संपादकीय- कौतुकास्पद… सुनेत्राताई अपेक्षापूर्ती करा!
२८ जानेवारीला विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मृत्यूने झडप घातली. अवघा महाराष्ट्र हळहळला! एका कर्तृत्ववान राजकीय नेत्याचा असा दुर्दैवी अंत होईल; असे कोणालाही स्वप्नात वाटले नव्हते. सध्या राजकीय नेते आदर्श व्यक्ती ठरत नाहीत; कारण राजकारण एवढे गलिच्छ झालेले आहे की त्यात नीतिमत्ता, नैतिकता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, निष्ठा, विकासाची दूरदृष्टी, सामंजस्यपणा, नि:स्वार्थीपणा असे अनेक शब्द नाहीसे होत चालले आहेत! तरीही आजच्या राजकारणात अजित पवार उजवे होते! महाराष्ट्राचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पद त्यांनी मिळविले. अनेक खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले; एवढेच नाही तर भविष्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी ते प्रमुख दावेदार होते. १८-१८ तास काम करण्याची त्यांची सवय आदर्शवादी होती. प्रशासनावर त्यांची उत्तम पकड आणि सर्वसामान्यांची कामे करण्याची त्यांची नियत होती. असं सक्षम नेतृत्व काळाने अचानक गायब केलं!
त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या राज्यसभेच्या खासदार! अजित पवार गेल्यानंतर राजकीय गिधाडांची हालचाल पाहता उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी घेतलेली शपथ खरोखरच कौतुकास्पद आहे. एका महिलेने स्वतःच्या पतीचा दुर्दैवी अंत पाहिला; तिला ते प्रचंड वेदनादायी – दुःखद आहे. अशा दुःखाच्या प्रसंगातही नेतृत्व करण्याची क्षमता दाखविल्याबद्दल सुनेत्रा पवार यांचे कौतुकच करायला पाहिजे! अन्यथा राष्ट्रवादी पक्षावर आणि अजित पवार यांच्या मंत्रीपदावर नको असलेल्या नेत्यांनी दावा सांगितला असता! सुनेत्रा पवार यांनी दुःखातही आपल्या अंगावर आलेली जबाबदारी झटकली नाही; तर त्या ठामपणे उभ्या राहिल्या आणि महाराष्ट्रातील सर्व आया-बहिणींना दाखवून दिले की जबाबदारी घ्यायला शिका! हीच ती कौतुकास्पद बाब!
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात महिलांसाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांनी महिलांना स्वाभिमानाने जगायला शिकविले. त्यामुळे महिलांनी सर्व क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले. ह्याच महाराष्ट्रात आपल्या पतीच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी पतीच्या पश्चात जबाबदारी पेलण्यास सज्ज झाली. खरोखरच इतिहास घडला. महाराष्ट्राने केलेले मानवतेचे कार्य, सुधारणा व कायदे देशासाठी नव्हे तर जगासाठी आदर्श आहेत. तोच आदर्श आजच्या घटनेने निर्माण झाला. राजकारणामध्ये महिलांचे सक्षमीकरण ह्या विषयावर बोलले जाते; पण कृतीची वेळ आली की सगळे राजकीय पक्ष मात्र उलट प्रवास करतात. हा उलट प्रवास थांबविण्यासाठी सुनेत्रा पवार यांचा निर्णय फार उपयुक्त आहे!
सर्वसामान्य महिलेचा पती जेव्हा मृत्युमुखी पडतो तेव्हा ती महिला आपल्या कुटुंबाची धुरा सांभाळते; तशी धुरा उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख म्हणून सुनेत्रा पवार यांनी सांभाळली. त्यामुळे `एवढी घाई बरी नव्हे!’ `सुनेत्राताई… तुम्ही चुकलात!’ असं म्हणणं योग्य ठरत नाही. ज्या घरात सक्षम कर्तृत्वान स्त्री आहे; ते कुटुंब कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाताना डगमगत नाही. हा धडा सुनेत्रा पवार यांनी दिला. राजकारणातील गिधाडांना ही चपराक आहे; असे आम्ही मानतो!
सध्याच्या आकडेवारीनुसार १ कोटी ५७ लाख महिला `मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत लाभार्थी आहेत. त्यांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात. सदर योजनेंतर्गत लाभार्थी होण्यासाठी कोणत्या अटी आहेत? कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. ह्याचा अर्थ काय होतो? प्रचंड महागाईमध्ये १ कोटी ५७ लाख महिलांच्या कुटुंबांचे मासिक उत्पन्न २०,८०० रुपयांपेक्षा कमी आहे. अशा आर्थिक विवेचनात असलेल्या कुटुंबाचे नेतृत्व १ कोटी ५७ लाख महिला करतात. त्यांच्यासाठी महिना दीड हजार रुपये देणे योजना अत्यावश्यकच आहे. (कारण सत्ताधारी त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेला कार्यक्रम यशस्वीपणे राबवित नाहीत.) अगदी महिन्याला पंधरा हजार रुपये त्यांना मिळावेत अशी योजना आणावी किंवा एका कुटुंबाचे उत्पन्न किमान ३० हजार रुपये व्हावे; ह्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत! कारण अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा घेता येणार नाहीत. त्यांना शाशकीय रुग्णालयावर अबलंबून राहावे लागेल; जी रुग्णालये व्हेंटिलेटर आहेत. अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही! त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिक्षण घ्यावे लागेल; ज्या आज अंतिम घटका मोजत आहेत. ह्या बाबींचा विचार करता महिलांना पंधराशे रुपये मिळतात म्हणून कोल्हेकुई करणे हरामखोरी आहे! अशा महिलांचे नेतृत्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी करावे; असे आमचे स्पष्ट मत आहे!
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी सुमित्राताई पवार विराजमान झाल्या! त्यांना आता कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी विधायक कार्य करणे जसे गरजेचे आहे; तसंच महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांनी योगदान दिले पाहिजे. तेव्हाच त्यांची योग्यता सिद्ध होईल! त्यासाठी त्यांना शुभेच्छा!
-नरेंद्र हडकर










