माझा सिंधुदुर्ग- कोकणवासियांची मुंबईत येण्याजाण्यासाठीची होणारी लूटमार थांबवा!

२४ दिवसात ३ लाखापेक्षा जास्त मजूर मुंबईत स्पेशल ट्रेनने आले; मग कोकणवासियांवर अन्याय का?

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्र शासनाने सावर्जनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आणि अचानकपणे २४ मार्च पासून लॉकडाऊन जाहीर केले.

मुंबईत राहणारे कोकणवासी विशेषतः सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यातील चाकरमान्यांना गावी परतण्यास संधीच मिळाली नाही. मुलांच्या परीक्षा होणार की नाहीत? ह्या संदर्भात शासन ठोस भूमिका घेत नव्हते. त्यामुळे चाकरमानी मुंबईतच अडकला.

खाजगी वाहनं घेऊन लाखो लोक कोकणात गेले. काहीजण पायी चालत गेले. त्यांचे अतोनात हाल झाले. अनेकांच्या ते जीवावर बेतले. प्रत्येकी पाच – दहा हजार रुपये खर्च करून सिंधुदुर्ग-रत्नागिरीवासियांनी जावे लागले. ईपाससाठी अनेक गोष्टींची पूर्तता करताना दमछाक होत आहे. कित्येकांनी कर्ज काढून, दागदागिने विकून, जमा पुंजी संपवून गावाला जाण्यासाठी रक्कम वापरली. कित्येकजण नाविलाजास्तव मुंबईतच राहिले. जो चाकरमानी होळीसाठी गावी गेला तो गावीच अडकला आणि ज्यांना गावी जायचे होते ते मुंबईत अडकले. शासनाने प्रवासाची कोणतीही सोय न केल्याने लाखो चाकरमान्यांना आपल्या गावी जाता आले नाही. गरीब कष्टकरी असणारा हा चाकरमानी नोकरीसाठी वर्षानुवर्षे मुंबईत राहतो; पण त्याने आपल्या गावाशी नाळ कधी तोडली नाही. आज हा चाकरमानी हतबल आहे. कोकणातील राजकारणी नेत्यांनी कोकणी माणसांना आधार दिला नाही; हे वास्तव आहे.

गणपतीसाठी कमी पैशात चाकरमान्यांना गावी घेऊन जाणारे, निवडणुकीसाठी येण्याची-जाण्याची सोय करून नेणारे राजकारणी मात्र आपल्या ओळखीच्या लोकांना हेराफेरी करून गावी घेऊन जात होते. पण सर्वसामान्य कोकणी माणूस आजही त्रस्त आहे. शासनाने लक्ष घालून कोकणातील प्रवासी वाहतुकीचा प्रश्न सोडविणे अपेक्षित असताना त्यांनी सुद्धा कोणतीही कार्यवाही केली नाही. आजही मुंबईवरून गावी जाण्यासाठी किंवा गावावरून मुंबईला जाण्यासाठी प्रत्येकी चार-पाच हजार रुपये मागितले जात आहेत. दोन- तीन महिने नोकरी धंद्याला नसणारा चाकरमानी आपल्या चार- पाच माणसांच्या कुटुंबाला घेऊन गावी कसा जाणार? कोकणातील अनेक मंडळांनी यासंदर्भात शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. पण सगळं काही फुकट गेलं. अक्षरशः कोकणवासीयांची लूटमार सुरु आहे.

आता १२ ऑगस्टपर्यंत रेल्वे बंद राहणार आहे. एस. टी. नाही, रेल्वे नाही. मग सर्वसामान्य जनतेने प्रवास करायचा कसा? २२ ऑगस्ट रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. गणपतीला गावी जावेच लागणार आहे. त्यांच्या प्रवासाची सोय कोण करणार?

चाकरमान्यांना गावी जाऊन १४ दिवसांचे क्वारंटाईन व्हावे लागणार म्हणजे ७ ऑगस्टपर्यंत त्यांना गावी जावेच लागेल. परंतु १२ ऑगस्टपर्यंत ट्रेन बंद ठेवण्याचा रेल्वे बोर्डाचा निर्णय कोकणवासियांना आर्थिक संकटात लोटणारा आहे. मुंबई, विरार, ठाणे, कल्याण, नवीमुंबई, पनवेल अशा शहरांमधून लॉकडाउनच्या काळात सुमारे लाखो मजूर परराज्यात गेले. हेच मजूर आता महाराष्ट्रातील ह्या शहरांमध्ये परत येऊ लागले आहेत. १ जून ते २४ जून २०२० ह्या काळात ३ लाख २१ हजार ९५० मजूर मुंबईत स्पेशल ट्रेनने आलेत. मग कोकणवासियांवर अन्याय का? हा सवाल प्रत्येक राजकीय पक्षाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर ठेऊन, काळजी घेऊन कोणतेही अतिरिक्त भाडे न आकारात कोकणात जाण्यायेण्यासाठी त्वरित ट्रेन आणि एसटी सुरु करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे रत्नागिरी सिंधुदुर्गवासियांचा प्रवास सुखकर करता येऊ शकतो. नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत येणे आणि जाणे कोकणवासियांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. अन्यथा ते आणखी मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकतात. आता मुंबईत नोकऱ्या उपलब्ध असूनही प्रवासाच्या साधनांच्या अभावी कोकणवासियांना जाता येत नाही. ह्याची दखल शासनाने घ्यावी!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणवासियांची मागणी मान्य केली पाहिजे, तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पंतप्रधानांशी बोलून कोकणासाठी नियमित दरात रेल्वे सुरू करून घेतली पाहिजे. परराज्यातून मजूर देशाच्या आर्थिक राजधानीत अर्थात मुंबईत सहजपणे येऊ शकतात; तर ह्याच महाराष्ट्रातील जनतेला मुंबईत येण्यासाठी आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते; ही दुर्दैवाची गोष्ट नाही का?

– नरेंद्र हडकर