एकजुटीने असलदे गावावरील संकटाचा राक्षस मारा!

असलदे गावात राहणाऱ्या, असलदे गावात ज्यांची घरी आहेत-जमिनी आहेत, असलदे गावाशी ज्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आहे; अशा सर्वांना सावध करण्यासाठी मी आज संवाद साधणार आहे!

माझ्या अनुभवातून आणि अभ्यासातून मी प्रामाणिकपणे आपल्यासमोर काही मुद्दे मांडणार आहे. मी गेली ३२ वर्षे पत्रकार म्हणून रोखठोकपणे लिहितोय! ते माझे ‘व्रत’ आहे असे मी मनापासून मानतो! पत्रकारिता हा व्यवसाय-धंदा किंवा नोकरी असू शकत नाही तर ते एक सच्चेपणाने सामाजिक बांधिलकी स्वीकारून केलेले अग्निदिव्य असते. त्यातून वैयक्तिक जीवनात अनेक समस्या उद्भवतात. त्याच्याशी दोन हात करावेच लागतात. आजपर्यंत खरीखुरी पत्रकारिता केली म्हणून त्या समस्यांशी लढण्याचे बळ मला त्या परमात्म्याने दिले; हे मी मानतो! म्हणून आज पुन्हा कळकळीने मी तुमच्यासमोर ह्या लेखाच्या माध्यमातून येत आहे. त्यावर तुम्ही तुमचे मत मांडू शकता. जरी ते विरोधी असले तरी त्याचे मी स्वागतच करीन!

असलदे गाव माझी मातृभूमी-कर्मभूमी आहे. माझं गावावर मनापासून प्रेम आहे. त्यामुळे यापूर्वी गावात घडलेल्या चुकीच्या गोष्टींना मी प्रखरपणे विरोध केला आणि यापुढेही विरोध करणार आहे! मात्र सर्वांची साथ मिळाली तर चुकीच्या गोष्टी घडणारच नाहीत म्हणून सर्वांनी विचार करावा आणि आपली भूमिका ठरवावी! मी अजूनही कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही किंवा समर्थक नाही! मी एक सच्चा पत्रकार आहे; ह्याचा मला अभिमान आहे!

एवढी मोठी प्रस्तावना देण्याचे कारण की, हा लेख लिहिण्यामागील माझी भूमिका स्पष्ट व्हावी! आता मुख्य विषयाकडे येऊ…

देवगड-निपाणी या रस्त्याचे रुंदीकरणासह सुधारणा आणि नूतनीकरण होणार आहे. देवगड पासून निपाणीच्या बाजूने ६५.९८ किमी रस्त्यासाठी ३६३.४० कोटी रुपये इतक्या मोठ्या रकमेची निविदा मंजूर झालेली आहे. देवगड-कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी देवगड निपाणी रस्त्यासाठी जो निधी मंजूर करून घेतला त्याबद्दलचे त्यांचे मनःपूर्वक आभार! कार्यसम्राट आमदार म्हणून नितेश राणे यांनी मतदारसंघात जे काम केले त्यास तोड नाही म्हणून इथल्या मतदारांनी नितेश राणे यांना तिसऱ्यांदा निवडून आणले आणि आता ते कॅबिनेट मंत्री झाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

आता असलदे गावासंदर्भात घडलेल्या घटनांकडे येऊया!

एवढ्या मोठ्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खडी लागणार आहे. यासाठी असलदे गावात क्रेशर उभारणीचा प्लॅन पुन्हा एकदा तयार केला जात आहे! असलदे गावाने १९ डिसेंबर २०१७ रोजी ग्रामसभेमध्ये प्रखर विरोध करून क्रेशरला परवानगी नाकारली आणि क्रेशर आणण्यासाठी एजंटगिरी करणाऱ्या लोकांना चपराक दिली. २०१७ पूर्वीही ‘गावात क्रेशर असता कामा नये’ असा ग्रामसभेत ठराव मंजूर झाला होता. तो लपवून ठेवून क्रेशर आणण्यासाठी अर्थपूर्ण तडजोड करून परवानगी देण्याचा घाट तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी आखला होता; तो १९ डिसेंबर २०१७ रोजी असलदे ग्रामस्थांनी मोडून टाकला.
(ह्या संदर्भात मी त्यावेळी दोन लेख लिहिले होते ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!)
https://asaldemazagaon.blogspot.com/2017/11/blog-post.html?m=1
https://asaldemazagaon.blogspot.com/2017/12/blog-post.html?m=1

असे असताना २०२४ नोव्हेंबर पासून असलदे गावात क्रेशर आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याची कल्पना येताच मी सदरचा मुद्दा २७ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या ग्रामसभेत उपस्थित केला आणि पुन्हा एकदा क्रेशर गावात आणू नये असा ग्रामसभेने ठराव मंजूर केला!

माझ्या माहितीप्रमाणे क्रेशर सुरू करण्यासाठी गावातील काही लोकांनी असलदे ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच वाडीला, गावाला कोणतीही कल्पना न देता भाड्याने जमिनी दिल्या! ती अतिशय दुर्दैवाची व गंभीर गोष्ट आहे!

जमीन आपल्या मालकीची असली तरी त्या जमिनीत प्रदूषणकारी प्रकल्प येता कामा नये; ही भूमिका प्रत्येकाची असायला हवी! आपल्या मालकीच्या जमिनीवर गावातील लोकांना त्रासदायक ठरतील अशी कामे करणे चूकच नाही तर गावाला संकटात टाकण्यासारखे आहे! हे जमीन मालकांनी समजून घेतले पाहिजे आणि जर समजत नसतील तर ते गावाने एकजूट दाखवून गावाला संकटात आणणारे प्रकल्प गावात येऊ नये म्हणून पुढाकार घेतला पाहिजे; असे माझे मत आहे!

