राजकीय नेते अर्धसत्य सांगून एकमेकांचा फाडताहेत बुरखा!

राजकारण करताना राजकीय पक्ष नेहमीच जनतेसमोर अर्धसत्य सांगत असतात. पूर्ण सत्य सांगून ते राजकीय पटावर सरस ठरत नाहीत. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी राजकीय नेत्यांना अर्धसत्य सांगण्याचं `तत्व’ जपावच लागतं; हे सत्य जनतेने जाणून घ्यायलाच पाहिजे. आपण लोकशाही स्वीकारली आहे. ह्या लोकशाहीत मतदान करणारा मतदार ह्याबाबतीत नक्कीच चिकित्सक असायला हवा. त्याने राजकीय नेत्यांचा कारभार कोणत्या हेतूपोटी सुरु आहे? ह्याचा क्रमवार अभ्यास करणे गरजेचे असते. ही सजगता ठेवली तर मतदारांसमोर राजकीय नेते जे काही बोलतात, जी काही कृती करतात, जे काही निर्णय घेतात; त्याची पोलखोल सहजपणे करता येते.

महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी गेली चाळीस वर्षे सातत्याने आंदोलनं सुरु आहेत. गेल्या दोन महिन्यात मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला मिळालेला पाठींबा अभूतपूर्व होता. त्यामुळे राज्याचे राजकीय-सामाजिक वातावरण ढवळून निघाले. शेवटी आंतरवली सराटी गावात जाऊन दुसऱ्यांना शासनाला मनोज जरांगे- पाटील यांचं समाधान करावं लागलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसऱ्याच्या सभेत जाहीररित्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार तेही इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता!

मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी सरकारतर्फे मंत्री, निवृत्त न्यायाधीश गेले आणि काही गोष्टी सामंजस्याने ठरविण्यात आल्या; परंतु सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जी भूमिका मांडली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या निवेदनाला छेद देणारी आहे. ह्याचा अर्थ राज्य सरकारमध्ये एकवाक्यता नाही हे स्पष्ट झाले. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या सरकारवरच प्रश्न चिन्ह उभा केलाय. गेले दोन महिने मात्र त्यांनी आपली ही भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. मात्र एका बाजूला सरकार मराठा समाजाला झुकते माप देत असल्याचा संदेश राज्यात गेला. ओबीसीमध्ये मोडणाऱ्या समाजात त्यामुळे सरकारबाबत नाराजी निर्माण होईल; ह्या भीतीपोटी मंत्री छगन भुजबळ यांनी आपली आज भूमिका मंडळी असावी. शेवटी अर्धसत्य सांगूनच राजकीय नेत्यांना आपला राजकीय रथ हाकवायचा असतो. हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. मात्र नाविलाजास्तव का असेना राजकीय नेत्यांना अर्ध-सत्य तरी जनतेसमोर मांडावं लागतं; त्यातून राजकीय नेतेच एकमेकाला उघडे – नागडे करीत असतात. एकमेकांचा बुरखा फाडतात! त्यांचे संदर्भ जोडत जनतेने उरलेलं अर्धसत्य शोधून काढायला पाहिजे आणि राजकीय नेत्यांचा खरा चेहरा समजून घेतला पाहिजे.

-नरेंद्र हडकर