दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेची मुल्य जोपासली पाहिजेत!
पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने उमटलेली `अक्षरं’ समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी प्राधान्य देणारी ठरतात; जेव्हा ती अक्षरं व अक्षरातून तयार झालेले `शब्द’ समाजाशी बांधिलकी असणाऱ्या विद्वान अभ्यासू चिकित्सक वृत्तीच्या पंडित बाळशास्त्री जांभेकर यांच्या लेखणीतून प्रकटतात तेव्हा!
आज महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा होत आहे. ६ जानेवारी १८३२ रोजी युगप्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील दर्पण नावाचे पहिले वृत्तपत्र सुरु केले. सर्वसामान्य जनतेला समजेल अशा मराठी भाषेतून आणि सामान्य जनतेच्या समस्या सत्ताधारी इंग्रजांना समजून याव्यात म्हणून इंग्रजीतून त्याच वृत्तपत्रातून स्तंभ लिखाण `दर्पण’ मधून केले जाई. सुरुवातीला पाक्षिक असणारे वृत्तपत्र नंतर साप्ताहिकमध्ये रूपांतरित केले गेले. जुलै १९४० मध्ये दर्पणाचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला. परंतु साडेआठ वर्षाच्या कालावधीत `दर्पण’ने समाजाच्या भल्यासाठी केलेली पत्रकारिता आजही आदर्शवत आहे.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात असलेल्या पोंभुर्ले ह्या दुर्गम खेडेगावी २० डिसेंबर १८१२ रोजी झाला. त्यांचे वडील गंगाधरशास्त्री हे सुद्धा विद्वान असल्याने बालपणीचे शिक्षण पित्याकडेच झाले. त्या शिक्षणातून मराठी आणि संस्कृत भाषा त्यांना अवगत झाल्या. अवघ्या तेराव्या वर्षी म्हणजे इ. स. १९२५ मध्ये त्यांनी मुंबई गाठली. त्यांच्यासमोर अधिकाधिक शिक्षण घेण्याचे ध्येय पक्के होते. मुंबईत सदाशिव काशिनाथ उर्फ बापू छत्रे आणि बापू शास्त्री शुक्ल यांच्याकडे इंग्रजी व संस्कृतचा अभ्यासास सुरुवात केली. त्याच बरोबरीने गणित व विज्ञान विषयातही प्राविण्य मिळविले. वयाच्या विसाव्या वर्षी ते प्राध्यापक झाले. बाविसाव्या वर्षी नामांकित एल्फिस्टन कॉलेजात व्याख्येते म्हणून रुजू झाले. मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक इत्यादी भाषा त्यांनी अवगत केल्या.त्यासाठी त्यांना मानसन्मानही मिळाले.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबर बाळशास्त्री जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा सखोल अभ्यास केला. त्यामुळे कोकणातील शिलालेख व ताम्रपट संदर्भात अनेक शोधनिबंध लिहिले. ज्ञानेश्वरीला प्रथमच मुद्रित करून वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम आणि ज्योतिष व गणित विषयातील `तज्ञ’पणामुळे कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती होणे; हे सुद्धा लक्षणिय आहे. इतिहास विषयासह रसायन, भूगर्भ, प्राणि, वनस्पती, न्याय, मानस इत्यादी शास्त्रांमध्येही त्यांनी पारंगतता मिळवली होती.
एवढे सर्व ज्ञान संपादन करीत असताना त्यांना समाजातील अनेक समस्यांचे गंभीर स्वरूप लक्षात येऊ लागले. समाजातील वाईट चालीरीती, रूढी परंपरा, अज्ञान, दारिद्र्य त्यांना स्वस्थ बसू देईनात. लोकशिक्षणासाठी आणि सत्ताधाऱ्यांपर्यंत जनतेच्या समस्या नेण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा मार्ग निवडला. ६ जानेवारी १८३२ रोजी `दर्पण’ नावाचे पाक्षिक व त्यानंतर १८४० मध्ये मराठीमधून पहिले मासिक सुरु केले. त्यामध्ये विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेख त्यातून त्यांनी प्रसिद्ध केले.
पारतंत्र्यामध्ये लोकशिक्षणासाठी आणि जनतेच्या समस्या मांडण्यासाठी वृत्तपत्र काढण्याचे सामर्थ्य खूप मोठे आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी इतिहास घडविला; जो सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्यही त्यांना युगप्रवर्तक म्हणून मान्यता देणारे होते.
अवघ्या सोळा वर्षात बाळशास्त्री जांभेकरांनी जे काही देशाला प्रदान केले ते चिरकाल टिकणारे आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आजच्या पत्रकारांनी जपला पाहिजे. त्यांच्या पुण्य स्मरणाने त्यांच्या सद् गुणांचा सुगंध सर्वदूर पसरला गेला पाहिजे.
किमान आजच्या पत्रकारांनी अभ्यासू वृती आणि सामान्यांच्या समस्यांची जाण ठेवली पाहिजे. बाळशास्त्री जांभेकरांनी केलेली पत्रकारिता १९ व्या शतकातील असली तरी आजच्या आधुनिक युगातही त्यांचे विचार आणि कर्तृत्व तेजस्वीमान आहेत.