देवगड-निपाणी रस्त्यावरच देवगडच्या दिशेने जाताना असलदे गावातील पिरापासून पेट्रोल पंपापर्यंत काही जमीन मालकांनी ठेकेदाराला चार वर्षाच्या कालावधीसाठी नाममात्र भाड्याने जमिनी दिल्या. जमीन मालकांना सांगितले गेले की, रस्त्याचे काम करणाऱ्या कामगारांसाठी झोपड्या बांधायच्या आहेत. त्यासाठी आम्ही जागा वापरणार आहोत. आणि प्रत्यक्ष करार केला तो व्यावसायिक वापरासाठी जागा भाड्याने घेण्याबाबतचा! यातही जमीन मालकांची फसवणूक झाली, असे प्रथम दर्शनी दिसते! परंतु गावांमध्ये व्यावसायिक वापरासाठी जेव्हा जागा भाड्याने घेतली जाते तेव्हा त्याबाबत ग्रामपंचायतीला कळविणे गरजेचे होते. परंतु वरील जागेबाबत जमीन भाड्याने घेणारा ठेकेदार आणि गावातील मध्यस्थ यांनी ग्रामपंचायतीला कळविले नाही! तसेच जमीन मालकांचीही फसवणूक केली. हे गावाच्या हिताच्या दृष्टीने चुकीचे आहे!

कारण वरील जागेवर नेमकं काय होणार आणि नेमके काय दुष्परिणाम होणार? ते आता पाहू…
१) वरील जमीन कामगारांना झोपड्या बांधण्यासाठी भाड्याने घेत आहोत; असे जमीन मालकांना सांगितले गेले.
२) प्रत्यक्षात करारामध्ये आर. एम. सी. प्लान्ट उभारणीसाठी ही जागा भाड्याने घेण्यात आली आहे.
३) रेडी टू मिक्सिंग काँक्रीट (ready to mixing concrete) म्हणजेच आर. एम. सी. प्लांट म्हणजेच इथे रस्त्यासाठी लागणारे सिमेंट काँक्रीट मोठ्या यंत्राद्वारे तयार केले जाणार आहे. त्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणात वाळू, खडी, सिमेंट, विविध केमिकल्स आणि खडीची पावडर आणावी लागेल.
४) त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होणार आहे. ते पाणी बोरवेल द्वारे घेण्यात येईल.
५) भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा तिथे होणार आहे.
६) धुळीचे लोट तिथून तयार होतील. त्यामुळे हवेचे प्रदूषण होईल.
७) मोठ्या मशिनरी सतत सुरू राहिल्याने आवाजाचे प्रदूषण होणार आहे.
८) जे सिमेंट काँक्रीट योग्य प्रमाणात तयार होणार नाही ते तिथेच बाजूला टाकण्यात येईल. त्यामुळे जमिनी नापीक होतील.
९) आजूबाजूला असलेल्या ओहळातून दूषित पाणी सोडले जाईल.
१०) मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढेल. त्यामुळेही प्रदुषण वाढणार आहे!

आर. एम. सी. प्लांट रस्त्यालगत घेतल्याने ठेकेदार कंपनीचे करोडो रुपयांची बचत होणार आहे; पण ग्रामस्थांना होणारा त्रास अब्जावधीचा असेल; हे लक्षात घेतले पाहिजे! आर. एम. सी. प्लांट उभारण्यासाठी शासनाच्या अनेक परवानग्या आवश्यक असतात; विशेषतः असलदे ग्रामपंचायतची परवानगी अत्यावशक असताना आमच्या छाताडावर हा प्लांट उभा राहत आहे आणि आम्ही गप्प आहोत! हे गप्प बसणे योग्य नाही!

भुगर्भातील प्रचंड पाण्याचा उपसा हा धोकादायक असतो. पियाळी नदीला खूप पाणी आहे! ते वापरायचे सोडून बोअरवेलचे पाणी वापरणे; योग्य नाही. ह्याचे दुष्परिणामही घातक आहेत! असलदे गावात काजूचे उत्पादन सर्वाधिक होतं. त्याच्यावर परिणाम झाला तर आमचा शेतकरी अधोगतीला लागणार आहे. प्रदुषण नको तर विकासाचा प्रकल्प होणार कसा? असा प्रश्न विचारला जाईल. विकासाचा प्रकल्प विषय असावा! त्याबद्दल दुमत नाही. पण ज्या प्रकल्पातून ग्रामस्थांना दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल ते प्रकल्प मानवी वस्तीपासून, मानवी रहदारीपासून दूर असायला हवे; असं माझं स्पष्ट मत आहे!

अशाप्रकारे सर्व दुष्परिणामांना असलदे ग्रामस्थांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे आरोग्याच्या समस्या आणि पर्यावरणाच्या समस्या निर्माण होणार आहेत. त्याचा सर्व ग्रामस्थांनी साधकबाधक विचार करावा! म्हणून माझी सर्व ग्रामस्थांना हात जोडून विनंती आहे की सर्वांनी एकजुटीने आलेले हे संकट दूर करूया!

असलदे गावात अनेक विद्वान, अनुभवी, प्रामाणिक, निस्वार्थी, आदर्श व्यक्ती आहेत. त्यांनी नेहमीच गाव संकटात असताना पुढाकार घेतला! आजही माझी तीच अपेक्षा आहे! मी महत्त्वाच्या गंभीर गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रामाणिक प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून केला. आता निर्णय असलदे ग्रामस्थांनी घ्यावा; ही विनंती! अन्यथा विनाश अटळ आहे!

-नरेंद्र हडकर
संपादक- पाक्षिक ‘स्टार वृत्त’