संपादकीय- आमदार कसा असावा व कसा नसावा?

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी मतदारांनी निवडून देणारा आमदार कसा असावा व कसा नसावा? ह्याबाबत काही मुद्दे दिले आहेत. ह्यातील काही मुद्दे मतदार गाळू शकतात किंवा काही मुद्दे घालू शकतात. हा मतदारांचा वैयक्तिक प्रश्न आहे.

१) मतदारांची समस्या जाणणारा असावा; मतदारांना सहजतेने भेट देऊन गाऱ्हाणी ऐकणारा असावा!
२) मतांसाठी घरी पैसे पाठवून मते मागणारा नसावा; म्हणजे निवडून येण्यासाठी मतं विकत घेणारा नसावा!
३) शासकीय तिजोरीतून खर्च करून झालेल्या कामांवर आपले नाव चिकटविणारा नसावा!
४) मतदार संघातील विकासकामांचे कमिशन ठेकेदारांकडून घेणारा नसावा; तर दर्जेदार विकासकामे होण्यासाठी झटणारा असावा!
५) धार्मिक, जातीय, प्रांतिक तेढ निर्माण करून राजकारण करणारा नसावा!
६) मतदार संघात अनधिकृत बांधकामे, अनधिकृत दारू धंदे, जुगार, मटका सुरु असताना त्याकडे दुर्लक्ष करणारा नसावा!
७) मतदार संघातील जमिनी भांडवलदारांना विकण्यासाठी किंवा स्वतःला विकत घेण्यासाठी दवाब आणणारा नसावा!
८) जनतेला त्रासदायक ठरणारे व्यवसाय, उद्योगधंदे, विनाशकारी प्रकल्प आणणारा व भरवस्तीत मोबाईलचा टॉवर उभे करणारा नसावा!
९) आपल्या कार्यकर्त्यांकरवी मतदारांमध्ये दहशत – दादागिरी करणारा नसावा!
१०) सरकारी शाळा, सरकारी रुग्णालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य जनतेला समाधानकारक व्यवस्था निर्माण करणारा असावा!
११) आपली राजकीय भूमिका मतदारांवर लादणारा नसावा!
१२) नैतिकता, नीतिमत्ता जपणारा असावा!
१३) शिवराळ भाषा वापरणारा, दादागिरीने बोलणारा, धमक्या देणारा नसावा!
१४) सुशिक्षित असावा, सुसंस्कृत तर असावाच!
१५) देशाच्या संविधानाला मानणारा असावा!
१६) मतदार संघाबरोबर राज्याच्या विकासासाठी योगदान देणारा असावा!
१७) आर्थिकबाबतीत श्रीमंत असल्यास तशीच आर्थिक श्रीमंती मतदार संघातील प्रत्येक मतदाराकडे कशी येईल? ह्यासाठी कार्य करणारा असावा!
१८) मतदार माझा व मी मतदारांचा अशी भूमिका कृतीतून दाखविणारा असावा!

काहीजण म्हणतील असा आमदार आजच्या राजकारणात कसा सापडेल? हा गंभीर प्रश्न आहेच! तरीही मतदारांनी ह्या मुद्दयांवर जरूर विचार करावा! कारण आपले मत अमूल्य आहे. आपल्या एका मताची ताकद कदाचित मतदाराला वाटणार नाही; पण मतदाराच्या एका- एका मताची ताकद आमदारकीसाठी उभे राहिलेले उमेदवार, राजकीय पक्ष जाणून असतात. म्हणूनच भावनिक, तात्कालिक मुद्दयांपेक्षा शाश्वत मुद्दे देश घडविण्यासाठी आवश्यक ठरतात.

राजकारण्यांना शिव्या घालून किंवा त्यांच्याविरोधात टीकाटिप्पणी करून मजा घेण्यापेक्षा मतदारांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. `जशी प्रजा तसा राजा’ असं म्हटलं जातं! त्याचप्रमाणे `जसे मतदार तसा निवडून येणारा आमदार’ असे म्हटल्यास??? मतदारराजा आता जागा हो!

-नरेंद्र हडकर