नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना- कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी

एकाच कुटुंबातील ४ आयपीएस-आयएएस अधिकारी करताहेत देशसेवा!

एकाच कुटुंबातील एकदोन नव्हेतर सहापैकी पाचजण आयपीएस-आयएएस अधिकारी असून अतिशय प्रामाणिकपणे देशाची सेवा करीत आहेत. नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी ह्या यूपीएससीमध्ये देशातून टॉपर होत्या. २००१ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण देशातून टॉपर येणाऱ्या त्या पहिल्या दक्षिण भारतीय महिला ठरल्या. गेल्या २० वर्षात त्यांनी आपल्या कारकिर्दीत घेतलेले निर्णय देशाच्या विकासासाठी, देशातील सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त ठरले आहेत.

वीरप्पनला ठार करणाऱ्या अधिकाऱ्याची मुलगी!

श्री. शंकर बिदरी

कुख्यात चंदन तस्कर व क्रूर दरोडेखोर वीरप्पन यांना ठार मारणारे आयपीएस अधिकारी शंकर महादेव बिदरी यांच्या विजयालक्षमी या कन्या आहेत. त्यांचे वडील शंकर बिदरी कर्नाटक राज्याचे पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक होते. त्यांनी आपल्या सेवाकाळात केलेल्या कार्याची दखल देशाला घ्यावी लागली. कारण एखादा भारतीय पोलीस सेवा अधिकारी जेव्हा आपले काम प्रामाणिक आणि कार्यक्षमतेने करतो तेव्हा तो कुठल्याही वाईट गोष्टीला घाबरत नाही. तो आपल्या कर्तव्यात कुसूर करीत नाही. त्यातून जे कार्य उभं राहत ते देशासाठी महत्वपूर्ण ठरतं. १९५२ साली जन्माला आलेला कूज मुनिस्वामी वीरप्पा गौन उर्फ वीरप्पन याने १८ व्या वर्षीच बेकायदा शिकार करणार्‍या टोळीचा सदस्य बनला. चंदन तसेच हस्तीदंतांची तस्करीकरून त्याने पैसा कमवला. तामिळनाडू, कर्नाटक व केरळच्या जंगलातील एकूण ९०० पेक्षा जास्त हत्तीची त्याने हत्या केली होती. त्याने १८४ पोलीस व वन अधिकार्‍यांची हत्या केली होती. अशा क्रूरकर्म्याला ठार मारून आयपीएस अधिकारी शंकर महादेव बिदरी यांनी दाखविलेले धैर्य कौतुकास्पद आहे. अशा धैर्यवान पोलीस अधिकाऱ्याची मुलगी विजयालक्ष्मी बिदरी आता नागपूरच्या विभागीय आयुक्त म्हणून कार्य करीत आहेत.

कुटुंबात आयपीएस-आयएएस परंपरा…

बिदरी यांच्या घरात आयपीएसची परंपरा आहे. विजयालक्ष्मी यांची आई वगळता घरातील सर्व जण आयपीएस-आयएएस आहेत. शंकर बिदरी यांच्या एकाच कुटुंबातून चार आयपीएस-आयएएस झाले आहेत. विजयालक्ष्मी यांचा भाऊ विजयेंद्र बिदरी तिरुनेलवेली येथे पोलीस अधीक्षक आहे. भावाची पत्नी रोहिणी भाजीभाकरे ह्या तमिळनाडूतील सेलम येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची आई उमादेवी व्यवसायाने डॉक्टर आहेत.

आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक भान जपणाऱ्या अधिकारी…

विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना जुलै २०११ मध्ये कोल्हापुरच्या आयुक्त होत्या. नागपूरला विभागीय आयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्या इस्रोच्या यु. आर. राव उपग्रह केंद्राच्या `नियंत्रक’ पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत होत्या. ओला आणि सुका दुष्काळ पडला की शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई शासन देते. पण दुष्काळात शेतामध्ये जाऊन त्वरित प्रत्यक्ष पंचनामे करणे महसूल खात्याला शक्य होत नाही. म्हणून उपग्रहाच्या मदतीने पंचनामे करण्याचे नाविन्यपूर्ण तंत्र विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना यांनी नागपुरात आणले. त्याचा लाभ नागपूरच्या शेतकऱ्यांना झाला. इस्रोच्या यु. आर. राव उपग्रह केंद्राच्या `नियंत्रक’ पदावर कार्य केल्याने विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचे कार्य केले. भविष्यात शासनाने उपग्रहाद्वारे पंचनामे केल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासनाला मदत करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

त्यांनी यापूर्वी राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालक म्हणून काम केले आहे. दरम्यान तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय योजना राबवण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी स्वत: कॉम्युटर सायन्समध्ये पदवीप्राप्त केली आहे. दुर्गम जिल्ह्यांमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरकारी योजना राबवणे शक्य आहे, असे त्यांचे मत असून गडचिरोली, भंडारा यासारख्या जिल्ह्यांतही तंत्रज्ञान पोहचवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ई पीक पाहणी, रोव्हरच्या माध्यमातून भूमापन सुरू आहे. तंत्रज्ञान निर्माण करणेच नाही तर सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम नागपूर विभागात करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना यांनी जादूटोणा व बुवाबाजी विरोधी आघाडी उघडली असून विविध जागृतीचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. प्रामाणिक आणि कार्यक्षमपणे कार्य केल्याने नागपूरच्या विभागीय जिल्ह्यात प्रशासकीय सेवा सर्वसामान्यांसाठी सुखकर ठरत आहे. त्यांच्या वाटचालीस आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

– मोहन सावंत
स्वीय सहाय्यक- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा
उपसंपादक- पाक्षिक ‘स्टार वृत्त’

You cannot copy content of this page