सुषमा स्वराज- मातेची ममता आदिमाते चरणी विलीन

राजकारणात असणारी व्यक्ती फक्त स्वत:च्याच भल्याचा विचार करून त्यानुसार काम करत असते. त्यामुळे निष्ठा, नितीमुल्य, प्रामाणिकपणा हे गुण आजच्या राजकारणात मागे पडताना दिसतात. अभ्यासू वृत्ती, दुरदृष्टीपणा असल्यास ह्या गुणांच्या सहाय्याने आपले राजकीय वजन वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे नेते कमी नाहीत. अशा राजकारणाच्या वातावरणात सुषमा स्वराज यांच्यासारखे व्यक्तीमत्व आदर्शवत ठरते.

कालच संध्याकाळी अतिशय दु:खद घटना घडली. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झालं. भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ आक्रमक नेत्या म्हणून त्यांनी आपली कारकीर्द यशस्वी केली. त्यांच्या स्मृतींना जपताना अनेक गुण प्रकर्षाने प्रकट होताना दिसतात. त्यातील महत्वाचा गुण म्हणजे माणूसकी. माणूसकी जपणाऱ्या त्या नेत्या होत्या. राजकारणाच्या पलिकडे जाऊन माणूसकी जपणारी सुषमा स्वराज यांच्यासारखी व्यक्ती जेव्हा हे जग सोडून जाते; तेव्हा निर्माण होणारी पोकळी सातत्याने जाणवत राहते.

गीता नावाची आठ वर्षाची मुकबधीर मुलगी आपल्या पालकांसोबत समझौता एक्स्प्रेसमधून लाहोरला गेल्यानंतर हरवते. त्या मुलीला २०१५ साली परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज यांनी भारतात आणले. त्या दरम्यान गीता वीस वर्षाची झाली होती. तिच्या पालकांचा शोध घेण्यात आला. पालकत्वाचा दावा दहा कुटुंबांनी केला; पण चौकशी अंती तो खोटा ठरला होता. त्यामुळे सुषमा स्वराज्य यांनी मातेसमान गीताची काळजी घेतली. गीताचा उल्लेख ‘हिन्दुस्थानाची कन्या’ असा करून आपल्या मातृत्वाचे विशाल रूप सुषमा स्वराज यांनी दाखविले होते. गीता ही मुलगी मुकबधीर असून सध्या ती इंदूर येथील मुकबधीर वसतीगृहात राहते. त्या वसतीगृहाच्या प्रमुखांनी जेव्हा ही दु:खद बातमी गीताला सांगितली; तेव्हा आई गेल्याचं दु:ख तिने व्यक्त केलं. सुषमा स्वराज यांच्या मायेच्या पदराखाली राहणाऱ्या एका मुकबधीर मुलीच्या हावभावातून व्यक्त होणारा भाव सुषमा स्वराज यांच्या मातृत्वाला खऱ्या अर्थाने सलाम करतो. गीताच्या अश्रूंनी सुषमा स्वराज यांच्या मातृत्वाचा भाव किती माणूसकी जपणारा होता; हे सहज समजते.

हिंदूहृदयसम्राट यांना मुंबईला भेटण्यासाठी सुषमा स्वराज आल्या होत्या. तेव्हा बाळासाहेबांनी सुषमा स्वराज यांना पंतप्रधान पदासाठी जाहिररित्या पाठींबा देऊन सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट केला होता. परंतु २००७ नंतर देशाच्या राजकारणात आणि भाजपामध्ये अशा काही घडामोडी घडल्या की, भाजपाच्या जेष्ठ नेत्यांना एक एक पाऊल मागे जावे लागले. त्यामध्ये सुषमा स्वराज होत्या. तरीही त्यांना २०१४ साली मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये परराष्ट्र मंत्री हे महत्वाचं खातं मिळालं. त्यानंतर स्वत:चे आजारपण सांभाळत भारताचे जगभरातील स्थान समर्थ करण्यात सुषमा स्वराज यांचे कार्य खूप मोठे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संपूर्ण जगभरात डंका वाजविला गेला; पण त्यामागे परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमा स्वराज्य यांनी आखलेली आणि प्रत्यक्षात आणलेली परराष्ट्र नीती भारताला समर्थ करणारी होती; हे विसरून चालणार नाही.

समाजमाध्यमांवरून देश-विदेशातून मागितलेली मदत भारतीयांना देण्यासाठी त्या प्राधान्य देत. व्यस्त कार्यातही समस्याग्रस्त असणाऱ्यांना मदत करण्याची त्यांची कृती मातृत्वाची भावना जोपासणारी होती. राजकारणामध्ये मतदानाचा हिशोब करूनच नागरिकांना मदतीचा हात पुढे केला जातो; परंतु हा हिशोब सुषमा स्वराज यांनी केला नाही. म्हणूनच त्या महान होत्या.

त्यांच्याबद्दल खूप काही सांगता येईल; परंतु त्यांच्यातील मातेची ममता प्रकर्षाने लक्षात राहते. सुषमा स्वराज यांच्या रूपातील मातेची ममता आदिमातेच्या चरणी विलीन झाली. सुषमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

You cannot copy content of this page