मनोज जरांगे-पाटील यांच्या मागे मराठा समाजाची ताकद! नेत्यांचा पोटात गोळा!

सर्वसामान्य मराठा समाजातील तरुण मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे मराठा समाजाचे नेतृत्व एवढ्या सहजपणे जाईल; असे वर्षानुवर्षे कसलेल्या आणि राजकारणात प्रस्थापित मराठा नेत्यांनाही स्वप्नातही वाटले नव्हते. आजही मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे मराठा समाजाचे नेतृत्व गेले आहे; हे सुद्धा त्यांचे मन मानायला तयार होत नाही. कारण त्यांच्या अजूनही लक्षात येत नाही की, मनोज जरांगे-पाटील मराठा समाजाचे नेते झालेच कसे? आता तर त्यांच्या पोटात गोळा आलाय. मराठा समाजातील आपले डळमळीत झाल्याने त्यांनी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेली मागणी कशी चुकीची आहे; हे आक्रमपणे सांगू लागले. परंतु राज्यातील मराठा समाज आता जागृत झाला असून आपल्या गावात राजकीय नेत्यांना येण्यास बंदी घातली आहे. ५१२ गावांमध्ये अशाप्रकारे आव्हान निर्माण करणारे फलक झळकले असून आरक्षण मिळाल्याशिवाय मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील आता गप्प बसतील असे वाटत नाही.

राज्यकर्ते मराठा आरक्षण मुद्द्यावरती गोंधळलेल्या आणि घाबरलेल्या स्थितीत असल्याचे जाणवते आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा फायदा द्या! अशी ठाम मागणी मनोज जरांगे-पाटील यांची आहे. मराठा समाजातील अनेकांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊन आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे. ह्या मुद्यावरच मनोज जरांगे-पाटील आपली मागणी राज्यकर्त्यांसमोर मांडत असताना राज्यकर्ते आपली ठोस भूमिका मांडू शकत नाही. `ज्यांच्याकडे कुणबी असल्याचा दस्तऐवज आहे त्यांनी ते आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात अन्य मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देता येणार नाही. मराठा समाजासाठी आरक्षण मिळवून देऊच!’ अशी भूमिका कुठल्याही राजकीय पक्षाचे राज्यकर्ते घेत नाहीत. म्हणूनच सरकार म्हणून राज्यकर्ते आजतरी अडचणीत सापडलेले दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा संमत होत नाही; तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी राज्य आणि केंद्राला खूपच कसरत करावी लागत आहे. मात्र त्या कसरतीतून सर्वांच्या हाती धुपाटणे आले. राजकीय राज्यकर्त्यांनी दिलेली आश्वासनं फोल ठरली. मात्र केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत जर घटनेत तरतूद केली तर ते शक्य आहे. पण देशपातळीवर अनेक समाज अशा आरक्षणासाठी कित्येक वर्षे झगडत आहे. त्यामुळे केंद्र सरकार मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेत नाही. मग महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळणार कसे? म्हणूनच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत; असे मनोज जरांगे – पाटील सांगत आहेत आणि ते योग्य आहे.

आज राज्यातील मराठा समाज मनोज जरांगे – पाटील यांच्या पाठीशी समर्थपणे उभा राहिला आहे. कारण `वर्षानुवर्षे आश्वासनापलीकडे मराठा समाजाला काहीच मिळाले नाही’ ही भावना मराठा समाजाची आहे. मराठा समाजाचे असल्याने अनेक नेत्यांना राज्यात राजकीय लाभ झालाय. त्या नेत्यांच्या मुलांना आरक्षण मिळो किंवा न मिळो; त्यांना काहीच फरक पडत नाही. पण पिढ्यानपिढ्या काबाडकष्ट करीत जगणारा समाज जेव्हा आरक्षणामुळे आपल्या मुलांची प्रगती रोखलेली पाहतो तेव्हा मात्र त्याला आरक्षणाची उपयुक्तता समजून येते. आज मराठा समाजातील अनेक युवक-युवती आरक्षणापासून वंचित राहिल्याने त्यांची प्रगती रोखली आहे. हे वास्तवता राजकारणात असलेल्या मराठा नेत्यांनी जाणून घेतली नाही. म्हणूनच आज मनोज जरांगे – पाटील नेतृत्वाच्या बाबतीत सर्वांच्या पुढे गेले आहेत.

विदर्भ असो वा मराठवाडा, खानदेश असो वा पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण असो; आजतरी मनोज जरांगे – पाटील यांचे नेतृत्व मराठा समाजाने स्वीकारले आहे. कोकणातील मराठा समाजातील अनेक जेष्ठ अनुभवी नेते मनोज जरांगे – पाटील यांची लवकरच भेट घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत.

-मोहन सावंत