‘कोरोना मुक्त सिंधुदुर्ग’ वास्तव साकारण्यासाठी…

 

‘कोरोना मुक्त सिंधुदुर्ग’ करण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित!

“ सिंधुदुर्गात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्वच पातळीवर उपाययोजना सुरू आहेत; परंतु अमुक अमुक उपाययोजना केल्यावर कोरोनाचा प्रसार कमी होऊन सिंधुदुर्ग कोरोना मुक्त होऊ शकतो; असं आपल्याला वाटतं. तुमच्या मनात नेमक्या काय उपाययोजना आहेत? त्या आम्हाला सांगा. सर्वांनी सुचविलेल्या उपाययोजनांचा एकत्रितरित्या विचार करून सिंधुदुर्ग कोरोना मुक्त करण्यासाठी ठोस मुद्दे तयार करून ते केंद्र व राज्य आरोग्यमंत्रांकडे पाठवू आणि त्याचा पाठपुरावा करू!

आपल्या सूचना सिंधुदुर्गच्या भविष्यासाठी अनमोल आहेत. कृपया आताच्या आता आपल्या उपाययोजना आम्हाला कळवा! तुमचे योगदान खूप महत्वाचे आहे. उद्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत आमच्याकडे तुमच्या सूचना, उपाययोजना, आकडेवारी, इतर माहिती पाठवा! योग्य, उचित व महत्वाच्या सूचना व उपाययोजना इच्छा असल्यास नावासह पाक्षिक ‘स्टार वृत्त’मध्ये प्रसिद्ध करू!”

असे आवाहन आम्ही केले होते आणि अनेक विद्वानांनीमी, अभ्यासकांनी आपली मते आमच्याकडे नोंदविली. त्यानुसार निवेदन तयार करून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. त्यातील काही निवडक सूचना आम्ही इथे प्रसिद्ध करीत आहोत!

– संपादक

 

कोरोनामुक्त सिंधुदुर्गसाठी उपाययोजना…

१) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व सीमांवर कडक पहारा ठेऊन उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये.

२) गर्दीच्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित मास्क वापरावेत; बाजारात-दुकानात उचित शारीरिक अंतर राखावे.

३) बँका, सरकारी कार्यालयात येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांना मास्क व फेसशील्ड शिवाय प्रवेश देऊ नये. काम थोडक्यात व लवकर करावे अन्यथा त्यांना ती कागदपत्रे ऑनलाइन पाठवावीत; जेणेकरून तो इसम परत घराबाहेर पडणार नाही.

४) प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून अगदी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. शक्य असणारी कामे ऑनलाईन पद्धतीने करावीत.

५) जीवनावश्यक साहित्य सुद्धा होम डिलिव्हरी पुरविण्यात यावे; जेणेकरून कोणी घरावर पडणार नाही.

६) साधा सर्दी खोकला बारीकसा ताप असल्यास RT-PCR टेस्ट करून घ्यावी व टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ल्यानुसार वागावे.

७) कोविड पॉझिटिव्ह असूनही ज्यांना लक्षणे दिसत नाहीत त्यांनी जबाबदारीने वागून घरात क्वारंटाईनचे सर्व नियम पाळावेत.

८) कोरोना प्रतिबंधित लस जास्तीत जास्त लोकांना व लवकरात लवकर देण्यात यावी. लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होत असल्यास नवीन केंद्रे स्थापन करावीत.

९) आपण स्वतः जबाबदारीने वागलो तर पोलीस, रुग्णालय, डॉक्टर, नर्सेस यांच्यावरचा ताण कमी होईल आणि कोरोनाच्या केसेस कमी होतील.

एक दिवस सिंधुदुर्ग कोरोना मुक्त होईल.

डॉ. सूर्यकांत तायशेटे -एमडी, (मेडिसिन)
आबु तायशेटे मेमोरियल हॉस्पिटल- कणकवली

————————————–

आरोग्य खाते सक्षम करा!

