संसर्ग झाला होता. चीनने चाळीस-पन्नास जणांना लागण झाली असे सांगितले होते; पण प्रत्यक्षात दहा हजार लोकांना तो संसर्ग झाला होता, असे युरोपियन संशोधकांचे म्हणणे होते. (चीनने खरी आकडेवारी अजूनही दिलेली नाही.)

ह्या घटनेचे वृत्त येतात आशियाई देशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सिंगापूर, मलेशिया, दक्षिण कोरिया, तैवान, इंडोनेशिया या देशांनी तातडीने हालचाली केल्या आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी विमानतळावर स्वतंत्र यंत्रणा उभी केली.

२०१९ मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि इतर संस्थांनी अज्ञात गूढ आजाराचा उल्लेख वारंवार करून लाखो लोकांचे त्यात बळी जाऊ शकतात; असा अहवाल दिला होता.

तरीही जगातील अनेक देशांनी त्याकडे दुर्लक्ष केले. राष्ट्रप्रमुखांनी अशाप्रकारे जागतिक घटनांकडे दुर्लक्ष करणे, किती आत्मघातकी असू शकतं; हे आता स्पष्ट होत आहे.

चीनमध्ये आलेले गुढ विषाणूची साथ जगभरात फैलाऊ शकते; यासाठी प्रत्येक देशाने आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, असा सावधानतेचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळूनही तशी तयारी का केली नाही? हा मोठा प्रश्‍न प्रत्येक अभ्यासकाला आज पडत आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि इतर संस्थांनी केलेल्या सूचना गंभीरपणे घेण्यासारखे नाहीत; असे का वाटावे? म्हणजेच याचा दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की ह्या गंभीर सूचनांकडे मुद्दामहुन दुर्लक्ष केला गेला आणि जर मुद्दामहून दुर्लक्ष केला गेला असेल तर हे `एक मोठं षडयंत्र आहे’ हे विधान खूपच धक्कादायक आहे. पण जागतिक घडामोडीचे तज्ञ अभ्यासक अनेक मुद्दे जगासमोर मांडत असून त्यांच्या अभ्यासातून जग तिसऱ्या महायुद्धाच्या कात्रीत सापडलेला आहे; हे वास्तव समोर येत आहे. म्हणूनच कोरोना विषाणू संसर्ग हा तिसऱ्या महायुद्धाचा एक छोटासा भाग असून भविष्यात खूप मोठी किंमत मानव जातीला चुकवावी लागणार आहे.

-नरेंद्र हडकर