१) आरोग्य खात्यामधील सर्व पदे तातडीने भरण्यात यावीत.
२) खाजगी दवाखान्यातील व रुग्णालयांतील सर्व डॉक्टरांचे सहकार्य घ्यावे.
३) सर्व शासकीय निधी आरोग्य विभागात वर्ग करून मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात.
४) सर्व शासकीय कर्मचारी यांच्या सेवा कोरोना मुक्तीकरिता वर्ग कराव्यात.

-गोपाळ जाधव

———————–

सिंधुदुर्गमध्ये कोरोना कमी होण्याकरिता…

१) ट्रेन ,लक्झरी आणि इतर गाड्यांनी दुसऱ्या जिल्ह्यांमधून येणाऱ्या लोकांची टेस्ट करावी किंवा त्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवावे. विलगीकरणात चांगल्या सोयीसुविधा पुरवाव्यात.

२) प्रत्येक गावामधील प्रत्येक वाडीमध्ये कोरोना कमिटी नेमावी आणि गावात लक्षण असणाऱ्यांना गावातच चांगल्या सुविधा असलेल्या विलगिकरण कक्षामध्ये ठेवावे.

३) मुंबई, ठाणे, पुणे सारख्या शहरामध्ये गेले एक वर्ष सर्व डॉक्टरांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचा दांडगा अनुभव आहे. त्या तुलनेत सिंधुदुर्गमधील शासनाच्या आरोग्य यंत्रणेला अनुभव नाही; म्हणूनच जिल्ह्यात रुग्ण आता वाढले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गमधील प्रत्येक गावातील सरकारी आणि खाजगी डॉक्टरांना प्रशिक्षित करायला पाहिजे. पूरक व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स इत्यादी पोषक आणि अँटिबायोटिक औषधे वेळेवर दिल्यास रुग्ण लवकर बारा होऊ शकतो.

४) लोकांना वाफ घेण्याकरिता विजेवर चालणारी वाफेची साधने प्रत्येक घराघरात पुरवावी. ती होलसेलमध्ये खूप स्वस्तात मिळतात. जिथे प्रादुर्भाव जास्त आहे, तिथे पुरविणे आवश्यक आहे. (होलसेलची किंमत लोकांना परवडू शकते किंवा काही संस्था ते विनामूल्य देवू शकतात.)

५) शक्य होईल तिथे जागोजागी सॅनिटायझर ऐवजी हात धुण्याचा लिक्वीड साबण आणि पाणी ठेवावे आणि लोकांनी घरात सुद्धा वापरावे, (स्वस्तातले लिक्वीड हँडवॉश लिटरच्या हिशोबाने मिळतात.)

६) तालुका निहाय वॉर रूम तयार करणे, त्यामध्ये कॉल घेण्याकरिता इतर लोकांसोबत काही डॉक्टर उपलब्ध करणे, जेणेकरून रुग्णाची स्थिती आणि प्राथमिक उपचार करता येतील. वॉररूमचा संपर्क क्रमांक तालुक्यामध्ये गावागावात पोहोचविणे.

७) टेस्टचे प्रमाण वाढविणे.

८) जोवर काही लक्षणं नाही तोपर्यंत लोक निर्धास्त असतात; पण थोडीतरी लक्षण जाणवायला लागली की लोकं प्रचंड घाबरतात आणि स्वतःला Covid च्या स्वाधीन करतात. `आता मी मरणार’ ही भीती तयार होते. त्याने लोक दगावत आहेत. रुग्णाच्या मनातली भीती कमी करण्याकरित उपाय करणे आवश्यक आहे. त्यासाठी कौन्सलिंग करणे महत्वाचे असून त्यांना धीर द्यायला पाहिजे.

अजून बऱ्याच छोट्या आणि सोप्या गोष्टी आपण करू शकतो, त्या मी लिहून पाठवितो.

महेंद्र गांवकर- 9167699937
mahendragaonkar21@gmail.com
गांव – पुरळ देवगड, राहणार – गोरेगांव मुंबई

—————————————-

कोरोनाबाबत भीतीदायक वातावरण निर्मिती नको…

आपण अतिशय महत्वाच्या विषयावर मते जाणून घेत आहेत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!

करोना आहे ह्याबद्दल दुमत नाही; पण जे अवास्तव भीती पसरवली जात आहे किंबहुना त्यावर उपाय करणे बाजूला राहते आणि लोकांची आत्मशक्ती कमकुवत होईल; अशी वातावरण निर्मिती केली जाते; ही खूप खेदजनक आहे.

कोरोना प्रतिबंधित लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी कशी होईल? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फक्त टेस्ट करून आकडेवारी वाढविणे हा पर्याय नाही. हे माझे आतापर्यंतच्या अनुभवातून आलेले मत आहे.

-बाळा मोरये (नांदगाव)

—————————-

कोरोना प्रतिबंधित लसीकरण महत्वाचे…

लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली गेली पाहिजे. पोलिओचा कार्यक्रम जसा राबवला जातो त्याप्रमाणे ही मोहीम राबविली गेली पाहिजे. प्रत्येकाला लस दिली जाईल तेव्हाच हे संक्रमण कमी होईल. मोठ्या प्रमाणात बाधीत क्षेत्रात प्रथम लस उपलब्ध होणं आवश्यक आहे. लॉकडाउन करून संक्रमण कमी झालेलं नाही. प्रत्येकाला लस हाच एकमेव उपाय आहे; असं माझं मत आहे.

-राजेंद्र वर्णे ( शो मॅन टेलर्स अॅण्ड सिलेक्शन- कणकवली)

——————————

गावपातळीवर कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना महत्वाच्या…

आम्ही ग्रामस्थ, सरपंच विनोद सुके आणि कोविड कमिटी यांनी सर्वांना विश्वसात घेऊन रामेश्वर गाव बंद केला. काहींनी विरोध केला पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो. संपूर्ण २५ ते ३० जणांची टीम घरोघरी गेली. सर्वांनी रॅपिड कोविड तपासणी करावी; असे आवाहन केलं. सर्वप्रथम स्थानिक डॉक्टरांकडून आजारी रुग्णांची यादी घेतली. ज्या वाडीत जास्त मयत झाले होते, तिथे सर्वप्रथम रॅपिड चाचणी घेतली. त्यानंतर जास्त आजारी पेशंट त्या वाडीत तपासणी केली.

आमच्या वाडीतील डॉ. राजन केळकर यांनी तसेच स्थानिक आरोग्य विभागाने आम्हाला पूर्ण सहकार्य केले. प्रत्येक वाडीतून रॅपिड चाचणीतून जे positive रुग्ण मिळाले त्यांचे विलगिकरण केले. त्यांना मानसिक आधार दिला. त्यांची दररोज आशामार्फत ऑक्सिजन आणि तापमान तपासणी चालू आहे. त्यांना नियमित लागणारे सॅनिटायझर, साबण या वस्तू पुरविल्या. ज्यांची पूर्ण कुटुंब विलगिकरण कक्षात आहेत त्यांना जेवण बनवून खायची मुभा दिली. सर्व रुग्णांची आम्ही सर्व दिवसभरात ३ ते ४ वेळा जाऊन विचारपूस करतो. त्यांना गावातील स्वयंसेवक, आशा आणि डॉक्टर यांचे मोबाइल नंबर देऊन ठेवले आहेत; जेणेकरून ते स्वतः त्यांच्याशी संपर्क करतील. गावात संस्थात्मक विलगीकरण केंद्रे उभारली.

सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना एकटे पाडलेले नाही. ग्रामपंचायतीमधून यादी काढून जास्तीत जास्त जणांची रॅपिड तपासणी करणे आणि त्यांचे विलगिकरण शाळा किंवा इतर ठिकाणी करणे; हा सर्वात योग्य मार्ग आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे घरात विलगीकरण करू नये.

-सुनील घारकर

———————- 

‘कोरोना मुक्त सिंधुदुर्ग’साठी आपल्या काही सूचना असल्यास नक्कीच पाठवा. त्या आम्ही नक्कीच प्रसिद्ध करू आणि महत्वाचे मुद्दे शासनाला कळवू!

– संपादक